श्रीरामपूर येथील प्रख्यात डॉ.मदन सोमाणी यांना जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचा माजी प्राचार्य टी. ई. शेळके, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी सत्कार केला. त्याप्रसंगी प्रा. सौ. मंजिरी सोमाणी, डॉ. आशिष सोमाणी, डॉ. सौ.अर्चना सोमाणी,श्री अमित सोमाणी उपस्थित होते.
श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - श्रीरामपूर शहराला भूषणावह वाटेल असे डॉ.मदन सोमाणी आणि परिवाराने व्यवसायाबरोबरच विविध कलेत नावलौकिक प्राप्त केला असून त्यांचा आदर्श सर्वांना प्रेरणादायी असल्याचे मत ऍड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील डॉ. मदन सोमाणी महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत डॉ. मदन सोमाणी यांनी सुवर्णंपदक प्राप्त केले तसेच सेवानिवृत्त प्रा. सौ. मंजिरी सोमाणी यांना राजस्थानी महिला मंडळाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत पारितोषिक मिळाल्याबद्दल या उभयतांचा सत्कार प्रसंगी प्राचार्य शेळके बोलत होते.डॉ.आशिष सोमाणी यांनी सर्वांचे स्वागत केले.अमित सोमाणी यांनी नियोजन केले.प्राचार्य शेळके, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी डॉ. मदन सोमाणी आणि प्रा. सौ. मंजिरी सोमाणी यांचा शाल, पुस्तके देऊन सत्कार केला. प्राचार्य शेळके आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, डॉ. मदन सोमाणी यांनी वैद्यकीय व्यवसायात नावलौकिक प्राप्त केला, त्याबरोबर जलतरण आणि इतर कलात्मक छन्द जोपासत नावलौकिक प्राप्त केला. प्रा. मंजिरी सोमाणी यांनी बोरावके महाविद्यालयात दीर्घकाळ मानसशास्राच्या एक आदर्श प्राध्यापिका म्हणून हजारो विद्यार्थी घडविले, त्याचबरोबर विविध कला, सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटविला आहे.
त्यांचा परिवार असाच माणुसकीचा आदर्श जपत आहे, असे सांगून विविध आठवणी सांगितल्या. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आदरणीय डॉ. सोमाणी आणि प्रा. सौ. मंजिरी सोमाणी मॅडम यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. माझ्या पोरक्या दशेत डॉ. सोमाणी यांनी सदैव मोफत उपचार केले तर सोमाणी मॅडम यांनी आधार दिला म्हणून आपले शिक्षण झाले.
या परिवाराने विविध क्षेत्रात आपली छाप निर्माण केली आहे,असे सांगून बोरावके कॉलेजमधील आठवणी सांगितल्या.अशी व्यक्तिमत्वे हीच खरी कर्मवीर विचारांची आदर्श जपणारी आहेत, यावेळी प्रा.बारगळ यांनी सोमाणी परिवार यांनी नियमित व्यायाम आणि सदआहार यामुळे आपले जीवन निरोगी ठेवले आहे.त्यांचा जपला पाहिजे असे सांगून सोमाणी परिवाराचे अभिनंदन केले.डॉ. उपाध्ये यांनी माजी प्राचार्या सौ. मंगल श्रीधर पाटील लिखित 'मंगलपर्व ', डॉ. उपाध्ये लिखित 'फिरत्या चाकावरती', 'समाजनचिंतन'आदी पुस्तके सोमाणी परिवारास भेट दिली तर प्राचार्य शेळके यांनी 'आनंदयात्री 'हा गौरवग्रन्थ भेट दिले.तसेच या स्पर्धेतील विजेते राजकुमार यादव, सेवानिवृत्त सहा.पोलीस उपनिरीक्षक चांगदेव मोरे, पढेगाव येथील मयुरा बनकर, कोपरगाव येथील डॉ.राजश्री पवार यांचेही अभिनंदन करण्यात आले.
डॉ.मदन सोमाणी आणि प्रा.सौ.मंजिरी सोमाणी यांनी अशा सत्कारामुळे जीवनात समाधान मिळते आणि सत्कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते असे सांगितले. डॉ.अर्चना सोमाणी यांनी श्रीरामपूर आयएमएच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रकाशित केलेल्या स्मरणिका मान्यवरांना भेट देऊन चर्चा केली.गच्चीवरील बगीचा आणि आरोग्यशील जीवनाचे महत्व सांगत आभार मानले.

