shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१३३) पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता : विकासाचे व्यसन..!

व्यसनमुक्त भारत फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने...

आटपाटनगरात विकास व्हावा यासाठी राजाचे प्रयत्न चालू होते. मात्र विकास करताना नक्की काय करायला हवे याचे योग्य मार्गदर्शन काही त्याला पटले नाही. त्याने जागतिक तज्ञांचा सल्ला घेतला. त्यांच्या एकांगी विकासाच्या दिशा राजाला पटल्या मात्र भविष्यात जनतेला मारक ठरल्या. 

राजाने घातकी रासायनिक उत्पादने बनविण्याचे कारखाने उभारण्याची घोषणा केली. ज्या घातकी रसायनांच्या उत्पादनावर अन्य देशांत बंदी होती, यामुळे जगामध्ये या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळणार होती, ज्यायोगे राजाला भरपूर संपत्ती मिळवणे शक्य होते. जगभर जी घातकी उत्पादने करण्यासाठी बंदी होती अशी उत्पादने तयार करण्याचे कारखाने आटपाटनगरात  मोठ्या प्रमाणात उभे राहिले. कारखाने उभारण्यासाठी हजारो मजुरांना काम मिळाले. कारखान्यांत कायमस्वरूपी हजारो व्यक्तींना रोजगार मिळाला. भरपूर पगार, पाणी आणि सुखसंपत्ती मिळाली. घातकी रासायने तयार करताना मोठ्या प्रमाणात नदीमध्ये दूषित सांडपाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली.  सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात विषारी द्रव्ये असायची. परिणामी नाल्यातून नदीत, नदीतून खाडीत जाणारे  सांडपाणी जलसृष्टी, जलाचरांना अत्यंत घातक ठरले व मोठ्या प्रमाणात नदी /खाडीमधील मासे मरायला लागले. नदीतील पाणी पिणे देखील पशुपक्षांनी नाकारले. पक्षांचा अधीवास संपत गेला. मासे व तत्सम प्रजाती नष्ट झाल्या. हवेत मोठ्या प्रमाणात घातकी रसायनाचे वास फिरू लागले. श्वसनाचे आजार, रक्ताचे विकार, त्वचेचे विकार होऊन जनता देखील रोगट झाली. चुकीच्या विकासाच्या दिशेमुळे हे सर्व झाले. राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होताना  माणसे आणि वनस्पती यांचे आरोग्य बिघडून गेले. पर्यावरणाचा ऱ्हास झाला. आता पुन्हा पर्यावरण रक्षणासाठी काय करावे या विचारात राजा सल्ले घेत आहे. प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी मंडळे निर्माण केलेली आहेत. पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावली जात आहेत.  

घातकी रसायनांमुळे बंजर झालेली जमीन, नाश पावलेली जलसृष्टी, विषारी झालेल्या नद्या, नष्ट झालेल्या पशु पक्ष्यांच्या प्रजाती, पसरलेली रोगराई आणि त्यामुळे होणारा सामाजिक विनाश याचे कारण राजाचे  विकासाचे व्यसन होय. या विनाशांतून आटपाटनगराला पूर्वस्थितीत येण्यास, सुधारण्यास प्रचंड कालावधी लागणार आहे. अशाप्रकारे विकृत विकासाचा केलेला आततायीपणा म्हणजे विकासाचे व्यसन !
प्रत्येक व्यक्तीला आसक्ती असतेच.  आसक्तीपोटी राजाने भल्याचा विचार न करता केवळ द्रव्यलोभाने विनाशाचा थर जवळ केला.  यालाच व्यसन असे म्हणावे.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व लायन्स क्लब पुणे डिजिटलच्या माध्यमातून व्यसनमुक्त भारत फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

स्पर्धेसाठी तीन ते चार मिनिटाचे व्हिडिओ दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत मागविण्यात येत आहेत. हे व्हिडिओ chandrakantshahasane@gmail.com वर पाठवावे.

स्पर्धेत उत्तम ठरणाऱ्या १० व्हिडिओजना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तसेच व्यसनमुक्त भारत फिल्म फेस्टिवल २०२२मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ.चंद्रकांत शहासने ९८८१३७३५८५
ऍड.घन:श्याम खलाटे९४२२००३३६३

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व लायन्स क्लब पुणे डिजिटल यांचा संयुक्त उपक्रम.
close