अमेरिकेतील मुलीने केलेल्या गिनीज विश्व विक्रमाला मोडण्याचे धाडस हे इंदापूर तालुक्यातील एका मुलीने केले, हे अगदी कौतुकास्पद - गटविकास अधिकारी विजयकुमार परीट.
इंदापूर प्रतिनिधी:अमेरिकेतील मुलीने केलेल्या गिनीज विश्व विक्रमाला मोडण्याचे धाडस हे इंदापूर तालुक्यातील एका मुलीने केले, हे अगदी कौतुकास्पद आहे व ही एक दुर्मिळ बाब आहे, असे गौरवोद्गार गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी बुधवार (दि. ०२) पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये कु. प्रतिक्षा सुनील पाटील हिच्या सत्कारावेळी काढले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी यासाठी अधोमुख श्वानासन या योगमुद्रेमध्ये ७५ मिनिटे व ०४ सेकंदांचा विश्वविक्रम केल्याबद्दल कु.प्रतिक्षा पाटील, तिचे वडील सुनील पाटील (रा. जांब, ता. इंदापूर) व भारत चिल्ड्रन्स अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज, वालचंदनगरचे प्राचार्य श्री. कृष्णदेव क्षीरसागर यांचा सत्कार पंचायत समिती इंदापूर यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता.तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची क्रीडा नैपुण्य चाचणी घेतल्याबद्दल ड्रीम्स अकॅडमी, सराटी चे अध्यक्ष प्रविण कोकाटे यांचा देखील पंचायत समिती, इंदापूर तर्फे सत्कार करण्यात आला. पंचायत समितीच्या शेष फंडातून कु. प्रतिक्षा हिला पुढील वाटचालीसाठी रु. दहा हजार व . प्रविण कोकाटे यांना पुढील क्रीडा नैपुण्य चाचणी घेण्यासाठी रु. पंचवीस हजार देण्याचा प्रस्ताव सर्वानुमतें मंजूर करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. स्वातीताई शेंडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमामध्ये गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे, उपसभापती हेमंत नरुटे, पंचायत समिती सदस्य करणसिंह घोलप, प्रदीप जगदाळे आदी उपस्तिथ होते.

