shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"आमच्या मातीतला आपला माणूस" दुरदर्शन निर्माते : अशोक डुंबरे..!

"आमच्या मातीतला आपला माणूस"
   दुरदर्शन निर्माते : अशोक डुंबरे
     〰️ 🍁🍁🍁🍁🍁〰️
२ ऑक्टोबर १९७२ रोजी महाराष्ट्रातील पहिले दुरदर्शन केंद्र परेल, मुंबई येथे सुरू झाले आणि नंतर काही वर्षातच खेड्यापाड्यातील ग्रामपंचायतींमध्ये शासनाच्या वतीने दुरदर्शन संच बसविण्यात आले. ग्रामपंचायत इमारतीवर उंचच उंच ॲन्टिना असलेल्या या दुरदर्शनवर दररोज सहा वाजता संध्याकाळची सभा एका फिरत्या गोलाकार चक्रासह विशिष्ट अशा श्रवणीय 'संगीत धून'ने सुरू व्हायची. शाळा सुटली की दप्तराचे ओझे घरी टाकून, घाईघाईत काहीतरी खाऊन आम्ही मुलं ग्रामपंचायतीच्या पायरीवर ही सभा सुरू होण्याआधी येऊन बसायचे. साडेसहा ते सात हा कार्यक्रम संपला की 'निर्माता - अशोक डुंबरे' हे नाव यायचे अन् आम्ही मुलं एका सुरात मोठ्याने गलका करायचे. धोलवडच्या मराठी शाळेतील नानासाहेब डुंबरे (नाना गुरूजी) यांचे अशोक डुंबरे भाऊ आहेत असं आम्हाला कोणीतरी सांगितले होते म्हणून ते नाव वाचताना तिथे हजर असलेली सर्वच मुलं आपुलकीने एका सुरात ओरडायची. दुरदर्शनने तेंव्हा सर्वांनाच मोहिनी घातली असल्याने 'निर्माता अशोक डुंबरे' या नावाचा त्यावेळी सर्वांनाच अभिमान आणि आदर वाटत असे. त्या काळात सर्वांना सुपरिचित असलेले 'अशोक डुंबरे' हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले होते. 

अर्थात, त्यावेळी दुरदर्शनचे सर्व कार्यक्रम कृष्णधवल म्हणजे black & white होते. आजची पिढी जशी मोबाइल क्रांतीची साक्षीदार आहे तशी त्यावेळची पिढी दुरदर्शन क्रांतीची साक्षीदार होती आणि म्हणूनच अशोक डुंबरे या नावाला फार मोठे वलय प्राप्त झाले होते. अशोक डुंबरे यांचा जन्म ३० मार्च १९३९ रोजी जुन्नर येथे तुकाराम डुंबरेगुरूजी आणि आई कलावतीबाई यांच्या कुटुंबात झाला. ओतूर येथील तुकाराम पांडुरंग डुंबरेगुरूजी म्हणजे त्या काळातील अनेक सामाजिक घडामोडींशी संबंधित असणारे स्वतंत्र लेखाचा विषय असलेले एक बहुआयामी परंतु आदरणीय व्यक्तिमत्व होय. वडिलांच्या नोकरीमुळे अशोकरावांचे प्राथमिक शिक्षण जुन्नर, मंचर, नारायणगाव, ओतूर आणि माॅडर्न हायस्कूल, पुणे असे विविध ठिकाणी झाले. ओतूर येथे त्यांना लहान वयातच शेतकामांचा अनुभव मिळाला. वडिलांच्या गळ्यात तुळशीची माळ होती आणि धार्मिक वृत्ती यामुळे अशोकरावांवर लहानपणापासूनच उत्तम संस्कार झाले. मॅट्रिकनंतर पुना काॅलेज येथून १९६४ मध्ये कृषी पदवीधर (बीएससी ॲग्री) ही कृषी पदवी घेऊन अशोकराव अहमदनगर येथे एका ठिकाणी सुपरवायझर पदावर रूजू झाले. त्यानंतर पुणे सेंट्रल बिल्डिंग येथे कृषी माहिती विभागात त्यांनी एक वर्ष काम केले. यानंतर पाच वर्षे पुणे आकाशवाणी केंद्रात डेप्युटेशनवर काम करण्याची संधी अशोक डुंबरे यांना लाभली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 

या दरम्यान १९६९ साली अशोक डुंबरे यांचा शुभ विवाह ब्रिटिश कालीन पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रावबहादूर ठुबे यांची नात उज्वला हीजबरोबर संपन्न झाला. आकाशवाणी केंद्रातील अनुभवाच्या आधारे २ ऑक्टोबर १९७२ रोजी सुरू होणा-या मुंबई दुरदर्शन केंद्रासाठी निर्माता म्हणून अशोक डुंबरे यांची निवड झाली. मंडी हाऊस, नवी दिल्ली येथे टेलिव्हिजन ट्रेनिंग सेंटरमध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन अशोक डुंबरे मुंबई दुरदर्शन केंद्रात दाखल झाले. प्रत्यक्षात १ जानेवारी १९७३ पासून मुंबईत कार्यक्रम निर्मितीस सुरूवात केली. सुरूवातीला ग्रामीण दर्शकांसाठी 'गाव रहाटी' नावाचा कार्यक्रम आठवड्यातून दोन दिवस होत असे. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पुणे प्रक्षेपण केंद्राचे आणि 'आमची माती, आमची माणसं' या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि ख-या अर्थाने दुरदर्शन ग्रामीण भागात पोहचले. या कार्यक्रमात कृषि, सहकार, आरोग्य, वनविभाग, सामाजिक वनीकरण, मच्छिमारी, ग्रामविकास, शेतक-यांची यशोगाथा या ग्रामीण विषयांचा समावेश होता. सुरूवातीला आठवड्यातून दोन व नंतर तीन दिवस या कार्यक्रमाचे प्रसारण होत असे. या सर्वच Field base कार्यक्रमांसाठी कॅमेरामन, साऊंड रेकाॅर्डिस्ट, लाईट असिस्टंट, निर्मिता अशी टिम ग्रामीण भागात शेतावर, बांधावर जाऊन शेतक-यांना समजतील अशा सोप्या भाषेत शुटिंग करायची. गावोगावी फिरून शेतकऱ्यांच्या यशोगाथा महाराष्ट्रभर पोहोचवल्या. गाव प्रगती, पाणी नियोजन, उत्तम फळबागा यावर अनेक लघुपट केले. 

कवी ना. धो. महानोर यांची उत्तम शेती आणि फळबाग, राळेगणसिद्धी येथील आण्णा हजारे यांचा पाणलोट क्षेत्रावर अधारीत, विजय बो-हाडे, औरंगाबाद यांचा 'पाणी अडवा, पाणी जिरवा' संकल्पना हे कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाले. एकदा तर प्रत्यक्ष महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांचीही शाबासकीची थाप अशोक डुंबरे यांना लाभली. काही कार्यक्रमांना निवेदनाची गरज भासल्यास प्रदिप भिडे, सुहासिनी मुळगावकर, विनय आपटे, स्मिता पाटील, नितीश भारद्वाज, अजित देशपांडे अशा दिग्गजांचे सहकार्य आणि सहवास अशोक डुंबरे यांना अनेक वर्षे लाभले. ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्याबरोबर अनेक वर्षे काम करण्याची संधी त्यांना मिळाली. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आईचे नवरात्रोत्सवातील दर्शन, आषाढी वारी भाविकांना घरबसल्या होऊ लागले. नागपंचमीची बत्तीस शिराळा येथील यात्रा १९७४ साली तेथे जाऊन चित्रित केली, प्रक्षेपणानंतर महाराष्ट्र टाईम्सने त्यावर अग्रलेखही लिहिला.

पंढरपुर येथे जन्मतः अंधत्व असलेली एक व्यक्ती किर्लोस्कर ऑईल इंजिन कितीही मोठा बिघाड झालेला असले तरी पूर्णपणे खोलून दुरूस्त करायची. फक्त स्पर्शाने त्यांना इंजिनचे पार्ट कळायचे. या अंध व्यक्तीवरील कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंढरपुरचे भिकारी दाखविण्यात आले आणि त्यानंतर या अंध व्यक्तीचे इंजिन दुरूस्तीचे प्रात्यक्षिक दाखवून दोन्हीं अंधामधील विरोधाभास स्पष्ट केला होता. या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर ती अंध व्यक्ती निर्मिते अशोक डुंबरे यांचे आभार मानण्यासाठी पुण्याला आली तेंव्हा प्रत्यक्ष भेटीवेळी म्हणाली, 'साहेब मला वाईट वाटते की मी कार्यक्रम बघू शकलो नाही.. फक्त ऐकू शकलो' तेंव्हा डुंबरेसाहेबांच्याही डोळ्यात पाणी आले. पशुसंवर्धन खाते, वनविभागातर्फे,पुणे गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक, पुणे फेस्टिवल, नॅशनल गेम, अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, ऊस शेती, गहू शेती, द्राक्ष शेती, कांदा शेती, शेतकरी मेळावे, मच्छिमारी, एनडीए खडकवासला, लष्करी ठाणी, गच्चीवरील भाजीपाला, फळशेती, फुलशेती, खते, बि - बियाणे, कच-यातून सोने असे असंख्य लघुपट बनवले, कार्यक्रम केले. निर्माता अशोक डुंबरे यांनी चित्रित केलेले परमपूज्य गगनगिरी महाराज यांची मुलाखत आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 'शिवशाहीचा उष:काल' हे कार्यक्रमही प्रचंड गाजले. आळंदी येथे १९९६ साली स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कवयित्री शांताबाई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे चित्रिकरण ही आणखी एक महत्वपूर्ण घटना होती. या सर्व कार्यक्रमांच्या चित्रिकरणासाठी ट्रॅक्टर, ट्रक, बस, जीप, अम्बॅसिडर कार, होडी, विमान असा सर्व प्रकारचा प्रवास केला, कधीही कंटाळा केला नाही.  

शेतक-यांची तिर्थस्थाने असलेल्या कृषि विद्यापीठातील संशोधन विभागात जाऊन तेथील प्रयोग, संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न निर्मिते अशोक डुंबरे यांनी केला. काही वर्षे लोकसंगीत विभागही अशोक डुंबरे यांनी सांभाळला. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा कार्यक्रम दुरदर्शनवर पहिल्यांदा याच काळात अशोक डुंबरे यांच्या सहकार्याने झाला. राज्यातील पंतप्रधान इंदिरा गांधी, पंतप्रधान मोरारजी देसाई, पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपतींचे दौरे जनतेपर्यंत पोहचविले. अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या ओळखी होऊन सहवास लाभला. ओतूरची श्रावण महिन्यातील कपर्दिकेश्वर यात्रा आणि कुस्त्यांचा जंगी आखाडा यावरील अशोक डुंबरे यांचा 'यात्रा स्पेशल वृत्तान्त' आणि लघुपट याद्वारे भारतभर प्रसिद्ध झाली. या यात्रेला मंत्री महोदय शशिकांत सुतार, जिल्हाधिकारी नंदलाल अशा मान्यवरांची उपस्थिती अशोक डुंबरे यांच्यामुळे लागली. यातूनच पुढे जिल्हाधिकारी नंदलाल यांच्याशी विशेष स्नेह वृद्धिंगत होत गेला आणि ओतूरला कांदा खरेदी विक्री केंद्र आणि मांडवी नदी तीरावरील गेस्ट हाऊस होण्यासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. नारायणगावची मुक्ताबाई यात्रासुद्धा महाराष्ट्रात घरोघरी पोहचवण्याचा प्रयत्न अशोक डुंबरे यांनी केला.

अशाप्रकारे निर्माता म्हणून अशोक डुंबरे यांची छोट्या पडद्यावरील वाटचाल अतिशय जोमाने सुरू होती. परंतु याचवेळी एक जबरदस्त आघात अशोक डुंबरे आणि त्यांच्या कुटुंबावर झाला. अभ्यासात अतिशय हुशार आणि बास्केटबॉल खेळातील राष्ट्रीय खेळाडू असलेला निर्माता अशोक डुंबरे यांचा एकुलता एक मुलगा राहुलचा मुंबई - पुणे रोडवर मोटरसायकल अपघातात दूर्दैवी मृत्यू झाला. राहुलच्या मृत्यूने आयुष्यातील सर्व स्वप्न भंग झाली, खरंतर डुंबरे पतीपत्नीच्या जीवनातील रसवंतीच संपली. सर्वकाही असूनही जवळ काहीच उरले नाही अशी अवस्था झाली. हा खड्डा कधीही भरून येणारा नव्हता परंतु तरीही या बिकटप्रसंगी पत्नी उज्वला यांनी स्वतःला तर सावरलेच पण अशोक डुंबरे यांनाही पुन्हा उभे केले. काही वर्षे खडतर गेल्यानंतर १९९२ साली अशोक डुंबरे यांची स्टेशन डायरेक्टर म्हणून पदोन्नती मिळून इटानगर, अरूणाचल प्रदेश येथे बदली झाली. इटानगरचे हवामान, वातावरण, तेथील आदिवासींचा नोकरीसाठी सततचा लकडा यामुळे ही तीन वर्षे तशी एकाकीपणाची गेली. परंतु १९९४ मध्ये पुणे येथे नॅशनल गेमचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने अशोक डुंबरे यांची पुन्हा मुंबईला डेप्युटी डायरेक्टर म्हणून बदली झाली. किल्लारी भूकंपाचे हवाई चित्रीकरण करण्यात केवळ अशोक डुंबरे यांनाच यश मिळाले होते. असा प्रदिर्घ अनुभव आणि आठवणींचा खजिना घेऊन दुरदर्शन निर्माते अशोक डुंबरे १९९७ साली सेवानिवृत्त झाले परंतु एक वर्षाचे Extension मिळाले. 

अशोक डुंबरे यांचा हा संपूर्ण अनुभवसंपन्न प्रवास नवोदितांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. २६ जानेवारी १९८० साली प्रजासत्ताक दिनी पुणे महानगरपालिकेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही निवडक मान्यवरांना सन्मानित केले त्यामध्ये अशोक डुंबरे यांचा समावेश होता. नॅशनल गेम आयोजनाचे अतिशय सुंदर प्रक्षेपण केल्याबद्दल अशोक डुंबरे यांना Excellent certificate देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज शिक्षण संस्था ओतूर यांचेकडूनही 'आपल्या मातीतील आपला माणूस' अशोक डुंबरे यांना 'शिवनेर भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येत्या बुधवारी ३० मार्चला अशोक डुंबरे ८४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत परंतु आजही त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. या वयातही फेसबुकवर अशोककाका भलतेच सक्रिय असतात. दुरदर्शन सेवेतील अस्सल ग्रामीण आठवणी अशोककाका दर आठवड्याला फेसबुकवर शेअर करून आपल्या फेसबुक फ्रेंडसची वाहवा मिळवतात. मी स्वतः किंवा विठ्ठल शितोळेसर, भास्करराव डुंबरे, बाळशीराम गायकवाड आम्हाला नेहमीच काकांचे मार्गदर्शन आणि पाठीवर शाबासकीची थाप लाभते हे आमचे भाग्य आहे. पत्नी उज्वला आणि मुलगी मंजिरी यांचेसह अशोककाका डुंबरे पुणे येथे आपल्या परिवारासह आनंदाने रहात आहेत. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वचा ओतूरकरांसह सर्व जुन्नरकरांनाही सार्थ अभिमान वाटतो.


             ~ लेखक ~
       संजय वसंतराव नलावडे
            धोलवड, मुंबई
    मोबाइल - ८४५१९८०९०२
"निसर्गरम्य जुन्नर-भूमी गुणीजणांची"
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
close