shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तीघांना पाच वर्ष कारावासाची शिक्षा..! उत्तमराव खरात खून प्रकरण : जिल्हा न्यायालयाचा निर्णय..!!

पूर्णा । वार्ताहर :-
ऊसतोड कामगार उत्तमराव खरात यांच्या खून प्रकरणात गजानन काळे, उत्तम काळे व राजू पवार या तीघांना जिल्हा न्यायाधीश-२ ओंकार देशमुख यांनी गुरुवारी (दि.२४) भादंवि कलम ३६५ अन्वये दोषी ठरवून पाच वर्ष सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड प्रत्येकी, दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा सूनावली.

परभणी तालुक्यातील गव्हा येथील अक्षय खरात यांनी दि. १६ डिसेंबर २०२० रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याद्वारे त्यांचे वडील उत्तमराव खरात (मयत) यांनी आरोपी गजानन काळे यांच्याकडून ऊस तोडीच्या अर्धे कोयत्याचे २० हजार रुपये घेतले होते. त्यामुळे दि. ०४ ऑक्टोंबर २०२० रोजी वडील उत्तमराव खरात व उत्तम काळे त्यांच्या पत्नी सारिका, विश्‍वनाथ काळे व त्यांच्या पत्नी सुनिता तसेच भगवान तुळशीराम पवार हे मुकादम गजानन काळे यांचेसोबत कारखान्यावर कामाकरीता रवाना झाले होते, परंतु १३ डिसेंबर २०२० रोजी वडीलांची तब्येत ठिक नसल्याने ते घरी परतले तेंव्हा १५ डिसेंबर २०२० रोजी संबंधितांनी आपल्या घरी येवून वडीलांना कामावर चल, म्हणून जबरदस्तीने उचलून नेले. ते रात्रभर घरी न आल्याने आपण वडीलांचा शोध घेतला, परंतु वडील सापडले नाहीत, असे अक्षय खरात यांनी या तक्रारीत नमूद केले. 


आपण गजानन काळे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळेच संशय बळावल्याचे तक्रारकर्ता खरात यांनी नमूद केले. दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी आपले वडील उत्तमराव खरात यांचा मृतदेह नवामोंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडल्याचे कळाल्यावर व सरकारी दवाखान्यात ओळख पटल्याचे म्हटले. या प्रकरणात आपल्या वडीलास संबंधित आरोपींनी अक्षय धाब्यावर मारहाण केली. त्यात ते बेशुध्द झाले. त्यानंतर त्यांना मोटारसायकलवर बसवून संबंधित आरोपींनी पाथरी रस्त्यावरील झोपडपट्टीच्या बाजूस असणार्या कालव्यात मारहाण करुन फेकून दिले. त्यात ते पाण्यात बुडून मृत्यू पावले, असेही  म्हटले.

दरम्यान, या प्रकरणात जी.एस. राहीरे यांनी तपास केला. आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यात दहा साक्षीदार तपासले. अन् जिल्हा न्यायाधीश देशमुख यांनी गुरुवारी (दि.२४फेबु्रवारी२०२२) या प्रकरणात आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे ऍड. ज्ञानोबा दराडे, सरकारी वकील ऍड. नितीन खळीकर यांनी बाजू मांडली. कपील शेळके, सुरेश चव्हाण, सुरेश सूरनर, प्रमोद सूर्यवंशी आदींनी या प्रकरणात सहकार्य केले.
close