पूर्णा । वार्ताहर :-
इयत्ता बारावी पाठोपाठ इयत्ता दहावीच्याही परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोनाच्या आपत्तीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासह परीक्षांवरच मोठे गंडांतर आले आहे. याहीवर्षी इयत्ता दहावीच्या ऑनलाईन की ऑफलाईन परीक्षा याबाबत गदारोळ उडाला होता. परंतु, विभागीय मंडळांनी ऑफलाईनच परीक्षांचा निर्णय जाहीर केला. पाठोपाठ वेळापत्रक जाहीर केले. १५ मार्च पासून इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकूण ९३ परीक्षा केंद्र कार्यरत असून ३०४ परीक्षा उपकेंद्र म्हणूनही कार्यरत राहणार आहेत. या केंद्रांवर एकूण २८ हजार ७७२ विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून बसले आहेत.
दरम्यान, मंगळवारी प्रथम भाषा मराठी/उर्दू या विषयाच्या परीक्षा झाल्या. या परीक्षेस २८ हजार ७७२ पैकी २७ हजार ७८० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. एकूण ९९२ विद्यार्थी गैरहजर होते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी या पीरक्षांच्या पार्श्वभूमीवर बालविद्या मंदिरसह अन्य काही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तेथील शिक्षकांसमवेत चर्चा केली.

