विराट कोहली सहा महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट होता. त्याच्या शब्दाला अनन्यसाधारण महत्व होते, नव्हे तर त्याचे शब्द म्हणजे भारतीय क्रिकेटमधील ब्रम्हवाक्यच होते ! परंतु नियतीचे फासे उलट दिशेने पडायला सुरुवात झाले आणि एक एक करत त्याचे कर्णधार रूपी सर्वच कवच कुंडले गळून पडली. इतकेच नाही तर ज्या करामती बॅटच्या जीवावर क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवायचा, करोडो क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील तावीत बनला होता तीच बॅट मागील २८ महिन्यांपासून त्याच्यावर रुसली आहे. त्यामुळे त्याच्या मानमराबतीत कमालीची घसरण सुरू झाली आहे. इतकेच नाही तर मागील सात वर्ष जे खेळाडू त्याच्या हाताखाली एक निव्वळ खेळाडू म्हणून खेळायचे आज त्याच खेळाडूंच्या नेतृत्वात खेळण्याची नामुष्कीमय वेळ विराट कोहलीवर आली आहे.
इतकेच नाही तर ज्यांची हिम्मतही होत नव्हती असे काही लोक त्याच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे राहीले आहेत. वादविवाद तर जर त्याच्यासाठी तर आता खेळणंच होऊन बसले आहेत. मागील काही दिवसांत अनेक वेळा तो मोठ्या विवादात अडकलही होता. या साऱ्या गोष्टींचा त्याच्या खेळावर व खास करून मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे. वरकरणी तो संघातील सर्वात तंदुरूस्त व चपळ खेळाडू दिसत असला तरी त्याच्या अंतर्मनात नेमकं काय चाललं याचा ठाव कुणालाच लागत नाही. प्रत्यक्ष मैदानात खास करून फलंदाजी करताना सुरूवात बऱ्यापैकी करतो, फटकेही लाजवाब मारतो. मात्र अचानक खेळण्यातील स्वारस्य संपल्यासारखे एखादा बेजबाबदार फटका मारून बाद होतो. त्याची एकाग्रता हि त्याची आजवरची सर्वात मोठी जमेची बाजू होती, मात्र आज तीच बाब जमविणे त्याच्यासाठी कठीण होऊन बसले आहे.
फलंदाजी करताना त्याच त्याच चुका करणे, कुठलीही ख्याती नसलेल्या नवख्या गोलंदाजांना आपली बहुमूल्य विकेट भेट स्वरूपात दान करणे, आजपर्यंत न खेळलेले फटके खेळण्याचा आततायीपणा करणे या बाबी विराट कडून सतत होताना दिसतात. मैदानावर. सतत हसत खेळत असणारा, अल्लड मुलांसारखे चाळे करणारा कोहली मैदानावर चैतन्य हरपलेल्या एखाद्या निर्विकार मुर्तीसारखाच भासत आहे. पूर्वी मोठी खेळी खेळून बाद होऊन परतना समस्त स्टेडीयम उभे राहून मानवंदना देत असतानाचं चित्र आता इतिहास जमा झाल्यासारखं वाटत आहे. आता त्याचे कमी धावात, लवकर, आल्यापावली परतणे नित्याचेच झाले असून शुन्यावर बाद होणे तसेच बाद झाल्यानंतर निराश मनाने खाली मान घालून, बॅट काखेत घालून अथवा जमीनीवर नांगर टाकल्यागत जाताना बघून त्याच्या चाहात्यांचे डोळे पाणावल्या वाचून नक्कीच राहात नसतील !
सध्या श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर असून त्यांच्या विरूद्ध झालेल्या तीन टि-२० मालिकेत त्याची बॅट खामोशच होती. परंतु त्यानंतर सुरू झालेल्या कसोटी मालिकेतही ती मुकीच राहिली. खास करून त्याच्या कसोटींच्या शतकासाठी प्रेक्षकांना मैदानात येण्याची मुभा देण्यात आली, जेणेकरून त्याच्या डोक्यात साचलेले मळभ निघून जाऊन प्रेक्षकांच्या जोरदार प्रोत्साहनाने तो रिचार्ज होऊन धावा बरसेल असे वाटत होते. परंतु मोहाली पाठोपाठ त्याच्या आवडत्या बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडीयमवरही त्याच्या बॅटला सूर गवसला नाही. दुसरीकडे संघातले नवोदित खेळाडू धावांवर धावांचे इमले रचत असताना हा सत्तर शतकांचा मालक एखाद्या कंगाल व्यापाऱ्यासारखा भासत आहे.
डिसेंबर २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध मुंबईत द्विशतकी खेळी केल्यानंतर त्याची कसोटीतील धावांची सरासरी ५० च्या वर गेली होती. एवढी सरासरी मोठया यशस्वी फलंदाजाची मानली जाते. परंतु सध्या सुरू असलेल्या डे नाईट कसोटीतील खराब कामगिरीनंतर ती पन्नासच्या खाली गेली असून ती बाब त्याच्या लौकीकाच्या विपरीत बनली आहे. विशेष म्हणजे मागच्या ७४ आंतरराष्ट्रीय डावात त्याला शतक न ठोकता आल्याने त्याच्या कामगिरीचा आलेखही ढासळत असून सचिन तेंडुलकरच्या नावे असलेले सर्वाधिक धावांचे व शतकांचे शतक करण्याचा विक्रम मोडण्याची संधीही कोहलीची हुकण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
इतकेच नाही तर त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या धावांचा ओघ असाच अटत राहीला तर येत्या काही दिवसात त्याचेच घनिष्ठ सहकारी राहिलेल्या चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणेच्या रस्त्याने चालण्याची कोणालाही नकोशी असलेली वेळ त्याच्यावरही येऊ शकते. त्यासाठी कोहलीने आपले मन विराट करून आपल्या खेळात, तंत्रात, मानसिकतेत, एकाग्रतेत आलेल्या उणीवा दूर करण्यासाठी अगदी तळाला जाऊन शक्य तेवढे प्रयत्न करून आप लहानपणीचे प्रशिक्षक, जुने मित्र, सहकारी यांच्याशी चर्चा करणेही फायदेशीर ठरू शकते. हाय प्रोफाईल लाईफ, कोचेस, मेडिकल स्टाफ, सपोर्टींग स्टाफ यांच्या विळख्यातून काही दिवस बाहेर राहीला तर क्रिकेट जगताला जुना विराट नव्या रूपात जुन्या धाटणीने खेळताना पुन्हा दिसू शकतो. यासाठी कोहलीने थोडासा कमीपणा घेण्यात काहीच कमी नाही. कारण याच्यातच त्याचे व भारताचे भाग्य सामावले आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

