शिर्डी । प्रतिनिधी ( संजय महाजन ) :-
वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी वाचनालय ही गरज असली तरी बदलत्या काळानुसार ई-ग्रंथालय सुध्दा विकसीत करून मराठी भाषेची अभिरूची आपल्याला वाढवावी लागेल, असे मत माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. शिर्डी नगरपरिषदेच्यावतीने डॉ. बाबासाहेब विकसीत करण्यात आलेल्या भारतरत्न आंबेडकर वाचनालय इमारतीचे उद्घाटन मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रशासक गोविंद शिंदे, शिवाजी गोंदकर, कैलास कोते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सचिन कोते, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, विलास कोते, पोपट शिंदे, नगरसेवक अशोक गोंदकर, राम कोते, नगरसेवक अशोक गायके, रवींद्र गोंदकर, द्वारकामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ताराचंद कोते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ. विखे पा. म्हणाले की, वाचनालय चळवळीच्या माध्यमातून वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होत आहे. या चळवळीने केलेल्या प्रयत्नामुळे मराठीसह इतर साहित्य सहज उपलब्ध होते. मराठी साहित्यात असलेल्या वेगवेगळ्या अभिरूची जपताना लेखकांनी काळानुसार केलेले लिखाण मराठी भाषेची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
तंत्रज्ञान बदलत आहे, प्रत्येक जण सोशल मिडीयाचा उपयोग करून जगाबरोबर राहण्यासाठी धडपड करतो. परंतु याच कारणाने वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची खंत व्यक्त करून वाचनाची आवड वृध्दींगत करण्यासाठी गावपातळीवर अशी वाचनालय निर्माण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त करतानाच वाचनालय चळवळीचे मोठे काम सुरू आहे. परंतु आता ई-ग्रंथालय निर्माण होणे ही आवश्यकता असल्याचे स्पष्ट करुन नव्याने विकसीत झालेल्या या इमारतीत अभ्यासिकेबरोबरच स्पर्धा परिक्षांसाठी ऑनलाईन वर्ग सुरु करण्याचेही आ. विखे यांनी सुचित केले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी आ. विखे पाटील यांचा सत्कार केला.

