shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्नेह राणा झुंजार महिला क्रिकेटपटूची थरारक कहाणी



              सर्वप्रथम जागतिक महिला दिना निमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या लेख प्रपंचाला सुरुवात करूया. आज आपण क्रिकेटच्या मैदानावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःच्या कर्तबगारीने भारतीय महिला संघासह समस्त देशवासीयांना आनंद मिळवून देणाऱ्या स्नेह राणा या अष्टपैलू खेळाडू विषयी जाणून घेणार आहोत.

              सध्या न्यूझिलंडमध्ये महिलांची एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा सुरू असून रविवारी भारताचा सामना कट्टर पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी झाला. तसं बघाल तर भारताचा पाकविरूद्धचा रेकॉर्ड अतिशय उत्तम आहे. भारताने या सामन्यापूर्वी पाकविरूध्द खेळलेले दहाचे दहा सामने जिंकले होते. मात्र या सामन्याची कहाणी जरा वेगळेच वळण घेण्याच्याच्या मुडमध्ये होती. भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली.  स्मृती मंधानाने एक झंझावाती अर्धशतक ठोकले खरे परंतु ती बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला व सर्व प्रमुख फलंदाज तंबूत परतल्याने पाकिस्तान या सामन्यात चमत्कार करतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 
                सहा बाद एकशे तेरा अशा संकटसमयी अनुभवी अष्टपैलू खेळाडू स्नेह राणा मैदानात उतरली आणि सामन्याचा नूरच बदलून गेला. पूजा वस्त्राकर सोबत सातव्या गड्यासाठी अवघ्या ९६ चेंडूत १२२ धावांची दमदार भागीदारी करत स्नेेहने ४८ चेंडूंचा सामना करत नाबाद ५३ धावा ठोकून भारताला २४४ अशी उल्लेखनीय धावसंख्या उभी करून दिली. त्यानंतर स्नेह राणाने गोलंदाजीतही आपला जलवा दाखवत पाकिस्तानचे षटकात २७ धावा देत दोन महत्वपूर्ण बळी घेऊन पाकिस्तानवर १०७ धावांचा विजय मिळवून पाकविरूध्द अजिंक्य राहाण्याची भारताची महान परंपरा सुरू ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली.
                 सद्यस्थितीत स्नेह राणा भारतीय क्रिकेटचा अविभाज्य घटक असली तरी यापूर्वी परिस्थिती अशी नव्हती. उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथील मुळ रहिवाशी असलेली स्नेह राणाची कारकिर्द अतिशय चढउताराची राहीली आहे. सन २०१४ मध्ये वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर दुखापतींनी तिला घेरले. सन २०१६ नंतर तिला संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. या दरम्यान ती फक्त सातच एकदिवसीय सामने खेळली होती. मात्र त्यानंतर तीने हिम्मत न हारता कठोर मेहनत घेऊन स्थानिक क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात पुन्हा एकदा प्रवेश केला.
               जून २०२१ मध्ये तीची भारताच्या इंग्लंड दौऱ्याकरीता कसोटी संघात निवड झाली. परंतु त्यापूर्वी दोन महिने अगोदर तिच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या तिच्या वडिलांचे निधन झाले. मात्र स्नेहने खचून न जाता मोठ्या हिमतीने उभे राहून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने कठोर मेहनत घ्यायला सुरुवात केली.
               १६ जून २०२१ रोजी ब्रिस्टल येथे इंग्लंडविरूध्द कसोटी पदार्पण करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या पहिल्याच कसोटीत खेळताना स्नेहने आपल्या अष्टपैलू त्याची झलक समस्त क्रिकेट जगताला दाखवून दिलीच. शिवाय त्या सामन्यात भारतावर ठाकलेले पराभवाचे सावट दूर करून भारताची इज्जत राखून सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले. त्या सामन्यात महत्वाच्या क्षणी स्नेहने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ८० धावांची नाबाद खेळी साकारत तानीया भटसह नवव्या विकेटसाठी विक्रमी १४४ धावांची भागीदारी करून भारताचा हमखास होणारा पराभव वाचविला. तत्पूर्वी स्नेहने इंग्लंडच्या पहिल्या डावात आपल्या फिरकीचा हिसका दाखवून चार इंग्लिश फलंदाजांना तंबूत धाडले होते.
                  स्नेह राणाची क्रिकेट कारकिर्द छोटीशी असली तरी प्रभावी आहे. शिवाय ती पूर्वीपेक्षा परिपक्व झाल्याचे दिसत असून भारताला तिच्याकडून आणखीही खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. स्नेह राणा आपल्या कर्तव्यात कुठलीही कसर सोडणार नाही अशी अपेक्षा करून आपण तिला तिच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा देऊया !
जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close