राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. 28 एप्रिल, 2022
राजभवन, मुंबई येथे कार्यक्रमात राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांना कृषि विद्यापीठाने नोंदविलेल्या नानकटाईच्या पेटंटचे प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.
राजभवनात नुकतेच जागतिक बौध्दिक संपदा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भौगोलीक मानांकन प्राप्त करणारे प्रगतशील शेतकरी व उद्योजक उपस्थित होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत चालविल्या जाणार्या बेकरी युनिटमध्ये तयार होणार्या नानकटाई कुकीज/बिस्किटांना भारतीय बौद्धिक मालमत्ता/संपदा अधिकार प्रमाणपत्र अर्थात पेटंट अधिनियम 1970 च्या कायद्यानुसार 20 वर्षांसाठी प्रदान करण्यात आले आहे. या पेटंटसाठी डॉ. उत्तम चव्हाण यांनी परिश्रम घेतले होते. बेकरी युनिटच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख आणि अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ यांनी विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.

