shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्वचषकात भारतीय मुलांची उत्तुंग भरारी तर कोरोनाने बिघडविली विंडीज दौऱ्याची लज्जत सारी !


             संकटे भारतीय क्रिकेटचा पिच्छा सोडण्याचे नावच घेईना असे दिसत आहे. कधी संघातंर्गत वाद तरी कधी थेट बीसीसीआयचेच खेळाडूंशी दोन हात ! या वादग्रस्त बाजूंना दूर ठेवत भारतीय क्रिकेट पुढे चालत असतानाच भारतीय संघापुढे आणखी एक संकट उभे ठाकले आहे. विंडीजचा संघ प्रत्येकी तीन एकदिवसीय व टि ट्वेंटी सामने खेळण्यासाठी भारतात डेरेदाखल झाला असून भारतीय चमूही अहमदाबाद मध्ये पोहोचला आहे. मात्र तेथे भारतीय संघाला वादांचा नाही तर साऱ्या जगाच्या मानगुटीवर बसलेल्या कोरोना व्हायरसच्या सैतानाचा सामना करावा लागत असून या मध्ये संघातील आघाडीचे फलंदाज व सपोर्टींग स्टाफ मधील काही सदस्य बाधीत झाले असल्याने सदर मालिकेवरच संकट सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
             या सर्व वाईट बातम्या प्रसारीत होत असतानाच गुरुवारी पहाटे एक गोड घटना भारतीय क्रिकेटमध्ये घडली. वेस्ट इंडिजचा प्रमुख संघ भारत दौऱ्यावर आला असला तरी भारताचा १९ वर्षाखालील मुलांचा संघ सध्या वेस्ट इंडिज मध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत धुमाकूळ घालत आहे. भारताने बुधवारी रात्री उपांत्य फेरीच्या सामन्यात बलाढय ऑस्ट्रेलियाला चारी मुंडया चित करून एकंदर दहाव्यांदा तर सलग चौथ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता पाच फेब्रुवारीला क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंडशी त्यांची विजेतेपदासाठी झुंज होईल.
             वेस्ट इंडिजमध्ये पोहोचल्या पोहोचल्या भारताच्या मुलांच्या संघालाही कोरोनाने घेरले होते. त्यामध्ये भारताचा निम्मा संघ बाधीत झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशिद हे खेळू शकले नव्हते. तरी उपलब्ध खेळाडूंनी हंगामी कर्णधार निशांत सिंधूच्या नेतृत्वात उपांत्य फेरीत धडक मारून कोरोनालाही हरविले. आता तर या संघाला केवळ इंग्लंडलाच हरवून विश्वकरंडक विक्रमी पाचव्यांदा उंचावण्याची संधी चालून आहे आहे.
                ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताच्या डावाची सुरुवात गचाळ झाली. दोन्ही सलामीवीर ३७ धावातच परतले. मात्र त्यानंतर कर्णधार यश धुल व उपकर्णधार शेख रशिदच्या द्विशतकी भागीदारीने भारताच्या डावाला आकार दिला तर ऑस्ट्रेलियाच्या गचाळ क्षेत्ररक्षण व निष्प्रभ गोलंदाजीने मोठाच हातभार लावला. कर्णधार यशने शतक पूर्ण केले पण रशिद ९४ धावांवर परतला.
               त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज वरचढ ठरू पाहत होते, परंतु शेवटच्या षटकात निशांत व दिनेश बानाने जोरदार हल्लाबोल करत २७ धावांची लूट करत भारताला २९० धावांपर्यंत पोहोचविले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चिवट व तिखट मारा करत कागारुंना वळवळ करूच दिली नाही. 
                 अहमदाबादमध्ये भारतीय संघ पोहोचल्या नंतर त्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर व ऋतूराज गायकवाड हे आघाडीचे व प्रमुख फलंदाज बाधीत सापडले तर संघाला सहाय्य करणारे फिल्डींग कोच टि.दिलीप व इतर चार जण देखील संक्रमीत आढळले. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेलाच ग्रहण लागण्याची शक्यता आहे. मात्र मालिका सुरळीत पार पाडण्यासाठी बीसीसीआयने अगोदरच साई किशोर व शाहरूख खान यांना संघा सोबत जोडले आहेच. शिवाय मयंक अग्रवाललाही पाचारण करण्यात आले असून सुरुवातीला होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवड न झालेला व्यंकटेश अय्यर टि२० संघात असल्याने त्याला वनडे संघातही निवडले जाऊ शकते. त्यामुळे रोहीत शर्मा सोबत वनडे मालिकेत तो सलामीवीराची भूमिका बजावू शकतो.
                संकट, वाद व प्रतिकूल परिस्थिती सध्या भारतीय क्रिकेटच्या पाठीमागेच लागली असल्याने या सर्व गोष्टींवर मात करून पुढे जाणेच खऱ्या योद्ध्याचे काम असते आणि उपलब्ध भारतीय खेळाडू पार पाडतील व यशाला आपल्या पारडयात नक्कीच झुकवतील हे १९ वर्षाखालील मुले व वरीष्ठ भारतीय खेळाडू आपल्या कामगिरीतून सिद्ध करत आहेत व करतील यात कुठलेच दुमत नाही. तूर्त आपण भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक घटकाला शुभेच्छा देण्याचे आपले कर्तव्य प्रथम बजावू या !

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close