भारताचा सफेद चेंडूचा कर्णधार रोहीत शर्मा दुखापतीतून सावरून संघात परतत असून येत्या सहा फेब्रूवारीपासून तो टिम इंडियाला उंचावर पोहोचविण्याचे स्वप्न घेऊन वेस्ट इंडिजविरूध्द वनडे सामन्यात अधिकृतरित्या नियमित कर्णधार म्हणून प्रथमच उतरत आहे. वनडेेमध्ये एक खेळाडू म्हणून त्याची ख्याती जगमान्य आहे. वनडेत तीन द्विशतके ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच बरोबर वनडेतील २६४ धावांची सर्वोच्च खेळी त्यानेच साकारली आहे. तसेच टि-२० मध्येही त्याने स्वतःच्या खेळाने दरारा निर्माण केला असून टि -२० मध्ये सर्वाधिक चार आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम त्याच्याच नावे आहे. माजी कर्णधार विराट कोहलीला न जमलेले आयसीसी स्पर्धा जिंकण्याचे अवघड काम रोहीतला एक कर्णधार म्हणून करायचे आहेच, मात्र एक फलंदाज म्हणून संघासाठी भरीव कामगिरीही करायची आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ न शकलेल्या रोहीतच्या गैरहजेरीत भारतीय संघाची धुळधाण उडाली होती. आता ते सगळं विसरून संघाला धक्का देणाऱ्या राजकारणाला बाजूला ठेवत संघाची घडी सोयीने लावण्याचे काम रोहीत शर्माच्या समजूतदार खांद्यावर आले असून तो ते सर्व इमानेेइतबारे पार पाडेल यात तिळमात्र शंका नाही.
वेस्ट इंडिज विरूध्द होणाऱ्या वनडे व टि-२० मालिकेपूर्वीच रोहीत प्रमुख आकर्षण बनला असून रोहीतने त्याच्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत २२७ सामने खेळले असून ४८.९६ च्या सरासरीने ८८.९० च्या स्ट्राईक रेटसह ९२०५ धावा जमविल्या आहेत. वनडेत भारतासाठी सर्वाधिक धावा बनविण्यात त्याचा सातवा क्रमांक लागतो. त्याच्यावर सचिन तेंडुलकर १८, ४२६ धावा, विराट कोहली १२२८५ धावा, सौरव गांगुली ११३६३ धावा, राहुल द्रविड १०८८९, महेंद्रसिंग धोनी १०, ७७३ धावा व मोहम्मद अझहरूद्दीन ९३७८ धावा हेच ते काय पुढे असून या मालिकेत तो अझहरूदीनला मागे सारून सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो.
रोहीत शर्माने वनडेत आतापर्यंत २९ शतके ठोकली असून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यात तो चौथ्या स्थानावर असून सचिन तेंडूलकर ४९, विराट कोहली ४३ व रिकी पाँटींग ३० शतके यांचा नंबर लागतो. पॉटींगला मागे सारून वनडेत सर्वाधिक शतके ठोकणारा जगातला तो तिसरा फलंदाज बनू शकतो. तेंव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वनडे या प्रारूपांत सर्वाधिक शतके ठोकणारे पहिले तीनही फलंदाज भारताचेच असण्याचा दुर्लभ चमत्कार घडेल.
टि-२० मालिकेतही त्याला स्वतःला इतरांपेक्षा वेगळे सिध्द करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. त्यापैकी टि-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा बनविणारा फलंदाज बनण्याची संधी तो साधू शकतो. सर्वाधिक धावा काढण्यात सध्या तो तिसऱ्या स्थानावर असून प्रथम स्थानावर न्यूझिलंडचा मार्टीन गप्टील ३२९९ व दुसऱ्या स्थानावर भारताचा विराट कोहली ३२२७ धावा यांना तो सहज मागे टाकू शकतो.
रोहीत शर्मा सध्या ११९ टि-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळून सर्वाधिक सामने खेळण्यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेत तो तीन सामने खेळणार असून दुसऱ्या क्रमांकावर जाणार हे निश्चित आहे. मात्र सर्वाधिक १२४ सामने खेळण्याचा पाकिस्तानच्याच शोएब मलिकचा विक्रम पुढच्याच महिन्यात श्रीलंकेविरूध्द नक्कीच मागे टाकून स्वतःच्या नावे एक अलग माईलस्टोन उभा करेल.
रोहीतने त्याच्या ओव्हरऑल टि-२० करियरमध्ये ९७७९ धावा ठोकून भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. एकूण ३६४ सामन्यात १३३.९० च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा जमविल्या आहेत. त्याच्या दहा हजार धावा पूर्ण होतील तेंव्हा तो अशी कामगिरी करणारा जगातला सातवा फलंदाज बनेल.
वेस्ट इंडिज विरूध्द टि-२० सामन्यात सर्वाधिक धावा करण्यात अव्वल स्थानावरही रोहित शर्माच असून त्याने वेस्ट इंडिज विरूध्द एकूण १५ टि-२० सामने खेळले असून त्यामध्ये १४१.४१ च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ५१९ धावा जमविल्या आहेत. यामध्ये आणखी भर घालण्याची संधी त्याला या मालिकेत चालून आली आहे.
या सर्व कारनाम्यांसह रोहितवर भारताला विंडीजविरुद्ध दोन्ही मालिका जिंकून देण्याची जबाबदारी तर आहेच शिवाय संघातील सर्व प्रकारचे वातावरण सुरळीत करून मिशन वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघाला तयार करायचे आहे. गुडलक रोहीत !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

