पूर्णा । प्रतिनिधी:
परभणी येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे मालधक्क्यावरील कंत्राटदारांविरुद्ध महिला मजुरांना कमी वेतन देऊन अर्वाच्य शिवीगाळ करीत धमकावल्याबद्दल नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परभणीतील रेल्वे मालधक्क्यावर काही महिला मजूर दहा वर्षापासून धान्य झाडून गोळा करण्याच्या कामास आहेत. रेल्वे मालधक्क्याचे कंत्राटदार नागनाथ पालदेवार यांनी या महिलांना कामावर घेतले, या मजूरांना मजुरीचे पैसे हे मजुरीचं काम झाल्यानंतर सायंकाळी दिले जात असत. कामांच्या दिवशी चारशे रुपयांप्रमाणे मजुरी मिळत असत. परंतु गेल्या एक महिन्यापासून हिशोब ठेवणारे सचिन पालदेवार यांनी या महिला मजुरांना हिशोब करून मजुरी देतो असे सांगून १२ फेब्रुवारी पर्यंत मजुरी दिली नाही, जेव्हा या दहा महिला मजूर मजुरी मागण्याकरिता सचिन पालदेवार यांच्याकडे गेल्या,तेव्हा चारशे रुपयां ऐवजी तीनशे रुपये या प्रमाणे मजुरी हातात टिकवली. या प्रकाराने संतप्त महिला मजुरांनी मजुरीत का कपात केली अशी विचारणा केली,तेव्हा सचिन पालदेवार व शेख सगीर शेख खाजा यांच्यासह अन्य एकाने या महिला मजुरांना बरोबर हुज्जत घातली.
शिवीगाळ सुरू केली. पाठोपाठ अर्वाच्च भाषा वापरली तसेच जातीवाचक शिवीगाळ करीत या मजुरांना तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला, आमचं कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही, कुठे तक्रार नोंदवायची तिथे नोंदवा, असे सुनावले व जीवे मारण्याचा सुद्धा धमक्या दिल्या असे लक्ष्मीबाई तुळशीराम मस्के या महिला मजुराने ( सायाळा खटिंग) नवा मोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून म्हटले आहे.
संबंधित कंत्राटदार सचिन पालदेवार, शेख सगीर शेख खाजा व अन्य एका व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ केल्यासह जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे नमूद केले. दरम्यान या तक्रारीच्या आधारे नवा मोंढा पोलिसांनी या रेल्वे मालधक्क्या वरील कंत्राटदार सचिन पालदेवार शेख सगीर शेख खाजा व अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकाराने कामगार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

