शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ मार्च २०२२
सात तालुक्यात चोर्या, घरफोड्या करणारी टोळी गजाआड,चौघांना अटक, 42 तोळे दागिणे जप्त: 17 गुन्ह्यांची उकल..!!
अहमदनगर : जिल्ह्यातील सात तालुक्यात जबरी चोर्या, घरफोड्या करणार्या बीड जिल्ह्यातील टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राम बाजीराव चव्हाण (वय 20 रा. आष्टी जि. बीड), तुषार हबाजी भोसले, प्रविण उर्फ भाज्या हबाजी भोसले, विनाद हबाजी भोसले, (तिघे रा. पिंपरखेड ता. आष्टी जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 42 तोळे सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व तीन दुचाकी असा सुमारे 23 लाख 52 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आह. त्यांनी नगर जिल्ह्यात राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव तालुक्यामध्ये 17 ठिकाणी बंद घरात प्रवेश करून जबरी चोरी व घरफोडी केल्याची कबूली दिली आहे.
सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा दोन लाख 32 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद आनंदा बबन घुगार्डे (वय 54 रा. चास ता. नगर) यांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विजय वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके, संदीप पवार, विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरूंद, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, विजय ठोंबरे, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, रवींद्र घुंगासे, योगेश सातपुते, जालिंदर माने, रोहित मिसाळ, राहुल सोळंके, आकाश काळे, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रणजित जाधव, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, संभाजी कोतकर, बबन बेरड व चंद्रकांत कुसळकर यांचा समावेश असलेल्या वेगवेगळ्या पथकांनी चास येथील घरफोडीसह नगर जिल्ह्यातील इतर चोरी, घरफोडीचा तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान बीड येथील सराईत गुन्हेगार राम बाजीराव चव्हाण व त्याचे साथीदारांची नावे समोर आली. चव्हाण टोळी चोरलेले सोन्याचे दागिण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी अहमदनगर येथे येणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक कटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नगर- जामखेड रोडवरील आठवड घाट येथे जावून सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवर आलेल्या इसमांना पथकाने ताब्यात घेतले. त्यातील दोघे पसार झाले.
पकडलेल्या चार इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी दुचाकीच्या सिटाखाली व तुषार भोसले याचे कब्जातील कापडी पिशवीमध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने मिळाली. त्यामध्ये राणीहार, गंठण, मणीमंगळसुत्र, कानातील झुंबर, अंगठ्या, चैन, टॉप्स, नेकलेस, डोरले, कानातील वेल, बोरमाळ बांगड्या असे एकुण 42 तोळे वजनाचे दागिणे मिळून आले. तसेच राम चव्हाण याचे अंगझडतीमध्ये 39 हजार 500 रूपयांची रोख रक्कम व तीन दुचाकी असा एकुण 23 लाख 52 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. आरोपींनी मागील सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, शेवगाव, पाथर्डी, व राहुरी या ठिकाणी दिवसा बंद घराचे कडीकोंडा, कुलूप तोडुन दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे व सदर चोरी केलेले दागिने हे अहमदनगर येथे मोडण्यासाठी चाललो असल्याचे कबूली दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) श्रीमती स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, संदीप मिटके, सुदर्शन मुंढे, अजित पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे.
कोठेवाडी प्रकरणातील ‘त्या’ आरोपीचे तीन मुले...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीमधील तुषार, प्रवीण व विनोद भोसले हे तिघे सख्ये भाऊ आहेत. राज्यभर गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) येथील दरोडा व अत्याचार प्रकरणातील आरोपी हबाजी पानमळ्या भोसले याचे ते मुले आहेत. औरंगाबाद येथील हर्सूल तुरूंगात मागील माहिन्यात हबाजी भोसले याचा मृत्यू झाला होता. तो कोठेवाडी प्रकरणात मोक्का अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत शिक्षा भोगत होता. दरम्यान त्याची मुले सराईत गुन्हेगार राम चव्हाण याने केलेल्या टोळीत सहभागी झाली. त्यांनी चोरी, घरफोडीचे 17 गुन्हे केल्याचे उघड झाले आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

