पूर्णा । प्रतिनिधी :-
पूर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील लक्ष्मण नवघरे यांच्या खून प्रकरणातील आरोपी दत्तराव नवघरे यास जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी जन्मठेप, दहा हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
२४ फेबु्रवारी २०२० रोजी अनंता दत्तराव नवघरे याने लक्ष्मण नवघरे (मयत) रा. कान्हेगाव ता. पुर्णा जि. परभणी यास त्यांची आई व पत्नी समक्ष स्वःतचे मोटारसायकलवर पूर्णेकडे घेवून गेला. तेथून त्याने दारु विकत घेवून कानखेड शिवारात एका शेतात नेवून लक्ष्मण नवघरे यास दारु पाजली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा राग धरुन आरोपी अनंता नवघरे याने लक्ष्मण नवघरे यांच्या शरीरावर धारदार चाकूने १२ ठिकाणी वार केले अन् स्वतः पूर्णा पोलिस ठाण्यात हत्यारासह हजर झाला. त्यावेळचे तत्कालीन ठाणे अंमलदार शंकर धबडे यांनी आरोपीस तात्काळ शस्त्रासह ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक जी.वाय. भुमे यांनी तपास केला. तपासात पोलिस हवालदार रत्ने यांनी मदत केली. आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले.
सरकार पक्षाचे वतीने प्रमुख सरकारी वकील ऍड. ज्ञानोबा दराडे यांचे मार्गदर्शनाखाली ऍड. आनंद गिराम यांनी बाजू मांडली. न्यायालयात मयत व आरोपी यांना शेवटी एकत्र पाहणारे व्यक्ती यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच पीएम करणारे वैद्यकीय अधिकारी यांनी मचताचे अंगावरील चाकूचे वार याने त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले. तसेच जप्त करण्यात आलेला चाकुवरील रक्त, तसेच घटनास्थळावर असणारे इतर वस्तुवरील रक्त व मयताचे रक्त यांचा रक्तगट एक आला. असा अहवाल ग्राह्य धरण्यात आला.
या प्रकरणात सोमवारी जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी आरोपी अनंता दत्तराव नवघरे रा. कान्हेगाव ता. पुर्णा जि. परभणी वय ३० वर्षे यास दोषी ठरवुन भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०२ वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात प्रमुख सरकारी वकील ऍड. ज्ञानोबा दराडे यांचे मार्गदर्शनाखाली ऍड. आनंद गिराम यांनी बाजू मांडली. तसेच पोलिस अधिक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सपोनि कपिल शेळके, सपोउपनि सुरेश चव्हाण, पोह प्रविण राठोड, पोह राजु दहिफळ, पोशि प्रमोद सुर्यवंशी यांनी काम पाहिले.

