शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२
पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेचा अडथळा दूर
एकूण खर्चाच्या वीस टक्के रकमेस केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची मान्यता..!!
पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेचा अडथळा दूर...!!
अहमदनगर : पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना देणार्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या पुणे-संगमनेर- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. या प्रकल्पासाठी येणार्या एकूण खर्चाच्या वीस टक्के रकमेस केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून ही रेल्वे जाणार आहे. त्यासाठी या तिन्ही जिल्ह्यांमधील सुमारे एक हजार 470 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्च आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रेल कॉर्पोरेशनच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. त्यापैकी प्रत्येकी वीस टक्के खर्च हा राज्य सरकार आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. उर्वरित 60 टक्के निधी हा कर्ज रूपाने उभारण्यात येणार आहे. त्यापैकी वीस टक्के निधीस राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मात्र, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून वीस टक्के निधी देण्याबाबत अद्याप मान्यता मिळाली नव्हती. मात्र, आता ही अडचण दूर झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नुकतीच निधीस मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास पुणे-नाशिक अंतर पावणे दोन तासांवर येणार आहे.
या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तीन वर्षांपूर्वी दोन कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर झाला होता. त्यानंतर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. परंतु, राज्य व समभागातील निधी मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांपासून केंद्राच्या 20 टक्के हिश्श्याचा निधी प्रलंबित होता.
✒️Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

