shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वनडे मालिकेत भारत विंडीजला ब्ब्लॅकवॉश देण्याचा पराक्रम करणार ?


             दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुखापतीमुळे जाऊ न शकलेला भारताच्या वनडे टिमचा नियमित कर्णधार रोहीत शर्मा अधिकृतरित्या प्रथमच वनडेचे पूर्णवेळ नेतृत्व विंडीज विरूध्दच्या मालिकेद्वारे करणार आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमिवर टिम इंडियाला विजयाच्या चाकोरीत आणण्याची अवघड जबाबदारी रोहीतवर असून त्यासाठी त्याने स्वतःच्या दुखापतींवर मात करून सहा किलो वजनाचा त्याग करत कंबर कसली आहे. 

             तसं बघाल तर भारत व वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांच्या विस मालिका झाल्या असून त्यातील तेरा भारताने तर सात विंडीजने जिंकल्या आहेत. त्यापैकी दहा मालिका भारतात झाल्या असून त्यामध्ये या दोन संघांमध्ये ४७ सामने खेळले गेले आहेत. त्यातील २४ विजय भारताच्या तर २२ विंडीजच्या खात्यात जमा झाले असून एक सामना टाय झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन देशांतील लढतीत भारताची बाजू वरचढ राहीलेली असली तरी भारताने विंडीजविरूद्ध मालिकेतील सर्वच्या सर्व सामने कधीही जिंकले नाहीत, तर भारताला क्लिन स्विप देण्याची कामगिरी विंडीजने दोन वेळा केली आहे. यावेळी भारत मायदेशात विंडीजला ब्लॅक वॉश देण्याची मोठी शक्यता असून प्रत्यक्षात ही कामगिरी रोहीत व त्याचे शिलेदार साकारतात का ? हा लाखमोलाचा प्रश्न सर्वांसमोर आहे.

                वेस्ट इंडिजने मायदेशात भारताला सन २००६ मध्ये मालिकेत शेवटचे हरविले आहेत तर भारतात सन २००२ मध्ये कार्ल हुपरच्या नेतृत्वात मालिका जिंकली होती. त्यानंतर त्यांना अद्याप भारतात मालिका जिंकता आली नाही. या दोन देशात विस वनडे मालिका झाल्या असून त्यातील १३ भारताने तर ७ विंडीजने जिंकल्या आहेत. यापैकी दोन मालिकात विंडीजने मालिकेतील सर्वच्या सर्व सामने जिंकून भारताला ब्लॅक वॉश केले आहे. मात्र भारत विंडीजला एकदाही क्लिन वॉश देऊ शकला नाही.

              भारताने द्विपक्षीय मालिकांव्यतिरिक्त विंडीजमधे दहा मालिका, तिरंगी, चौरंगी मालिका व आयसीसी स्पर्धांमध्ये विंडीजशी दोन हात केले असून सर्व मिळून दोन्ही संघ आपसात ८८ वेळा भिडले आहेत. त्यापैकी ४३ विजय भारताच्या तर ४१ विंडीजच्या झोळीत पडले आहेत. एक सामना टाय तर तीन सामने अनिर्णित राहीले. वरील आकडेवारी बघता दोन्ही संघात तुल्यबळ लढत झाल्याचे दिसते परंतु मालिकांचा विचार केला तर भारताने विंडीजच्या तुलनेत जवळ जवळ दुप्पट मालिका जिंकल्या आहेत.

             भारताने मायदेशात झालेल्या दहा पैकी सात वनडे मालिका जिंकल्या आहेत तर विंडीजच्या वाट्याला तिन मालिका विजय गेले आहेत. विशेष म्हणजे विंडीजने भारतातही भारताला क्लिन स्वीप केले असून भारत विंडीजला ब्लॅक वॉश देण्याचा प्रयत्न यंदा नक्कीच करेल.
              या दोन संघात भारतात पहिली वनडे मालिका सन १९८३-८४ मध्ये खेळविण्यात आली. त्या मालिकेत खेळलेल्या पाचही सामन्यात विंडीजने भारताचा धुव्वा उडविला होता. मात्र त्याच्या काही दिवस अगोदर झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने विंडीजलाच नमवून विश्वकरंडक पटकविला होता.

             त्यानंतर १९८७-८८ च्या मालिकेत विंडीजने भारताचा सहा - एक असा फडशा पाडला. सन १९९४-९५ मध्ये भारत ४-१ असा जिंकला. तर २००२-०३ ची मालिका विंडीजने ४-३ अशी निसटत्या फरकाने जिंंकली. सन २००६ मध्ये भारताने ३-१ अशी बाजी मारली, तर सन २०११-१२ मध्ये ४-१ अशी मालिका जिंकली. सन २०१३-१४ मध्येही भारतच २-१ असा भारी पडला तसेच सन २०१४-१५ ची मालिका २- १ अशी भारताच्या खिशात पडली तर सन २०१८-१९ ची सिरीज भारताने ३-१ ने जरी जिंकली असली तरी मालिकेतला एक सामना टाय झाला होता. सन २०१९-२० मध्ये भारत २-१ असा विजयी झाला होता.

              मागील काही वर्षात भारताची विंडीजविरूध्द कामगिरी नक्कीच चांगली असून फक्त मालिकेतील सर्वच सामने जिंकण्याची कामगिरी विंडीजविरूध्द साजरी करणे तेवढे बाकी आहे. भारताचा संघ सध्या जडण घडणीच्या प्रक्रियेतून जात असल्याने विंडीजला कमी लेखण्याची चुक भारताच्या अंगलट येऊ शकते. तसे बघाल तर विंडीजनेही भारतात शेवटची वनडे मालिका वीस वर्षांपूर्वी जिंकली असल्याने तेही भारतातील मालिका विजयाचा दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत. या मालिकेत रोहीत व पोलॉर्ड दोन्ही संघांचे कर्णधार आहेत. मात्र एक गोष्ट ध्यानात ठेवा हेच दोघे आयपीएलचे विक्रमी विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सचे कर्णधार व उपकर्णधार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील लढतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहेत.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com      
close