प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
निमगाव घाणा : ३० / समाजामध्ये आज सुसंस्कारीत पिढी घडविणे गरजेचे आहे कारण यावरच समाजाचे हित व सामाजिक स्वास्थ्य टिकून असते असे मत न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त), अहमदनगर, द्वारा मौजे निमगाव घाणा याठिकाणी आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीयस्थानी ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना ही समाजात सुसंस्कारीत पिढी घडविणारी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मावर श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जाणीव, व्यक्तिमत्त्व विकास, निसर्ग व जलसंवर्धन, लिंगभाव समानता इत्यादी विविध स्वरूपाचे संस्कार केले जातात असे प्रतिपादन त्यांनी केले.
सदर शिबिराच्या समारोप प्रसंगी मा. इंजि. डी. आर. शेंडगे साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थित व्यवस्थापन, वेळेचे योग्य नियोजन, स्वयंशिस्त व संघटन कौशल्य इत्यादी गुणांचा विकास करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
कोणतेही कार्य करत असताना विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन कला शाखा उपप्राचार्य डॉ. बी. बी. सागडे यांनी केले. स्वयंसेवकांनी अवघ्या सात दिवसाच्या कालावधीत श्रमदानातून उभारलेला वनराई बंधाऱ्याचे काम हे आम्हा गावकऱ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन गावच्या सरपंच सौ. दिपालीताई रुपनर यांनी केले.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण विकसित होण्यासाठी व त्यांच्यामधील सामाजिक भान निर्माण होण्यासाठी विशेष श्रमसंस्कार शिबिरांची भूमिका महत्त्वाची आहे असे मत गावचे उपसरपंच श्री. संजय पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी निमगाव घाणा येथील सोसायटीचे माजी चेअरमन धोंडीभाऊ रुपनर, ग्रामपंचायत सदस्य सावळेराम रुपनर, माजी सरपंच लक्ष्मण रुपनर, ग्रामसेवक शहाजीराव नरसाळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक वसंत शिंदे, ग्रामस्थ आनंदा रुपनर, दादाभाऊ मासाळ, सुरेश रुपनर, राहुल ठाणगे, रावसाहेब गायकवाड, रामदास अडसुरे गुरुजी, नासीर शेख, भास्कर गायकवाड, जालिंदर कावरे आदी उपस्थित होते.
या समारोप समारंभाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश निमसे, पाहुण्यांचा परिचय प्रा. भगवान कुंभार, उपस्थितांचे आभार डॉ. मच्छिंद्र मालुंजकर व सूत्रसंचालन डॉ. सुनिता मोटे यांनी केले.

