shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक मतदार संघाप्रमाणे सैनिक मतदार संघाची निर्मिती करा- जय हिंद ची मागणी


राहुरी : माजी सैनिकांच्या मागणी प्रमाणे त्यांचे स्वतंत्र विभाग निहाय प्रतिनिधित्व मिळणेकामी विधानपरिषदेत सैनिकांचे प्रतिनिधी म्हणून आमदार असावे, या माजी सैनिकांच्या मागणीला प्राधान्य देऊन शिक्षक मतदार संघाप्रमाणे सैनिक मतदार संघ निर्माण करण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व क्रांतीसेनेकडुन मा. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य निवडणूक आयोग व सैनिक कल्याण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ई- निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील आजी माजी सैनिकांचे, शहीद परिवाराचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील विभागानुसार सैनिक मतदार संघाची रचना करून सैनिक आमदार होणे गरजेचे आहे. सैनिकांची संख्या शिक्षक आणि पदवीधरांप्रमाणे भरपूर आहे. तसेच वेळावेळी त्यांच्यावरती होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी सभागृहात घेतल्यास नक्कीच सैनिकांच्या समस्यांची सोडवणूक होऊन न्याय मिळेल. बरेचशे सैनिक सिमेवरती देशाचे रक्षण करत असताना त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या कुटुंबीयांवरती, जमिनीवर अतिक्रमण करुन, मारहाण करून अन्याय केला जात आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सेवानिवृत्ती नंतरही छळले जात आहे, असे अनेक गंभीर प्रकरणे समोर आले आहेत. ही बाब निश्चितच गंभीर आणि चिंतनिय आहे. समाजामध्ये न्यायालयीन कामामध्ये बरेचदा त्यांना मदत मिळत नाही. जो सैनिक देशाचे रक्षण करतो त्या सैनिकाच्या परिवारावर अन्याय होत असेल तर त्या सैनिक परिवाराला न्याय मिळणे गरजेचे आहे.

 सैनिकाची परिस्थिती सैनिकांनाच माहिती असते. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक व पदवीधर प्रमाणे त्यांचे हक्काचे आमदार असल्यास त्यांना योग्य मदत मिळु शकेल. असा माजी सैनिकांना विश्वास वाटतो आणि ते योग्य ही आहे. ज्या प्रमाणे इतर घटकांसाठी उदा. कला, शैक्षणिक, सामाजिक, चित्रपट आदी क्षेत्रांचे प्रतिनिधी नियुक्त असतात. मात्र अशी सैनिकांसाठी व्यवस्था नाही. त्यामुळे माजी सैनिकांनी केलेली मागणी रास्त असुन यथायोग्य विचार करणे गरजेचे आहे.

 राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य महानगरपालिका व नगरपालिकेत नगरसेवक व प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये एक सदस्य चे आरक्षण करावे. माजी सैनिकांना समाजसेवा करण्याची संधी निर्माण करून राजकीय क्षेत्रात सैनिकांना आरक्षण दिल्यास गल्ली पासुन दिल्ली पर्यंत प्रामाणिकपणे देशाचा विकास होऊन आर्दश निर्माण होईल.

देशातील आजी-माजी सैनिक, शहीद परिवारांची ही मागणी असल्याने‌ जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे, अखिल भारतीय क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, निवृती भाबड, जगन्नाथ जावळे, भाऊसाहेब कर्पे, शिवाजी गर्जे, संभाजी वांढेकर, संतोष मगर, दिगंबर शेळके, संजय पाटेकर, विठ्ठल लगड, महादेव शिरसाट, संतोष शिंदे, कुशल घुले, निवृत कर्नल सर्जेराव नागरे, भारत खाकाळ, विनोद परदेशी, सहदेव घनवट आदींनी मागणी केली आहे.
close