shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एक हजार वनडे सामने खेळणारा पहिला देश ठरतोय भारत !



              पाच जानेवारी १९७१ रोजी जगातला पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. स्थळ होतं ऑस्ट्रेलियातील जगप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम 'मेलबोर्न क्रिकेट ग्राऊंड ' ( एमसीजी ). पारंपारीक प्रतिस्पर्धी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात एशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू होता. परंतु पावसामुळे सामन्याचे चार दिवस वाया गेल्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दोन्ही संघात प्रत्येकी चाळीस षटकांचा सामना खेळविण्यात आला. तो पहिला वहिला एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून जिंकला व एका ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात केली.

             भारताने १३ जुलै १९७४ रोजी इंग्लंडविरुद्ध  आपला पहिला अधिकृत एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध लिडस येथे खेळला. त्यानंतर ४८ वर्षात भारताने आपली एकदिवसीय सामन्यांची संख्या एक हजारा पर्यंत आणून ठेवली असून या जादूई आकड्याला भारत येत्या सहा फेबुवारी रोजी जगातील सर्वाधिक प्रेक्षक क्षमता व सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त प्रेक्षक क्षमता असलेल्या या अफाट अशा मैदानावर सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना परवानगी नसणार आहे.

               भारत व वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान होणाऱ्या या ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेल्या सामन्याला कोरोना संसर्गाचे गालबोट लागले असून भारताच्या संघातील शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल व नवदिप सैनी हे पाच खेळाडू तर तीन सपोर्ट स्टाफ मधील सदस्य कोरोना बाधीत असल्याने सुरुवातीला या मालिकेवरच संकट कोसळते की काय अशी भिती निर्माण झाली होती. मात्र बीसीसीआयने संघात छोटेमोठे बदल करून सामना व मालिका निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

               या सुवर्णमय सामन्यापूर्वी भारताने स्वतःच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकूण ९९९ इतके आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने ५१८ सामने जिंकले तर ४३१ सामन्यात पराभव पत्करला आहे. तर ५० सामन्यांचा काही कारणास्तव निकाल लागू शकला नाही. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान हे दोन संघच ९०० पेक्षा जास्त एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया- 958, पाकिस्तान- 936, श्रीलंका - 870 मैच व वेस्टइंडीज- 834  हे संघच आठशे पेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत.

                  भारताने १९७४ रोजी आपला पहिला सामना खेळला तेंव्हा त्या  संघाचे कर्णधार होते अजित वाडेकर तर या एक हजाराव्या ऐतिहासिक सामन्याच्या संघाचा कर्णधार आहे रोहीत शर्मा. योगायोगाची गोष्ट म्हणजे ते दोघेही मुंबईकर आहेत. अजित वाडेकर, श्रीनिवासन वेंकटराघवन, बिशन सिंह बेदी, सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, कपिल देव, सैयद किरमानी, मोहिंदर अमरनाथ,रवि शास्त्री, दिलीप वेंगसरकर, कृष्णम्माचारी श्रीकांत, मोहम्मद अजहरुद्दीन, सचिन तेंदुलकर,अजय जड़ेजा, सौरव गांगुली, राहुल द्रविड़,अनिल कुंबले,वीरेंद्र सहवाग, महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, गौतम गंभीर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहीत शर्मा व के.एल राहुल यांनी वनडे सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषविले आहे. 

              या एक हजाराव्या ऐतिहासिक सामन्याद्वारे रोहित शर्मा अधिकृतरित्या भारताच्या वनडे संघाचे कर्णधार पद स्विकारणार आहे. यापूर्वी त्याने तत्कालीन नियमीत कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत भारताचे नेतृत्व केले आहे.
                वनडेच्या एकूण बारा विश्वचषक स्पर्धा झाल्या असून त्यापैकी सन १९८३ मध्ये कपिलदेव रामलाल निखंज यांच्या नेतृत्वात भारताने आपला पहिला विश्ववचषक जिंकून भारतीय क्रिकेटला संजिवनी दिली. तर त्यानंतर अठ्ठावीस वर्षांनी म्हणजे सन २०११ मध्ये महेंद्रसिंग पानसिंग धोनी याच्या नेतृत्वात भारताने आपला दुसरा विश्वचषक जिंकून क्रिकेट जगताला भारतीय क्रिकेटचे महत्व समजवले. तत्पूर्वी १९८५ मध्ये सुनिल मनोहर गावस्कर यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात मिनी वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा साधला.  तर सन २०१३ मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वात भारताने चॅम्पीयन्स ट्रॉफी जिंकून वनडेच्या सर्व प्रकारच्या विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा आपला चौकोन पूर्ण केला.

                   या सर्व धामधुमीत जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक वनडे सामने खेळण्याचा, सर्वाधिक धावा बनविण्याचा, सर्वाधिक शतके ठोकण्याचा, सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा विश्वविक्रम भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्वतःच्या नावे कोरून ठेवला आहे.

                    भारतीय संघ व खेळाडू आपल्या शानदार कामगिरीने जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा तिरंगा मानाने डौलवतील यात कुठलेच दुमत नाही मात्र त्यासाठी प्रत्येकाच्या संयमाची परिक्षा होणार असून त्यासाठी वाद व कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवत देशहिताला प्राधान्य देणे याला अग्रक्रम देणे गरजेचे आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close