भिमाई आश्रमशाळेत शाहीर जंगम स्वामींना स्मृतीदिनी अभिवादन!
इंदापूर (प्रतिनिधी) ( दि.२२) :- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक धगधगतं पर्व असलेल्या स्वातंत्र्यसैनिक नागसेन तथा लोकशाहीर जंगम स्वामी यांचा १५ वा स्मृतिदिन भिमाई आश्रमशाळेत साजरा करण्यात आला.
यावेळी लोकशाहीर जंगम स्वामींच्या कार्याला उजाळा दिला.
महाराष्ट्र ही शूरवीर, पराक्रमी योद्ध्यांची जननी तर संत - महात्म्यांच्या, महापुरुषांच्या व स्वातंत्र्य सेनानींच्या आचार विचारांची कर्मभूमी. याच कर्मभुमीत जन्मलेल्या स्वातंत्र्यसेनानी पैकी एक धगधगते पर्व म्हणजेच नागसेन तथा लोकशाहीर जंगम स्वामी होय. स्वामी हे स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी योद्धा म्हणून लोकशाहीर जंगम स्वामी यांची ओळख राहिलेली आहे, असे गौरवोद्गार भिमाई आश्रमशाळेत नानासाहेब सानप यांनी आयोजित कार्यक्रमात काढले.
सानप पुढे म्हणाले की, लोकशाहीर जंगम स्वामी यांची ओळख आम्हाला आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक , संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या) यांनीच करून दिली. जंगम स्वामींच्या कार्यकर्तृत्वाची भविष्यातही कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून दिवंगत रत्नाकर मखरेंनी आपल्या संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहाला जंगम स्वामींचे नाव देऊन एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला असे यावेळी सानप यांनी नमूद केले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी ट्रस्टच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात भिमाई प्राथमिक आश्रमशाळेचे सहशिक्षक नानासाहेब सानप यांच्या हस्ते स्वातंत्र्यसेनानी जंगम स्वामींच्या प्रतिमेस पुष्पहार, दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या)यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक अनिल ओहोळ, संस्थेतील सर्व शिक्षक-महिला अधिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.

