पूर्णा । वार्ताहर :-
पालम तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या डिग्रस बंधार्यातून पाणी अखेर ६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पाणी सोडले जाणार आहे. यासाठी तालुका प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त करून नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचाल गोयल यांनी ३ मार्च रोजी पत्र काढून दिले आहेत.
पालम तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात डिग्रस बंधार्यात सध्या ४८ दलघमी एवढा पाणीसाठा करण्यात आला आहे. धानोरा काळे येथील नवीन पुलाचे काम करण्यासाठी या ठिकाणी केवळ १० फूट पाणी साठा ठेऊन उर्वरित पाणी सोडून देण्यात यावे यासाठी मागील २८ जानेवारीपासून शासकीय पातळीवर हालचाली वेगात सुरू होत्या.
नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी गोयल यांना पत्र पाठवून पाणी सोडण्यासाठी परवानगी मागितली होती. ३ मार्च जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी गोयल यांनी उपलब्ध पाणी साठ्यापैकी २८.२६८ दलघमी पाणी सोडून देण्यात यावे असा निर्णय घेतला आहे. ६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता चोख पोलिस बंदोबस्तात बंधार्याचे ८ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदा पात्रात जेमतेम १४ दलघमी पाणी साठा शिल्लक राहणार आहे.

