गेल्या सात दिवसांपासून वाट बघतोय ... जेवढं डोकं चित्रपट पाहून सुन्न नव्हतं झालं त्यापेक्षा कित्येक हजार पटीने आता ७ दिवसांनी झालंय. शुक्रवारी ११ मार्च रोजी ३.५५ कोटी एवढी ओपनिंग मिळालेल्या कश्मीर फाईल्स ने दिवसागणिक एका चळवळीचे रूप धारण केले आणि काल म्हणजे बुधवार १६ मार्च रोजी एका दिवसात १९ कोटी एवढं कलेक्शन केलंय. सहा दिवसात सिनेमाचा भारतातील बॉक्स ऑफिसवरील आकडा ७९ कोटींचा आहे तर जगभरातील आकडा ८७ कोटींचा. आज आठवडा पूर्ण झाल्यावर सिनेमा १०० कोटींच्या घरात असणार हे निश्चित. तसं तर मी सिनेमा व्यवसायाशी निगडीत असल्याने आणि आमच्या सिनेमा वेब पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक सिनेमांच्या आकडेवारीवर आम्हाला नजर ठेवावी लागते हा भाग वेगळा. आज सात दिवसांनी इतकं सगळं यश सिनेमाला मिळूनही मग माझं डोकं का सुन्न झालंय असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहेच. सांगतो.
शेकडो हिंदी सिनेमातून आपण एक सीन हमखास पाहिलेला असणार. सिनेमाचा क्रूर खलनायक नायकाची आई/बाप अथवा भाऊ यांची भर रस्त्यावर हत्या करतो.. नायकाची बहीण असेल तर तिची सरे आम इज्जत लुटली जाते किंवा हत्या होते. हे होत असतांना बहुतांश प्रसंगी तो नायक मात्र तिथे एक तर हजर नसतो, किंवा उशीरा येतो. मग आल्यावर तो आपल्या आईला/बापाला/भावाला/बहिणीला छातीशी लावून रडत असतांना तिथे उभ्या असलेल्या लोकांना एक प्रश्न विचारतो, ये सब किसने किया? क्या आपने उन्हे देखा? क्या आप उन्हे पहचान सकते हो? कौन थे वो लोग ? इत्यादी इत्यादी. खलनायकच्या भीतीने कोणी काहीही बोलायला तयार नाही हे पाहून मग हा नायक उभ्या पब्लीकला दहा-पंधरा मिनिटांचं एक लेक्चर देतो... मानवतावादावर. तुम्ही म्हणाल या सीनचा आणि कश्मीर फाईल्स चा किंवा तुमचं डोकं सुन्न होण्याचा काय संबंध? संबंध या सीनचा नसला तरी या गप्प राहण्याच्या मानसिकतेचा आहे. तुम्ही म्हणाल कोण गप्प आहे? उलट भारतभर एका चळवळी मध्ये रुपांतरीत झालेल्या या सिनेमाबद्दल सर्वत्र इतकं भरभरून लिहिलं जातंय की ज्याची काही सीमा नाही. मग झालंय काय ते नेमकं सांगतो.
झालंय त्या हिंदी सिनेमाच्या सीनच्या अगदी उलट. ज्यात हिरोचा बाप किंवा आईचा खून झाल्यावर गप्प तमाशा बघणारी मंडळी आज भरभरून बोलायला लागली आहेत. ती सर्व मंडळी म्हणजे आज कश्मीर फाईल्स बघणारे प्रेक्षक असे समजा. आज सोशल मीडियाचं माध्यम हातात उपलब्ध असण्याचं एक निमित्त असेलही पण लोकं बोलतायत. मग गप्प कोण आहे? गप्प आहे स्वतः सिनेमाचा नायक. म्हणजे आजचे बहुतांश बॉलिवूड. अगदी बोटावर मोजता येतील अशी आठ-दहा नावं वगळता आज अख्खे बॉलिवूड कश्मीर फाईल्स वर व त्याला मिळत असलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल मूग गिळून नव्हे तर स्वतः मध्ये असलेली थोडीफार लाज/शरम सर्व गिळून गप्प आहे. वर उल्लेख केलेल्या हिंदी सिनेमामधील हिरोज गप्प आहेत जे सिनेमाच्या पडद्यावर आपल्याला मोठ्या मोठ्या गप्पा मारतांना दिसतात. देशप्रेम शिकवतात. अन्यायाविरुद्ध पेटून उठा हे सातत्याने सांगतात. आज ते सर्व गप्प आहेत. बॉलिवूडच कशाला आपल्या मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील किती लोकं कश्मीर फाईल्स बद्दल बोलत आहेत? स्वतःला पुरोगामी म्हणवणारी व गेली कित्येक वर्षे सिनेपत्रकारिता करणारी समीक्षक मंडळी सुद्धा आज कुठल्या बिळात लपून बसली आहेत माहीत नाही. एरवी ट्विटरवर तैमूर चे हागले मुतलेले फोटो पोस्ट करणारी व 'मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली' या कॅटेगिरी मध्ये असणारी ही कपूर-खान-जोहर जमात आज कश्मीर फाईल्स बद्दल गांधींच्या तीन माकडांप्रमाणे डोळे/कान आणि तोंडावर हात ठेऊन बसले आहेत. का? आणि हो ...का गप्प आहेत हे विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. कारण प्रश्न विचारणारे तेच लोकं आहेत जे तुमच्या तद्दन टुकार सिनेमांवर वर्षभर लाखो पैसे उधळत असतात. आज तेच प्रेक्षक जर कश्मीर फाईल्स ला डोक्यावर घेत आहेत तर त्या सिनेमाबद्दल दोन कौतुकाचे शब्द बोलायला तुमची का फाटते? असं काही आहे का की ते शब्द बोलण्याने दुबईचा तुम्हाला आणि तुमच्या सिनेमांना फंडिंग करणारा बाप तुमची ठासेल याची भीती आहे तुम्हाला? का याची भीती वाटते की कश्मीर फाईल्स चे कौतुक केल्यास एखादा समुदाय आपल्यावर नाराज होईल आणि आपल्या आगामी सिनेमांकडे पाठ फिरवेल? काही तरी नक्की आहे याची भीती आहे या बॉलीवूडला. बरं हे मी केवळ कश्मीर फाईल्स चा अनुभवातून बोलतोय असेही नाही. गेल्या वर्षी अयोध्येत राम मंदिराच्या भूमी-पूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा ही सर्व मंडळी अशीच गप्प होती. सुशांत सिंग राजपूत च्या प्रकरणातही अशीच गप्प होती. राम मंदिर आणि सुशांत सिंग यावेळची कारणे एकवेळ मी समजू शकतो. पण कश्मीर फाईल्स मध्ये दाखविण्यात आलेला घटनाक्रम हे काही केवळ एका धर्माविरुद्ध केलेले षडयंत्र होते असे नाही तर भारताविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. तेही उघड उघड. त्यामुळे यावरही गप्प राहणे म्हणजे सरळ सरळ देशाच्या विरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या लोकांना तुम्ही मूक पाठिंबा देत आहात असा अर्थ आम्ही का काढू नये?
झुंड सोबतच फेब्रुवारी महिन्यात आलेले पावनखिंड, गंगुबाई हे सिनेमे मी काही अपरिहार्य कारणामुळे बघू शकलो नाही व त्याचे समीक्षण सुद्धा करू शकलो नाही. झुंड मात्र बघणार आहेच व त्यावर लिहिणार पण आहे. पण झुंड च्या प्रदर्शनाच्या दरम्यान सुद्धा मला याच सर्व मंडळींची ही अशीच शांतता खटकत होती. खासकरून मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील सो कॉल्ड स्वतःला प्रस्थापित समजणारी मंडळी. नागराज सारखा आपला मराठी माणूस अमिताभ ला घेऊन हिंदी सिनेमा काढतो याचे जाहीर कौतुक किती मराठी स्टार्स ने केले? इथे मला अजिबात असे म्हणायचे नाहीए की कश्मीर फाईल्स अथवा झुंड या सिनेमांची तुम्ही तारीफच केली पाहिजे. नाही. अजिबात नाही. तुम्हाला नसेल आवडला तर त्या कलाकृतीमधील दोष दाखविण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तो तरी वापरा. नरो वा कुंजरो वा ही भूमिका घेऊन तुम्ही काय साध्य करीत आहात?
आज बॉलिवूडमधील सर्व सुपरस्टार मंडळींसाठी, आघाडीचे निर्माते/दिग्दर्शक व सिनेमातील स्वतःला ट्रेड पंडित म्हणवून घेणाऱ्या समीक्षकांसाठी कश्मीर फाईल्स चे हे यश म्हणजे एक कधीही न उलगडणारे कोडे आहे. ना त्यात कोणी मोठा स्टार आहे (मिथुन हा काही सिनेमाचा नायक नाही), ना त्यात सुपरहिट गाणी आहेत, ना त्यात आयटम नंबर आहे, ना विनोद आहे, ना फिल्मी डायलॉग आहेत जे ऐकून प्रेक्षक सिनेमागृहात शिट्ट्या आणि टाळ्या वाजवतील. म्हणजे थोडक्यात वर्षानुवर्षे जी समीकरणे वापरून ही सर्व निर्माते मंडळी आपले सिनेमे हिट करायची असे काहीही यात नसतांना हा सिनेमा रोज यशाचे नवे कीर्तिमान प्रस्थापित करूच कसे काय शकतो याचे उत्तर शोधण्यात ही जमात आज व्यस्त आहे. यांची डोकी पुरती चक्रावली आहेत. यांना काहीच सुचत नाहीए की हे नेमकं चाललंय तरी काय? आणि हे असं होऊच कसं शकतं?
मला सिने समीक्षा सुरु करून आता २० वर्षांहून अधिक काळ झालाय. विवेक अग्निहोत्री यांच्या ताश्कंद फाईल्स सिनेमाचे मी केलेले परीक्षण खुद्द विवेकजींनी त्यांच्या फेसबुक वॉलवर शेअर केले होते. यात स्वतःचे कौतूक करण्याचा उद्देश नसून हे सांगणे आहे की या माणसाला वर्तमान भारताच्या अशा प्रेक्षकांची नस सापडली आहे जो प्रेक्षक इतिहासातील मुद्दाम दडवून ठेवलेल्या सत्याच्या शोधात आहे. माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूभोवती असलेले संशयाचे वलय या माणसाने ताश्कंद द्वारे प्रेक्षकांसमोर मांडले होते. आज भारतात स्वतःला सो कॉल्ड लिबरल, मानवतावादी, पुरोगामी म्हणवणारी लबाड जमात अस्तित्वात आहे. वैचारिक स्वातंत्र्याच्या आझादी च्या घोषणेआडून ही जमात देशाच्या विरुद्ध एक षडयंत्र रचते आहे. मागे एकदा जेएनयू मध्ये ही आझादी गॅंग घोषणाबाजी करत होती तेंव्हा बॉलिवूडमधील आज गप्प असलेल्या जमातीचे प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण त्याठिकाणी जाऊन पोहोचली होती व या आझादी गॅंगला समर्थन देऊन आली होती. दीपिका चा छपाक नावाचा सिनेमा तेंव्हा प्रदर्शनास सज्ज होता व त्याच्या प्रमोशनसाठी तिने या जेएनयू मधील इव्हेन्ट चा वापर केला होता. तापसी पन्नू नामक अभिनेत्रीचा थप्पड सिनेमा प्रदर्शित होत असतांना तिनेही या गँगचा सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापर केला व या गॅंगला उघड समर्थन दिले होते. कश्मीर फाईल्स मध्ये याच आझादी गॅंग चा पर्दाफार्श विवेक अग्निहोत्री यांनी केलाय. जेएनयू मधील त्या आझादी गँगच्या समर्थनार्थ जितके बॉलिवूड कलाकार तेंव्हा उभे राहिले होते त्याच्या ५% सुद्धा आज कश्मीर फाईल्स बद्दल बोलतांना दिसत नाहीये. ही अतिशयोक्ती अजिबात नाहीए. कारण मी स्वतः सिनेमाचे एक वेब पोर्टल चालवतो व त्यामुळे माझे याकडे जवळून लक्ष असते. कश्मीर फाईल्स चे दैदिप्यमान यश म्हणजे दीपिकाला, तापसीला व त्यांच्या निमित्ताने समस्त बॉलीवूडला नियतीने उलट फिरून मारलेली जोरदार थप्पड आहे असे मला वाटते. बॉलिवूडमधील स्वतःला प्रस्थापित समजणाऱ्या, बॉलिवूड म्हणजे स्वतःच्या बापाची जागीर समजणाऱ्या, वर्षानुवर्षे पडद्यावर स्वतःला महानायक/किंग/सुपरस्टार म्हणून मिरविणाऱ्या अशा समस्त मंडळींना बसलेली. इस थप्पड़ गूँज बहोत जोरदार है. इतकी जोरदार आहे की कश्मीर फाईल्स मध्ये कश्मिरी पंडिताची अजरामर भूमिका साकारणाऱ्या अनुपम खेर यांना त्यांनीच साकारलेला कर्मा मधील डॉ डैंग आठवला असेल जो दिलीप कुमारला म्हणतो, "डॉ डैंग को पहेली बार किसीने थप्पड़ मारा है, इस थप्पड़ की गूंज सुनी तुमने?, अब इस गूंज की गूंज तुम्हे सुनाई देगी राणा, जिंदगी भर सुनाई देगी"
अखेरीस कश्मीर फाईल्स सिनेमाच्या शूटिंग च्या दरम्यान घडलेला एक खरा किस्सा सांगतो व माझ्या लेखणीला आराम देतो. हा किस्सा विवेक अग्निहोत्री यांनी आज ट्विट केलाय. सिनेमाचे शूटिंग डेहराडून इथे चालू होते. सिनेमात सुरुवातीलाच एक सीन आहेत ज्यात अतिरेकी फारूक बिट्टा (चिन्मय मांडलेकर) हा रस्त्यावर उभा राहून भारतविरोधी घोषणा देतो. त्या सीन मध्ये बिट्टा सोबत उभे असलेले इतर कश्मिरी लोकं म्हणजे डेहराडून शहरातील रहिवाशी होते. सिनेमातील भारत विरोधी घोषणा ऐकून शूटिंग मध्ये आनंदाने सहभागी असलेल्या नागरिकांनी नंतर यावर जोरदार आक्षेप घेतला आणि विवेक यांना शूटिंग थांबविण्यास सांगितले. शूटिंग बंद पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. विवेक यांना उपस्थित नागरिकांना समजावून सांगावे लागले की हा चित्रपट भारत विरोधी नाही. एवढ्यावर नागरिक ऐकत नाही हे पहुन चिन्मय मांडलेकर ला आपल्या मराठी सिनेमातील त्याने साकारलेल्या शिवाजी च्या भूमिकेचा फोटो उपस्थित नागरिकांना दाखवावा लागला. अखेरीस नागरिकांनी एका अटीवर शूटिंगला परवानगी दिली. प्रत्येक वेळी शूटिंग संपल्यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री व खासकरून चिन्मय मांडलेकर ने 'भारत माता की जय' च्या घोषणा द्यायच्या. मग कुठे शूटिंग सुरळीत पार पडले.
हा आजचा भारत आहे. जो विवेक यांनी नेमका हेरला आहे.
©अजिंक्य उजळंबकर

