केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते 'आदर्श सभापती' या राज्यस्तरीय पुरस्काराने पुष्पाताई रेडके सन्मानित.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने देण्यात आले राज्यातील टॉप ५ 'आदर्श पंचायत समिती सभापती' पुरस्कार.
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या राज्यातील टॉप ५ 'आदर्श पंचायत समिती सभापती' पुरस्कार इंदापूर पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या व माजी सभापती पुष्पाताई रेडके यांना देण्यात आला. सोमवार दि. ७ मार्च रोजी पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील (पंचायतराज मंत्री. भारत सरकार) यांचे हस्ते रेडके यांना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील त्यांनी ही निवड केली आहे. संघटनेच्या वतीने यावर्षी पासून हा पुरस्कार सोहळा सुरू करण्यात आला आहे.
पुष्पाताई रेडके या २०१७ साली बिजवडी गणातून निवडून आल्या आहेत. इंदापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी वयाच्या २५ व्या वर्षी त्या सर्वात तरुण महिला सभापती व इंदापूर तालुक्यातील सर्वात पहिल्या महिला धनगर सभापती म्हणून कामकाज पाहिले आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांनी २५ जुलै २०१८ ला १००० शिक्षकांचा प्रशिक्षण मेळावा पडस्थळ या गावी घेतला होता. कालठण, गंगावळण, टाकळी, सुगाव, आजोती, पडस्थळ,पिंपरी खुर्द येथे ९०० महिलांचा मेळावा घेतला. २०२० साली सभापती पदावरती असताना कोविड काळात संपूर्ण तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन वैद्यकीय यंत्रणा सतर्क ठेवली व लोकांना सेवा पुरविली.
पुणे जिल्हा परिषदेचा 'आदर्श शाळा पुरस्कार' पुष्पाताई रेडके या प्रतिनिधीत्व करीत असलेल्या बिजवडी गणास सलग २ वर्षे मिळाला. जि. प.प्राथ.शाळा काळाशी. (२०१७) व जि. प. प्राथ.शाळा बिजवडी. (२०२८) यावरून त्यांची शिक्षणाविषयीची ओढ दिसून येते. बिजवडी गणातील ९ जि.प.प्राथमिक शाळा आय एस ओ नामांकन प्राप्त आहेत. माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील व जिल्हा परिषद सदस्या अंकिताताई पाटील यांचे त्यांना नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे.
काल सोमवारी दि.७ मार्च रोजी सायं.६वा. पुण्यात येरवडा येथील विमानतळ मार्गावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, असोसिएशन चे अध्यक्ष कैलास गोरे पाटील, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, उदय बने, राज्य उपाध्यक्ष सुभाष घरत, सरचिटणीस जयमंगल जाधव, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, वीरधवल जगदाळे, लातूर जि. प अध्यक्ष राहुल केंद्रे, वर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे, गडचिरोली जि. प अध्यक्ष अजय कंकडालवार, ठाणे जि. प अध्यक्ष सुभाष पवार, जालना जि. प अध्यक्ष महेंद्र पवार, नगरसेवक परिषदेचे अध्यक्ष राम जगदाळे, कार्याध्यक्ष आशिष गोयल, इंदापूर पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्पाताई रेडके, कडेगाव पं. स सभापती मंदाताई कारंडे, खेड पं.स सभापती ज्योती आरगडे, रत्नागिरी पं.स सभापती लिला घडशी व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य हजर होते.
जिल्हा परिषद,पंचायत समिती मधील कामाचा अनुभव, विविध प्रशिक्षणातील सहभाग, मतदार संघात केलेली विकास कामे, बैठकां मधील उपस्थिती, सभाग्रह कामकाजातील सहभाग व प्रभाव, केलेल्या कामाची प्रसारमाध्यमांनी व वर्तमानपत्रांनी घेतली दखल, प्रत्यक्षात केलेल्या स्थळ भेटीचा अहवाल व फोटो, राबवलेल्या नाविन्यपूर्ण योजना यां निकशा मधून, संपूर्ण राज्यातून टॉप ५ आदर्श सभापतींची निवड करण्यात आली आहे.

