उजनीचं आणि सोलापूरकरांचे नाते न बिघडवता इंदापूरला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मार्ग काढणार- जलसंपदामंत्री जयंत पाटील
इंदापूर प्रतिनिधी : सोलापूरकरांवर अन्याय न करता, उजनीचं आणि सोलापूरकरांचे नाते न बिघडवता इंदापूरला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मार्ग काढणार अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी इंदापुरात दिली.
इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनामध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील मार्गदर्शन करत होते. मेळाव्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, 'सोनाई' चे सर्वेसर्वा दशरथ माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, डी. एन. जगताप, जि. प.सदस्य अभिजित तांबिले, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, महारुद्र पाटील, अमोल भिसे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, भविष्यकाळात लोकसंख्येच्या, उद्योगाच्या गरजा पाण्यातून भागवायच्या आणि शेतीला पाणी कसे द्यायचे यासाठी एक कमिटी नेमलेली आहे. भीमा खोऱ्यातल्या पाण्याचा सर्वंकष अभ्यास करत आहेत. काही निष्कर्ष हळूहळू काढले जात आहे. आपण शेवटच्या टोकाला आहोत हे सध्या प्रकर्षाने जाणवत आहे हे यापूर्वी ते जाणवत नव्हते. पाणीच अपुरे आहे त्यासाठी पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी काही प्रकल्पाला जलसंपदा मंत्री म्हणून गती देण्याचे काम करण्यात येत आहे असे सांगून पाटील पुढे म्हणाले, औद्योगिक कामासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी काही योजना, पुणे महानगरपालिकेचे पाणी असो;पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे. पाण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माझ्या मीटिंगा झालेल्या आहेत. सोलापूरकरांवर अन्याय न करता, उजनीचा आणि सोलापूरकरांचे नाते न बिघडवता इंदापूरला पाणी कसे उपलब्ध करून द्यायचे याचा मार्ग काढून देतो अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिली.
देशातील कोणत्याही प्रश्नाला उत्तर शोधणारे नेतृत्व आमच्याकडे आहे म्हणून आमचा पक्ष राज्यात एक नंबर असायलाच पाहिजे ही जिद्द माझ्यापासून सर्व कार्यकर्त्यांना असली पाहिजे या उद्देशाने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिल्लीच्या तख्तातील लोक मराठी माणसाच्या मान आणि स्वाभिमान धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी ठरवले आहे मोडेन पण वाकणार नाही. ईडी नोटिस आली, की राज्य येते. महा विकास आघाडी लढणार आहे. काही लोकांना त्यांची जागा दाखवावीच लागणार आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ई डी विभागाने कारवाई केली. कोणतीही विचारपूस नाही चौकशी नाही. त्यांनी नवाब मलिक यांना अटक केली. विरोधकांच्या बाबतीत षडयंत्राचा वापर केला जातो, याचा राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकतीने विरोध केला पाहिजे. ईडी, सीबीआय फक्त विरोधकांसाठी आहे. भाजप मध्ये गेल्यानंतर ईडीची चौकशी होत नाही. याचं प्रूफ इंदापूरकरांनी दिलेल्या आहे. एक गृहस्थ तुमच्या जिल्ह्यातला आहे आणि एक गृहस्थ जयंत पाटील यांच्या जिल्ह्यातील आहे. विरोधात असले की ईडी आणि भाजपात असले की ईडी गायब होते. तुम्ही असा कोणता फवारा मारतात. त्यामुळे जंतू नष्ट होतात. कोव्हिड सारखं इंजेक्शन आहे. सिरम इन्स्टिट्यूट ला विचारावे लागेल कोव्हिड शिल्ड सारखं ईडी शिल्ड इंजेक्शन भाजपने सुरू केलेले आहे असा सवाल त्यांनी विचारला.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केले सूत्रसंचालन अतुल झगडे यांनी केले.

