शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
शिर्डी :- माजी मंत्री शिर्डी मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी तो पुरस्कार कोविड योद्ध्यांना समर्पित केला, हा युवकांपुढे मोठा आदर्श आहे, असे प्रतिपादन भाजपा ओबीसी युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र माळवदे यांनी केले.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भाजप नेते माजी मंत्री शिर्डी मतदार संघाचे विद्यमान आमदार राधाकृष्णजी विखे पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने "जीवन साधना गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापन दिनी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले.
जितेंद्र माळवदे म्हणाले, माजी मंत्री आमदार विखे पाटील साहेब यांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकार तत्वावर चालवल्या जाणाऱ्या अनेक संस्था, शेतकरी हाच संस्थाचालक, शेतकरी हाच कारखानदार ह्या भूमिकेतून आ. विखे पाटील सातत्याने काम करत आहेत. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटलांनी सुरु केलेली सहकार चळवळ अबाधित ठेवून ग्रामीण भागाचा आर्थिक, शैक्षणिक, विकास करण्याचे कार्य आ. राधाकृष्ण विखे पाटील अविरतपणे करत आहेत.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या, शेतमजुरांच्या, ऊसतोड कामगारांच्या मुलांना आपल्या हक्काचे शिक्षण मिळाले पाहिजे, तेही सुशिक्षित झाले पाहिजे, म्हणून स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी सुरू केलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये ही अध्यक्ष म्हणून आ. विखे पाटलांनी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण केल्या सुसज्ज असे महाविद्यालय, व्यवसायिक शिक्षण, ग्रंथालय, राज्यसेवा व लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापन व प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्याचप्रमाणे कमवा व शिका हि योजना अत्यंत प्रभावीपणे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये राबवली व जास्तीत जास्त गरीब, गरजू, शिक्षणाची अत्यंत ओढ असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून दिला. प्रवरा परिसर व राहाता तालुक्यात ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज भासू नये म्हणून प्रत्येक गावांमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय सुरू केले व तेथे आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहरात जाऊन शिक्षण घेण्याचा खर्च व वेळ वाचवा म्हणून मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून कृषी व जैवतंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, उद्योग व्यवस्थापन इत्यादी व्यवसायिक शिक्षण सुरु केले.
मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्न सुरू असताना व कोविडच्या काळात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था मध्ये व्यवसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या मराठा, ओबीसी विद्यार्थ्यांचे ५०% शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय माननीय विखे पाटील साहेबांनी घेऊन सर्व संस्थाचालकांना समोर एक नवीन आदर्श निर्माण केला.
माननीय विखे पाटील साहेब यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त २०८ शेतकरी कुटुंबियांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे त्या कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करण्याचे दायित्व पूर्ण करत आहे. अनेक महत्वकांक्षी प्रकल्प राबवून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. प्रवरा बँकेच्या माध्यमातून "पद्मश्री कर्ज योजना" सुरू करून अनेक दुकानदार व्यवसायिकांना आधार दिला. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कोविडच्या संकटात हजारो गरजू लोकांना अन्नधान्य व किराणा वाटप करण्यात आले. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, तात्काळ कोविड चाचणी करण्याची सुविधा जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय लोणी येथे कोविड सेंटर सुरू करून जनसामान्य जनतेला आत्मविश्वास व नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कोविड सेंटरचा हजारो रुग्णांना लाभ झाला. शहरी रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या हजारो लाखो रुपयांच्या लुटी पासून हे रुग्ण वाचले.
माजी मंत्री आ. विखे पाटील साहेबांनी सुरू केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य आजही अविरतपणे सुरू आहे. साहेबांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने यंदाच्या वर्षी "जीवन साधना गौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले, असे जितेंद्र माळवदे म्हणाले याप्रसंगी उद्योजक प्रशांत तांबे, निलेश जोशी, अक्षय ढमक, इत्यादी युवक उपस्थित होते.

