पूर्णा । कलीम सय्यद :-
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती व्हावी, असा सूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांतर्गत काही नेतेमंडळींनी व्यक्त केला आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक राज्यमंत्री नवाब मलिक यांची परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यापासून महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना व कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष नाराज आहेत. विशेषतः राष्ट्रवादी अंतर्गतसुध्दा धूसफूस सुरु आहे. मुंबईतील मलिक यांनी परभणी जिल्ह्याचे पालकत्व स्विकारल्यापासून कधीच पुरेसा वेळ दिला नाही. ध्वजारोहनाचे शासकीय कार्यक्रम अपवाद आपत्तीच्या काळातसुध्दा ते कधी वेळेवर फिरकले नाहीत.
जिल्ह्यांतर्गंत आघाडी अंतर्गत नेतेमंडळींबरोबर सुध्दा त्यांचे फारसे सख्य राहीले नाही किंवा ते असो, नेतेमंडळींनीसुध्दा जूळवून घ्यावयाचे प्रयत्नसुध्दा केले नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अंतर्गत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनीच मलिक यांच्या विरोधात खुलेआमपणे नाराजीचा सूर व्यक्त केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. परंतु, मलिक यांनी त्या स्थितीतसुध्दा हेकेखोरपणा कायम राखला, परंतु राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी दुर्राणी विरुध्द मलिक या वादात दोघांनाही सबुरीचा सल्ला दिला.
त्यामुळे त्या दोघातील ते मतभेद त्याचवेळी निवळले खरे, परंतु गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मलिक यांच्या विरोधात राष्ट्रवादी अंतर्गत स्थानिक नेतेमंडळींनी उघडपणे श्रेष्ठींकडे सूर आवळण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी अंतर्गत नेते मंडळींनी मलिक यांच्या ऐवजी धनंजय मुंडे यांच्याकडेच पालकत्व दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ईडीने केलेल्या कारवाईनंतर मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. चांगलेच अडचणीत सापडले आहेत. मलिक यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी विरोधी पक्षाने रान उठवले आहे. त्यामुळे मलिक कमालीचे संकटात सापडले असून या स्थितीत त्यांच्यावर मंत्रीपद गमाविण्याची टांगती तलवारच आहे. या पार्श्वभूमीवर मलिक यांचा राजीनामा आघाडी सरकारद्वारे घेतल्यानंतर मुंडे यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्तीचा प्रश्न सहजपणे सुटू शकेल असेही चित्र आहे.

