shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पहिल्या सामन्यात हारण्याची मुंबईची परंपरा कायम ; कर्णधार बदलूनही आरसीबीच्या पदरी पराभवच !

             पंधराव्या आयपीएल पर्वाच्या दुसऱ्या दिवशी दोन सामने झाले. त्यामध्ये पहिल्या सामन्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर स्पर्धेचे विक्रमी जेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सची गाठ दिल्ली कॅपिटल्सशी पडली. भारताच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व मिळालेला रोहीत शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी व अनुभवी कप्तान आहे, शिवाय भारताच्या संघाचे कर्णधारपद स्विकारल्यापासून रोहितचा एकही पराभव झाला नसल्याने लकी रोहितमुळे मुंबईला विजयाचे प्रमुख दावेदार मानले जात होत होते. मात्र सामन्यातील अनपेक्षीत निकालाने सर्वच क्रिकेट पंडितांचे अंदाज फोल ठरले. परंतु नियतीने सन २०१३ पासून घालून दिलेला पायंडा मात्र तसाच राहिला. सर्वाधिक पाच वेळा आयपीएल करंडक जिंकलेल्या मुंबईला सन २०१३ पासून मागील प्रत्येक वर्षात स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावाच लागत आहे. 

एव्हाना सामन्यातील त्यांची परिस्थिती कितीही सदृढ असो. अगदी या सामन्यातही तसेच होते. दिल्लीने विजयी फटका मारेपर्यंत प्रत्येक जण मुंबईच्याच विजयाचे भाकीत करून होता. अखेर नियतीच्या मनात होते तेच झाले आणि मुंबईला निराश मनाने मैदानाबाहेर जावे लागले.
               या सामन्याची नाणेफेक दिल्लीच्या बाजूने गेली खरी पण मुंबईचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा व या पर्वातील सर्वात महागडा खेळाडू ईशान किशनने झोकात सुरुवात करून दिली. रोहीत जम बसल्यावर नेहमीप्रमाणे बाद झाला व एका बाजूने गडी बाद होणे सुरू झाले. त्या वेळेस ईशान एका बाजूने धावा बनवत उभा होता. तिलक वर्मा सोडल्यास टिम डेव्हीड, किरॉन पोलॉर्ड, डॅनियल सॅम्स यांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले मात्र ईशान किशनने शेवटपर्यंत नाबाद राहात ८१ धावा फटकावित संघाला मजबूत धावसंख्या गाठून दिली.
                 अनेक दिवसांपासून अपयशाचा धनी बनलेल्या कुलदिप यादवला लय व सूर गवसल्याने मुंबईच्या धावसंख्येला आळा बसला. त्याला तीन बळी मिळाले, पुढे जात हि कामगिरी त्याला सामनावीर किताबही देऊन गेली. तर दुसऱ्या बाजूने दोन बळी घेऊन खलील अहमदने संघासाठी चांगली कामगिरी केली.
                एकशे अठ्याहत्तर धावांचे लक्ष गाठताना चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीचा डाव अचानक कोसळला व सत्तर धावांच्या आत निम्मा संघ डग आऊट मध्ये पोहोचला असता आधी शार्दूल ठाकूर व नंतर ललीत यादव आणि अक्षर पटेलने नाबाद ७५ धावांची भागीदारी करत अनपेक्षितरित्या दिल्लीला विजयी केले व मुंबईच्या तोंडातला घास पळविला.
                डि वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगलोरचा एक षटक व पाच गडी राखून पराभव करत आपल्या विजयाचे खाते उघडले. मयंक अग्रवाल पंजाबचे तर फाफ ड्यू फ्लेसिस आरसीबीचे आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व करत होते. फाफला द. आफ्रिकेचे नेतृत्व करण्याचा अनुभव होता, परंतु मयंक नेतृत्वाच्या अनुभवात निरंक होता. शिवाय आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना तीन गडयांच्या मोबदल्यात २०५ एवढी मोठी धावसंख्या रचल्याने त्यांचा विजय पक्का मानला जात होता. पंजाबचे फलंदाज एवढया मोठ्या धावसंख्येच्या दबावात ढेपाळतील हा अनेकांचा अंदाज साफ खोटा ठरला. शिखर धवन, मयंक अग्रवाल, लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, ओडियन स्मिथ यांनी दणकेबाज खेळ करत पंजाबला एक षटक आधीच विजय मिळवून देत टिकाकारांना चोख उत्तर दिले.
                आरसीबीचे फलंदाज टिम सेफर्ट, फाफ, कोहली व दिनेश कार्तिकने दणकेबाज फलंदाजी केली मात्र त्यांच्या गोलंदाजांनी गचाळ कामगिरी करत बावीस वाईड बॉलची खैरात करत पंजाबचे काम सोपे केले तर क्षेत्ररक्षकांनीही सोपे व महत्वाचे झेल सोडून संघाच्या पराभवाची कबर स्वतःच खोदली.
                 चेन्नई पाठोपाठ मुंबई व आरसीबी यांची पराभवाने सुरूवात झाली असली तरी या तिनही संघात मुसंडी मारण्याची क्षमता आहे. शिवाय मुंबई स्लो स्टार्टर असल्याने ते उशीरा लाईनवर येतात. सन २०१३, १५, १७, १९ असे विषम वर्षात विजेतेपद मिळविल्यानंतर सन २०२० या सम अंकी वर्षापासून मुंबईने विजेतेपदासाठी नवीन फॉर्म्यूला सुरू केला असेल तर यंदा म्हणजे सन २०२२ मध्ये मुंबईच्या विजयाची टर्म आहे.
                 पहिल्या तिनही सामन्यात नाणेफेक जिंकणारे व धावांचा पाठलाग करणारे संघ जिंकले असून नाणेफेकीचं महत्व वाढण्याची शक्यता असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची मानसिकता सुरूवातीलाच निगेटिव्ह होण्याची शक्यता आहे. असे जर झाले तर ते स्पर्धेच्या भवितव्यासाठी घातक ठरू शकते.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close