shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्त्रियांचा आदर म्हणजेच...स्वराज्याला जागलो.!


               महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस "जागतिक महिला दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे, स्त्री म्हणजे उपभोगाचे व कष्टाचे साधन!असा समज या समाजात रूढ झालेला होता. प्राचीन काळात स्त्रिया आपल्या अधिकारापासून वंचित होत्या,आता मात्र आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क, याबाबत त्यांच्यामध्ये जनजागृती झाली आणि स्त्रीवादाचा जन्म झाला.
          त्याच वेळी भारतातील अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली, त्यामध्ये राजाराममोहन रॉय, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाही. सतीप्रथा,केशवपन, बालविवाह अशा अनेक प्रथांमधून त्यांनी स्त्रियांची सुटका केली. स्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह,प्रौढ विवाह यामधून समाज जागृती झाली. स्त्रीशिक्षणाच्या चळवळीने जोर धरला आणि महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये समाजाचा प्रखर विरोध पत्करून अनंत अडचणींना तोंड देऊन स्त्रीशिक्षणाचा पाया याच महाराष्ट्रामध्ये घातला आणि स्त्रियांना सक्षम बनवण्यात त्यांचे महत्त्वाचे असे योगदान हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.

                शिक्षणामुळे तिला स्वच्छता,कुटुंब नियोजन, शिक्षणाचे महत्त्व कळाले. आरोग्य,चांगल्या सवयी, यातून तिने कुटुंबाला शिस्त लावली. कारण तिचे बाळ उद्याचं भावी,सुसंस्कृत नागरिक आहे,यातून महाराष्ट्राचा,राष्ट्राचा अन् जगाचा विकास होईल याची तिला जाणीव आहे. तिने आता घर सांभाळून सरपंचपदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत विविध क्षेत्रात धडाडीची पावले टाकायला सुरुवात केली. समाजाला वेगळा विचार देण्याचं सामर्थ्य स्त्रियांमध्येच आहे...मासाहेब जिजाऊनी स्वराज्याची संकल्पना मांडली म्हणून हे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले, या राष्ट्राला चांगला विचार देण्याची जबाबदारी प्रत्येक मातेला आता स्वीकारावीच लागेल.
           शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या अगोदर या राज्यांमध्ये दिवसाढवळ्या स्रीयांच्या अब्रूची लक्तरे तोडली जायची, त्याकाळी शिवरायांच्या स्वराज्याचा दंडक फार कठीण होता,स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जात नव्हती, त्याला मृत्युदंडाची शिक्षा होती. कारण,स्रीयांची इज्जत कायम राहिली पाहिजे, ती आमच्या घरातील देवता आहे हे स्वराज्याचे ब्रीद होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईचा दर्जा देणारा राजा याच मातीत घडला. आमच्या शेतकरी बांधवांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या रांझे गावच्या पाटलाचे शिवरायांनी हातपाय तोडले, स्वतःचा सखा मेव्हणा सकूजी गायकवाड याने सावित्रीबाई देसाईवर अत्याचार केला म्हणून,त्याचे डोळे काढले, हातपाय तोडले.! ३५० वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी स्रीयांना ५० टक्के आरक्षण दिलं नव्हतं, परंतु १०० टक्के  संरक्षण नक्कीच होतं. तुम्ही आरक्षण द्या पण त्याहीपेक्षा आजच्या स्त्रीला १०० टक्के संरक्षण देणं फार महत्त्वाचं वाटतं. तो शिवरायांचा विचार आज या महाराष्ट्रामध्ये अमलात आणणे गरजेचे आहे. आजही कितीतरी स्त्रियांवर अन्याय,अत्याचार होतात तेव्हा,आपली शासन व्यवस्था ही स्रीरक्षणासाठी अपुरी पडते,निर्भयाचा दिल्लीतील घडलेला अत्याचार,रिंकू पाटील भर चौकात मारली जाते,नयना सहानी तंदूर भट्टीत जाळली जाते,कोपर्डीची मन हेलावून टाकणारी,माणुसकीला काळीमा फासणारी घटना बघितल्यावर असं वाटतं की, आम्ही फक्त शिवरायांचा जय-जयकार करतो आणि त्यांनी घालून दिलेले नियम, आदर्श संस्कृतीचं,आम्हाला यत्किंचितही भान राहत नाही??
  "महिला दिनाच्या दिवशी तूच जननी,तूच आदिमाया हा जयघोष सगळीकडेच ऐकू येतो || 
  पण याच जयघोषात रात्रीच्या अंधारातला तिचा आक्रोश मात्र दबून जातो ||"
                  आजही कित्येक स्त्रीया आत्महत्या करतात, हुंडाबळी ठरतात,तिच्यावर अनेक बंधने लागलेली दिसून येतात,पण समाजजीवनाच्या चौकटीत मात्र पुत्ररत्न देणारी माता समाजाच्या आदरास पात्र ठरते. कन्यारत्न देणारी माता अवहेलनाकारण ठरते. इथे सारा दोष मात्र तिच्यावरच येतो. खरंतर विज्ञान हे स्त्री-पुरुष भेद मानत नाही, पण आमच्या दृष्टीत हा भेद भिनलेला आहे.आज स्त्रियांनी सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत,त्यांचा आदर आपण केला पाहिजे.आभाळाएवढे कर्तुत्व निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त ईश्वराने तिलाच दिलं आहे. आई,आजी,बहीण, पत्नी म्हणून आपण प्राचीन काळाचा संदर्भ देत असतो, परंतु आजही ती तिच्या  हक्काने स्वातंत्र झाली आहे का? हा प्रश्न नेहमी अनुत्तरीतच राहतो.!
          या महिला दिनानिमित्त मला एवढचं म्हणावसं वाटतं की, छत्रपती शिवबाराजेंचा स्त्रियांविषयी जो मातेसमान दृष्टिकोन होता तो आमच्यात कधी रुजेल? तो जेव्हा रुजेल तेव्हाच आम्ही या शिवरायांच्या स्वराज्याला जागलो असे म्हणता येईल.! तेव्हाच या राष्ट्रातील अत्याचार थांबतील...हे भारत राष्ट्र अत्याचार मुक्त होईल.!आणि त्याच खऱ्या या महिलादिनाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा ठरतील..!
"स्त्रियांना द्या इतका मान की, वाढेल आपल्या देशाची शान ||"
-----शब्दांकन------
 सतिष उखर्डे-टेंभूर्णीकर
(शिवव्याख्याते-प्रबोधनकार)
मो.क्र.-9422992310
close