शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२२
भर दिवसा ट्रॅक्टर, केनी व यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा; मुळातील वाळू उपसा जोमात, पोलीस व महसूल प्रशासन कोमात..!!
राहुरी : तालुक्यातील मुळा नदीपात्रातून भरदिवसा वाळू उपसा जोमात सुरू आहे. मात्र, पोलिस व महसूल प्रशासन त्याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे वाळू उपसा जोमात पोलीस व महसूल प्रशासन कोमात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील मुळा नदी पात्रामध्ये भर दिवसा ट्रॅक्टर, केनी व यंत्राच्या सहायाने वाळू उपसा केला जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
मुळा नदी पात्रातील बारागाव नांदूर, डिग्रस, राहुरी खुर्द, गणपती घाट, नाव घाट हद्दीमध्ये राजरोसपणे ट्रॅक्टर, केनी व यांत्रिक मोटारीच्या सहायाने नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांना वाळू तस्करांकडून दमदाटी दिली जाते. नदी पात्रालगतच्या शेतकर्यांच्या उभ्या पीकांमधून वाळू तस्कर वाहनांची ने आण करतात. शेती धंद्यांची पूर्वीच वाताहात झालेली आहे. कोरोना व निसर्गाच्या प्रकोपाने कणा मोडलेल्या शेतकर्यांच्या जीवनामध्ये अंधार निर्माण करण्याचा प्रयत्न वाळू तस्कर करीत आहेत. परंतु राहुरी तालुक्यातील वाळू तस्करांवर कोणाचाच वचक नसल्याचे दिसून येत आहे. पोलिस व महसूल प्रशासनाने वाळू तस्करांच्या गोरखधंद्याला एकप्रकारे पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे. राहुरी परिसरातून दैनंदिन शेकडो ब्रास वाळूचा साठा जिल्ह्यातून मोठ मोठ्या शहरांमध्ये केला जात आहे.
पुणे, नगर, मुंबई व नाशिक मध्ये राहुरी तालुक्यातील वाळूला अधिकचा दर मिळतो. त्यामुळे राज्य पातळीवरील अनेक वाळू तस्कर राहुरी परिसरात घिरट्या घालत असतात. राहुरी तालुक्यातील स्थानिक वाळू तस्करांद्वारे नदी पात्रामध्ये रात्रंदिवस वाळू उपसा होत असल्याने नगर मनमाड रस्त्यावरून शेकडो ब्रास वाळू रोज वाहतूक केली जात आहे. मात्र, वाळू वाहतूकीवर कारवाई ऐवजी पाठबळ देणार्या प्रशासनाच्या कामकाजाबाबत जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बारागाव नांदूर, डिग्रस, राहुरी खुर्द, गणपती घाट, नाव घाट हद्दीमध्ये वाळू तस्करांनी आपल्या थडी वाटून घेतलेल्या आहेत. नदी पात्र विकत घेतल्याप्रमाणे रात्रंदिवस वाळू तस्कर नदी पात्रामध्ये थांबून असतात. शेतकर्यांना दमदाटी देणे, नदी पात्रालगत कोणी दिसल्यास त्यास मारहाण केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. राहुरी तालुक्यातील वाळू तस्करीला रक्तरंजित करून सोडणार्या वाळू तस्करांचा वाढता उद्रेक हा सुजलाम सुफलामतेला बाधा पोहोचविणारा आहे. त्यामुळे वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी नेमका कोणता अवलिया पुढे येणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
"मागील काही दिवसांमध्ये एकाच दिवसात तीन वाहनांवर कारवाई केली होती. काल रात्री पुन्हा एका वाहनावर कारवाई केली आहे. चोरटी वाळू करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जात आहे. भविष्य काळातही कारवाई सुरूच राहील. प्रशासनाच्या नजरेआड वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोरात कठोर शिक्षा केली जाईल.
_ एफ. आर. शेख, तहसीलदार, राहुरी"
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

