shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१३४) पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता**मेळे - संमेलने - अमृतमहोत्सव कशासाठी ?


मनुष्यप्राणी आपल्या कर्तृत्वाचा लेखाजोखा समजून उमजून घेऊन त्यातून प्रगती साधण्याच्या उद्देशाने काही ठराविक कालावधीनंतर महोत्सव साजरे करतो.
 उदाहरणार्थ वर्धापन दिन, रौप्यमहोत्सव, अमृत महोत्सव, सुवर्णमहोत्सव, शताब्दी वगैरे वगैरे.
सद्या आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चालू आहे.
 अमृतमहोत्सवीवर्षात आपण काय विचार करणार आहोत?

 केवळ स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली हा विषय नसून हे स्वातंत्र्य यावत्चंद्रदिवाकरौ टिकून राहण्यासाठी, झालेल्या चुका सुधारून पूर्णपणे सशक्त भारत निर्माण करणे हा संकल्प असायला हवा. 

 समुद्रमंथनातून अनेक अमूल्य रत्ने आपल्याला प्राप्त झाली हा आपला वारसा आहे..  
स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंतच्या कालावधीमध्ये जे मंथन या देशांमध्ये झाले त्यातून आपल्याला काय प्राप्त झाले याचा लेखाजोखा विचारात घेणे गरजेचे आहे.
 
 तर गेल्या ७५ वर्षात काश्मीरपासून कन्याकुमारी अथवा अटक पासून कटकपर्यंत, हिमाचल प्रदेश असो वा भंडारा- चंद्रपूर, आसाम, गुजरात,केरळ, तामीळ, राजस्थान येथील माणसे दिल्ली, भोपाळसह मुंबई-पुण्या ठाण्याच्या  औद्योगिक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पोहोचली आणि संपूर्ण महाराष्ट्र नोकरीधंद्याच्या निमित्ताने परप्रांतियांनी व्यापला. यात वाईट असे काहीच झाले नाही. जे महाराष्ट्रात आले ते सारेच भारतीय!

 पण विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राचे जे पर्यावरणीय नुकसान झाले त्याचा विचार आपल्याला करणे गरजेचे आहे. अगदी डहाणूपासून बांद्यापर्यंत, चंद्रपूरपर्यंत महाराष्ट्राचा विकास झाला. शहरे  प्रचंड आणि बेशिस्तपणे वाढली आणि शहरवासीयांचे रोजचे दूषित सांडपाणी, कारखान्यातील घातक रसायनयुक्त सांडपाणी, साखर कारखान्यातील मळी यामुळे नद्या-नाल्यांतील पाणी पिण्यास अयोग्य झाले.

 आपल्या देशातील सशक्त, प्रदूषणापासून अलिप्त असलेल्या भागात राहणारे फार मोठे जनसमूह राष्ट्र विकासासाठी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी स्वतःच्या शरीराला अनेक रोगांचे घर करून ठेवले. दवाखाने आणि औषधाची दुकाने यांची संख्या प्रचंड वाढली. याला कारण गेल्या ७५ वर्षे देशामध्ये शहरांची होत असलेली बेसुमार वाढ घातक रसायने, खते, कीटकनाशके,  यांचा बेसुमार वापर आणि केवळ आर्थिक विकासापोटी  सामाजिक संस्कार, संस्कृतीचे विकृतीकरण व पर्यावरणाची होत असलेली हानी याकडे उघड्या डोळ्याने पाहत केलेली अक्षम्य डोळेझाक.   

परिणामी या ७५ वर्षात निरोगी असलेल्या येथील भारतीयांच्या शरीरात असंख्य रोगांनी  घर केलेले असल्याचे दिसते आहे. ही  घुसखोरी अतीघातक आहे.
शुद्ध हवा, शुद्ध पाणी, आणि शुद्ध वनस्पती, पालेभाज्या, तेल, तूप, मध दूध  खात्रीने मिळतील असं ठिकाण आज आपण दाखवू शकत नाही हे गेल्या ७५ वर्षाच्या विकासाच्या मंथनातून निघालेले फलित आहे. 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सशक्त, निरोगी, पर्यावरणाचे संतुलन सांभाळणाऱ्या अशा राष्ट्रीय विचाराच्या समाज निर्मितीचा संकल्प करणे उचित ठरेल.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेच्या
पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता उपक्रमांतर्गत प्रकाशित.
याच विषयावर आपले मत नोंदवून अथवा या मताचा प्रचार करून आपण कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या उपक्रमात सहभाग नोंदवू शकता. 

लेखक:
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने देशभक्तकोशकार,
 पुणे मोबाईल : ९८८१३७३५८५
close