shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केएल राहुलच्या अपरिपक्व नेतृत्वाचा लखैनाला फटका


                आयपीएल मध्ये पहिल्यांदाच प्रवेश मिळविलेल्या लखनौ सुपर जायंटस व गुजरात टायटन्स या दोन संघात पंधराव्या आयपीएल सत्रातील तिसऱ्या दिवशीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर अतिशय रोमांचक अवस्थेत संपला. दोन सख्खे दोस्त केएल राहुल व हार्दिक पांड्या या संघांचे संघनायक होते. तर आयपीएलच्या इतिहासात दोन सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध खेळण्याचा दुसरा कारनामा कृणाल व हार्दिक पांड्या या भावांनी केला. विशेष म्हणजे लखनौ कडून खेळणाऱ्या कृणालने हार्दिकला बाद करून गुजरातला एक वेळ संकटातही टाकले होते. परंतु लखनौचा कर्णधार केएल राहुलच्या अपरिपक्व नेतृत्वाने लखनौच्या हातातोंडातला घास गुजरातने हिरावून नेला.

             तत्पूर्वी हार्दिकने नाणेफेक जिंकताच लखनौला प्रथम फलंदाजीस पाचारण केले.  मोहम्मद शमीच्या धारदार वेगवान माऱ्यापुढे केएल राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर क्विंटन डिकॉक व मनिष पांडेही शमीच्या गोलंदाजीपुढे हतबल झाले व डग आऊट मध्ये परतले. हे कमी की काय म्हणून स्वैर मारा करणाऱ्या वरूण अरॉनच्या गोलंदाजीवर एर्वीन लुईसही परतला. चार बाद २९ अशा परिस्थितीत आयपीएल पदार्पण करणारा नवोदित आयुष बदोनी व दिपक हुडाने प्रथम सावध व नंतर आक्रमक होत प्रत्येकी अर्धशतके ठोकून संघाला १५८ धावांपर्यंत नेले.
                प्रत्युत्तरात गुजरातची सुरुवातही गचाळ झाली. सलामीवीर शुभमन गिल ही शुन्यावर परतला. या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात ऋतूराज गायकवाड, के.एल राहुल व शुभमन गिल हे सलामीवीर शुन्यावरच बाद झाले आहेत. गिल बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर मॅथ्यू वेड व हार्दिकने गुजरातचा डाव बऱ्यापैकी सांभाळला होता. मात्र हे दोघेही पाठोपाठ बाद झाल्याने पुन्हा एका सामना लखनौच्या दिशेने झुकला. त्यानंतर राहुल तेवतीया व डेेव्हीड मिलरने पुन्हा एकदा सामना गुजरातकडे वळविला असे वाटत असताना मिलर बाद झाला आणि सामना रोमांचक स्थितीत पोहोचला. क्षणाक्षणाला विजयाचे पारडे हिंदोळके खात होते. मात्र त्यानंतर नवोदित अभिनव मनोहर सदारंगानी व राहुल तेेवतीयाने जबाबदारीने खेळत विजयश्री खेचून आणली व आयपीएलमध्ये संघाला विजयी प्रवेश मिळवून दिला.
              केएल राहुलला भारताचा भावी कर्णधार म्हणून बघीतलं जातं. मात्र या सामन्यात त्याने घेतलेल्या काही अनाकलनीय निर्णयाने त्याच्या भोवतीच संशयाचे जाळे विनले जात आहे. एक फलंदाज म्हणून सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने त्याचा संघ संकटात सापडला. गुजरातच्या डावात पंधराव्या षटका अखेर लखनौची स्थिती भक्कम होती. अशा वेळी दवामुळे मैदान ओलसर झाल्याने चेंडूवर पकड मिळविणे फिरकी गोलंदाजांना कठीण जात होते. शिवाय वेगवान गोलंदाज आवेश खान, वरुण अरॉन व मोहम्मद शमीचे षटके बाकी असताना राहुलने या तिघांचा उपयोग करणे गरजेचे असताना सोळावे व सतरावे षटक फिरकी पटू दिपक हुडा व रवि बिश्नोई यांना दिले. नेमके त्याच वेळी राहुल तेवतीया व अभिनव मनोहर बेफाम झाले होते. त्यांनी अनुक्रमे हुडाच्या गोलंदाजीवर बावीस व बिश्नोईच्या षटकात सतरा धावा ठोकून सामना गुजरातच्या दिशेने वळविला.
               आपल्याला आठवत असेलच सन २०२० च्या शारजात झालेल्या पंजाब - राजस्थान सामन्यात पंजाबचे नेतृत्व करताना याच केएल राहुलने गरज नसताना शेल्डन कॉटेलला गोलंदाजी दिली व हातात असलेल सामना याच राहुल तेवतीयाने एका षटकात पाच षटकार मारून राजस्थानच्या झोळीत टाकला. या त्याच गोष्टींची पुनरावृत्ती झाली व केएलच्या नेतृत्वाचे हसेही. मागील दोन सत्रात पंजाबचे अपयशी नेतृत्व, दक्षिण आफ्रिकेत एक कसोटी व तीन वनडेमध्ये याच केएलच्या नेतृत्वात भारताने सपाटून मार खाल्ला होता. नेतृत्वाचे कोणतेही गुण नसताना त्याला बळजबरीने कर्णधारपदाच्या बोहल्यावर चढविणाऱ्या आयपीएल संघ मालक व बीसीसीआय स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून तर घेत नाही ना ?
              सन २०१७ मध्ये डॉ. संजिव गोएंका यांनी पुणे सुपर जायंटस संघाचे सतत होत असलेले पराभव बघून तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्पर्धेच्या मध्यावरच कर्णधार पदावरून हटविले होते. त्यामुळे राहुलने अशाच चुका पुन्हा केल्यास साडेपाच हजार कोटी रूपये खर्च करून लखनौचा संघ विकत घेणारे डॉ. गोयंका राहुललाही कोणत्याही क्षणी हाकलून देतील. त्यानंतर मात्र राहुलच्या स्वप्नांच्या चक्काचूर होऊ शकतो.
                  या सामन्याचा निकालही दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने लागल्याने या सत्रात असे सलग चौथ्यांदा घडल्यामुळे स्पर्धेची रंगत कमी होऊ शकते. एकंदर बघता बीसीसीआयने यावर वेळीच तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा स्पर्धेची मजा निघून जाईल.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close