प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
संतांचे विचार व शिकवण हे समाजमनाचे स्वास्थ्य निरोगी ठेवतात. शिवराम पुरी महाराज व नागेशपुरीजी महाराज यांच्या शृंखलेत लाभलेले रामकृष्ण महाराज यांनी वरपगाव व पंचक्रोशीतील भक्तांना जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवला असे विचार केज तालुक्यातील वरपगाव येथील रामकृष्ण महाराजांच्या सोहळाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित धार्मिक सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात बोलताना भगवान महाराज वरपगावकर यांनी व्यक्त केले.
यावेळी जेष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, डॉ टी एल देशमुख, राजेसाहेब देशमुख व केज तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या संसर्ग नियंत्रणामुळे तब्बल तीन वर्षानंतर वरपगाव येथे संत रामकृष्ण महाराज यांच्या पुण्यस्मरणां निमित्त काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भगवान महाराज वरपगावकर यांनी या मथसंस्थानाच्या प्रदीर्घ काळ केलेल्या अध्यात्मिक कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रामकृष्ण महाराजाच्या जीवन कार्याचा आढावा घेताना त्यांनी केलेल्या अध्यात्मिक सेवेचा उल्लेख केला. संतांचे जीवन नेहमी समाजासाठी समर्पित असते हे सांगताना त्यांनी रामकृष्ण महाराज देखील वरपगाव व पंचक्रोशीतील त्यांच्या भक्तांच्या सुख, शांती व आनंदासाठी प्रयत्नशील राहिल्याचे सांगितले.
यापुढे या महान संतांचे कार्य तितक्याच सामर्थ्याने भक्तांच्या सहकार्याने पुढे नेण्यासाठी आपण दृढसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
काल्याच्या किर्तनानंतर मठसंस्थानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी वरपगावसह चिंचोली(माळी), सारूकवाडी, डोका, हादगाव, भोपला, बोरगाव, पिंपरी, कापरेवाडी सह इतर गावचे भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

