शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे... एका वर्षात एक लाख हेक्टर ऊस वाढला - साखर आयुक्त शेखर गायकवाड
इंदापूर प्रतिनिधी : सहकाराचे धोरण ठरवत असताना सहकारी साखर कारखान्याचे काय प्रश्न आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून मागील १२० वर्षापासून सर्वाधिक ऊसाचे क्षेत्र यावर्षी आहे. एका वर्षात साधरण एक लाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. पावसामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, सोयाबिन कांदा ,डाळींब आणि द्राक्षेबागांचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे वळत आहे.एका वर्षात एक लाख हेक्टर ऊस वाढला म्हणजे हा खूप मोठा बदल आहे,हे करत असताना राज्यात शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही ही पहिली जबाबदारी आहे असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना येथे व्यक्त केले.
दि.०३ फेब्रुवारी रोजी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यास भेट देऊन चालू गळित हंगामाच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,उपाध्यक्ष भरत शहा यांसह कार्यकारी संचालक देवराव लोकरे व सर्व संचालक मंडळ आणि अधिकारी उपस्थित होते.
गायकवाड पुढे म्हणाले, गोदावरी नदीच्या परिसरात ऊस क्षेत्र जास्त आहे.त्या ऊसाचे सर्व साखर कारखान्यांना वाटप करुन देणे आणि वेळेत गाळप करणे हा एक पहिला भाग आहे. दुसरा भाग हा की त्यासाठी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढवण्याकरीता कारखान्याचे शेअर्स कॅपिटल वाढवली.जे कारखाने तोट्यात आहेत थकीत आहेत त्यांना बँका १ ते २ टक्के ज्यादा व्याजदर घेतात.यासाठी सभासद अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला. कारखान्याची ताकद वाढल्याशिवाय कारखाने टिकणार नाहीत. तिसरा महत्वाचा मुद्दा की अनेक शेतकरी आज ऊस कारखान्यांची वाट पाहत आहेत.ज्यावेळी ऊसाची नोंद वेळेवर केली जात नाही त्यावेळी ही समस्या निर्माण होते. असा प्रसंग उद्भवू नये याकरिता स्थानिक पातळीवर कारखान्यांनी काही नियम बनवावेत. राज्याच्या कायद्यात बदल करुन नोंदणी केलेल्या ऊसाला प्राधान्य द्यायला पाहिजे असं मी नेहमी सरकारला ही सांगत असतो असं ते म्हणाले.
इथेनाॅल निर्मिती यावर्षी दिडशे कोटी च्या घरात पोहचली…
इथेनाॅल निर्मिती मध्ये मागील वर्षी आपण १०० कोटी लिटर मद्ये पोहचली होती तर यावर्षी दिडशे कोटी च्या घरात आपण आहोत. यास साधारणपणे ६२ रुपये दर मिळाला तरी यातून आपण १० हजार कोटींची उलाढाल करु. ३५ हजार कोटींची एफ.आर.पी.आणि १० हजार कोटीचे इथेनाॅल पुढील वर्षी १५ हजार कोटींचे इथेनाॅल म्हणजे साखर कमी आणि इथेनाॅल अधिक जसजसे करत जावू तसे साखरेचे बाजार वाढतील शिवाय इथेनाॅलला पण दर टिकून राहील.इथेनाॅल चे पैसे साखर कारखान्याला त्वरीत मिळतात. आम्ही नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे त्यामध्ये मागील वर्षी ४० कारखान्यांनी शंभर टक्के एफ.आर.पी.दिला होता. यावर्षी ७० कारखान्यांनी शंभर टक्के एफ.आर.पी.दिला आहे.
तेव्हा महाराष्ट्राचा एफ.आर.पी.९५ टक्के पेक्षा अधिक दिसलेला असेल……
कारखान्यांचे पैसे देण्याची इच्छा आहे मात्र त्यांना ज्या आर्थिक अडचणी येतात ते जर सोडवू शकतो तर शंभर टक्के एफ.आर. पी.देणारांची संख्या सुरवातीलाच जास्त होईल.कदाचित यावर्षी कारखाने जेव्हा बंद होतील तेव्हा महाराष्ट्राचा एफ.आर.पी.९५ टक्के पेक्षा अधिक दिलेला असेल असा माझा अंदाज आहे. हे फार मोठे यश असेल कारण एकही आंदोलन न होणे आणि १ लाख कोटीची कारखानदारी शांत ठेवणे हे साखर आयक्तांसाठी एक मोठे अहवान आहे.हे सर्व करित असताना छोट्या शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही त्यासाठी ही कार्यवाही सुरू आहे.

