*देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*
इंदापूर प्रतिनिधी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त येथील जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सर्व जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देत देशाची राज्यघटना, भारतीय रिझर्व बँकेची स्थापना, तसेच सर्व क्षेत्रातील डॉ. बाबासाहेबांचे योगदान मोठे असून देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यावेळी अभिवादन करून सामूहिक त्रिशरण, पंचशील घेण्यात आले.
इंदापूर नगरपरिषदे समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारे देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. 1990 मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय लोकशाहीत त्यांचे मोठे योगदान असून त्यांचे विचार आपण सर्वजण मिळून पुढे नेऊ.'

