शकुंतला मखरे यांचा सामाजिक, राजकीय प्रवास..महिलादिन विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी:राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माता रमाई, माता भिमाई ह्या महामातांना आदर्श मानून, त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन सामाजिक कार्यात नेहमीच आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या, दीन- दुबल्यांचे अश्रु पुसणाऱ्या, शांत, संयमी, कुटुंबवत्सल, प्रसंगी आक्रमक, स्पष्टवक्त्या, सडेतोड वृत्ती आणि निर्भिडपणा हा बाणा असलेल्या आदरणीय काकींचा सामाजिक राजकीय प्रवास..
जनमानसात काकी म्हणून परिचित असलेल्या यांचा जन्म १४ जानेवारी १९५६ रोजी हिंगणगाव ता.इंदापूर येथे झाला. काकींचं इ. ७ वी. पर्यंत शिक्षण झालं. आणि पुढे इंदापूर येथील हरहुन्नरी आणि वादळी व्यक्तिमत्त्व असलेल्या रत्नाकर मखरे (तात्या) यांच्याशी त्या दि.२६ मे १९७४ रोजी विवाहबद्ध झाल्या.
कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अशा स्थितीतही आपल्या पतीला साथ दिली. पत्नीचं कर्तव्य बजावलं. काकींनी मुलांवर उत्तम संस्कार केले आहेत. तसेच काकींच्या तीनही सुना ह्या उच्च शिक्षित आहेत. काकींना मुलगी नाही,त्यामुळे सुनांना स्वतः च्या मुलींसारखी वागणूक देतात. त्यांच्याशी कोणताही दुजाभाव काकी करत नाही. कोणतीही परिस्थिती हसत स्वीकारणारी कर्तृत्वशालीन खंबीर स्री म्हणजे काकी होय.त्या काळात महिला राजकारणात फारशा उतरत नव्हत्या. परंतु ज्यांना काळाच्या भाळावर नाव कोरायचं असतं त्यांना काळ कधीच आडवा येत नाही. तर कर्तृत्ववान माणसाचे स्वागत करण्यासाठी काळ सुद्धा सज्ज होऊन उभा राहत असतो. काकींनी नगरसेविका पदापासून राजकारणाचा आरंभ केला. राजकारण हे व्यक्तिगत लाभासाठी नसून ते समाज हितासाठी आहे, अशी ज्यांची धारणा असते. त्यांचे धोरणेही निश्चित चांगली असतात. म्हणूनच आपल्या मातीशी नाळ असलेल्या काकींनी महिलांसाठी त्यांच्या हितासाठी विविध योजना आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात आणल्या. पुढे काकींनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आपल्या नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.इंदापूर शहरातील आंबेडकर नगर, साठेनगर व परिसरातील स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम व्हाव्यात म्हणून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना काकींनी आधार दिला. निराधार, वृद्ध महिलांना मदत करणारी व मायेची सावली देणारी निराधारांची माय.. काकी. सर्वांनाच हे दातृत्व, कर्तृत्व भगवंत देत नाही, पण अशी काही माणसं काकींच्या रूपात क्वचित सापडतात. अंधाराला चिरून वर आलेल्या या लेकीनं संघर्ष नुसता झेलला नाही, तर पेललाय..
अनेक चढ-उतार पाहिले ज्यांच्या पापणीआड सामान्य माणसाच्या वेदना असतात. त्यांच्याच नजरेतून कळवळा, कणव बरसत असते. काकीच्या नजरेत जशी जरब आहे. तसाच करूणा भावही आहे. कणखर मनाच्या तळाशी वात्सल्यही आहे.काकी घराची कणा आहेत. त्यांच्यातल्या ममत्वाचे दर्शन घडत असते.आम्हां सर्वांची प्रेरणा आणि इंदापूर शहरातील पीडित, वंचित, आबालवृद्धांची सावली, मायेची,ममतेची माऊली आहेत. कोणाही सामान्याची काळजी करणारी आई आहे.
काकींनी जीवनात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. यशाची शिखरे अनुभवले आहे.. मानसन्मान मिळाले आहेत.पती दिवंगत रत्नाकर मखरेंच्या पश्चात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्ष पदाची धूरा सक्षमपणे पेलत आहेत. शाळेतील मुला- मुलींचे आपण पालक आहोत,याचे भान प्रत्येक वेळी स्वतः जपताना आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनाही देत असतात. वसतिगृहातील सुखसोयी, जेवण, स्वच्छता या आणि अशा कितीतरी बारीक सारीक गोष्टींवर कटाक्षाने आक्कांचे लक्ष असते.वसतिगृहात राहणारी मुलं-मुली हे आपले आहेत असे त्या सतत सांगत असतात. मनमिळावू स्वभावाच्या आणि प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या काकी ह्या वटवृक्षासारखी सावली आहे.
विविध महिला बचत गटांची संकल्पना असो वा ! महिला सक्षमीकरणासाठी उचललेले पाऊल असो, काकींनी प्रत्येक वेळी सामान्य माणसाच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला त्यांच्या कृतीतून दिसून येतो. समाजात वावरताना कुटुंब आणि समाजकारणातही त्यांनी आपला एक वैशिष्ट्यपूर्ण आगळा वेगळा ठसा उमटवला आहे.पतीच्या पश्चात काम करत असताना दगदग होत असूनही न थकता न कंटाळता त्या अजूनही अत्यंत सक्षमपणे आणि कार्यतत्परतेने आपली जबाबदारी अविरतपणे पार पाडताना दिसतात. जगताना सर्वसामान्य माणसाला ज्या अडचणी येतात,ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्या गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या. त्यांनी आव्हानांना आणि संकटांना आपल्या पतीच्या पश्चात हिम्मतीने तोंड दिलं.कोणत्याही कठीण प्रसंगी शांत राहून निर्णय घेण्याची कला काकींकडून समजून घ्यावी. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे असायला हवे "हम भी किसी से कम नही !" हा विश्वास नेहमी काकी महिलांच्यामध्ये जागवत असतात . पतीच्या प्रत्येक लढ्यात/ संघर्षात खांद्याला खांदा लावून समर्थपणे काकींनी साथ दिली.
काकींनी स्व-मालकीची जमीन मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टला दिली असून, त्या जागेत भव्यदिव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन नावाने एक सुसज्ज असे शैक्षणिक संकुल दिमाखात उभे आहे. हे शैक्षणिक संकुल उभे राहण्यामागे काकींचे मोलाचे योगदान आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक संकटे वादळासारखी आली. पण काकी खचल्या नाहीत. ज्या झाडांची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली असतात ती वादळातही भक्कमपणे उभी असतात. काकींनी वादळांनाही ताकदीने शांत केलं.आपल्या पतीकडून मिळालेल्या राजकीय डावपेचांचा वापर त्या मोठ्या हिंमतीने करतात.काकींचे थोरले सुपुत्र ॲड. राहुल मखरे हे संस्थेची कार्यकुशलतेने कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
जागतिक महिला दिना निमित्त *आदरणीय काकींनां हार्दिक शुभेच्छा* !!
-: *संकलन*
*श्री.नानासाहेब सानप*

