shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंचांच्या निर्णयाचे गालबोट ; दिल्ली सोडणार होती सामना अर्धवट !



          पंधराव्या आयपीएलच्या ३४ व्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यात धावांचा अक्षरशः पाऊस पडला. परंतु न्याय देवता समजले जाणारे पंच दिल्लीवर वृष्ट झाल्याने अंतिम टप्प्यात या सामन्याला गालबोट लागले. पंधरा धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीने विजयासाठी अप्रतिम प्रयत्न केले. ४२९ धावा कुटलेल्या या सामन्यात राजस्थान कडून २१ चौकार व १४ षटकारांचा तर दिल्लीकडून १७ चौकार व १२ षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला. मात्र या सगळ्या गदारोळात बिचाऱ्या गोलंदाजांची मात्र मोठी दमछाक झाली. दिल्लीने शेवटपर्यंत निकराची झुंज दिली. मात्र त्यांचा एकही फलंदाज मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरला नाही, तर जे बरे खेळले ते जम बसल्यावर आपल्या डावाचे मोठया खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरले.

          नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी मिळालेल्या राजस्थानच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करण्याचा मोठाच लाभ उठविताना या सत्रात तिसरी दोनशेे पार धावसंख्या उभारून प्रतिपक्षावर मनोवैज्ञानिक दडपण आणले. राजस्थानचा सलामीवीर जोश बटरल सध्या आंब्याच्या मोहराप्रमाणे अक्षरशः धावांनी बहरला आहे. मानाची ऑरेंज कॅप प्राप्त बटरलने या पर्वातले तिसरे शतक ठोकताना ६१ चेंडूत ११६ धावा फटकावून स्वतःची  वैयक्तीक धावसंख्या ४९१ पर्यंत नेली. त्याला देवदत्त पडीक्कल व  संजू सॅमसनची मोलाची साथ मिळाल्याने राजस्थान मजबूत धावसंख्या उभी करु शकले.

           प्रत्युत्तरात दिल्लीने झोकात सुरूवात केली खरी परंतु डेव्हीड वॉर्नर व पृथ्वी शॉ जम बसल्यावर बाद झाल्याने व लगोलग सर्फराज खान परतल्याने दिल्लीसाठी विजय दूर चालला असताना कर्णधार रिषभ पंत (४४ धावा ) याने ललित यादवसह प्रयत्न सुरूच ठेवले. परंतु पंत पाठोपाठ, अक्षर पटेल व शार्दूल ठाकूर स्वस्त:त बाद झाल्याने शेवटच्या दोन षटकात ३६ धावांचे आव्हान रोवमन पॉवेल व ललित यादव समोर होते. मात्र प्रसिद्ध कृष्णाने १९ वे षटक निर्धाव टाकून ललित यादवचा महत्वाचा बळी टिपून सामन्याला नाट्यमय वळण दिले. सर्वात महत्वाचे म्हणजे तडाखेबाज फलंदाज रोवमन पॉवेलला स्ट्राईक पासून दूर ठेवण्यात तो यशस्वी ठरला, त्यामुळेच राजस्थानचा विजय शक्य झाला. त्या षटकात जर १५ ते २० निघाल्या असत्या तर सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते. हे आपण शेवटच्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकून पॉवेलने दाखवूनही दिले.

          आपला वेस्ट इंडिजचाच सहकारी माकायच्या अंतिम षटकात ३६ धावा ठोकण्याचे अशक्यप्राय आव्हान पॉवेलने स्विकारल्याचे दिसत असताना तिसऱ्या चेंडूवर एक नाट्यमय घटना घडली. पॉवेलने प्रेक्षकात भिरकावलेला तो चेंडू पॉवेलच्या कंबरेच्या वरती होता म्हणजे नियमानुसार तो नो बॉल होता. म्हणजे त्यावर फ्री हिट मिळायला पाहीजे होती. मात्र मैदानातील पंचांनी तो चेंडू नो बॉल दिलाच नाही. त्यावर कहर केला नोबॉल देण्याचे काम करणाऱ्या तिसऱ्या पंचानी. यानंतर काही काळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे भयंकर चिडला होता, इतकेच नाही तर त्याने फलंदाज पॉवेल व कुलदिपला माघारी बोलावण्याचा निर्णय देखील घेतला होता. मात्र दिल्लीचे बॅटींग कोच प्रविण आमरे यांनी मैदानात जाऊन प्रकरण मिटविले.  त्यानंतर सामना सुरू झाला खरा परंतु तोपर्यंत पॉवेलचा जोश संपलेला होता. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर तो बादही झाला आणि दिल्लीला खुणावणारा विजय दूरच राहीला.

               वास्तविक या स्पर्धेत एकाही सामन्यात पंचांनी निर्दोष व निष्पक्ष पंचगिरी केलीच नाही. अनेक चुका पंचाकडून झाल्या. अतिशय महत्वाच्या क्षणी भारताचा सर्वोत्तम पंच म्हणून गणला जाणारा नितिन मेनन सारख्या पंचाला नोबॉल समजू नये व वादग्रस्त क्षणी तिसऱ्या पंचाची मदत न घेऊन त्याने आपल्या अकलेचे दिवाळेच जगासमोर जाहीर केले. वास्तविक अशा वेळी तिसऱ्या पंचांनीच स्वतःहून निर्णय द्यायला पाहीजे होता. परंतु या स्पर्धेत निवडलेला एकही पंच कार्यक्षम नसल्याचे दिसत असून बीसीसीआयने यावर त्वरीत तोडगा काढला नाही तर भर मैदानात खून खराबाही होऊ शकतो. 

                या विजयाने राजस्थान गुणतालिकेत अव्वल झाले असून त्यांनी मिळविलेले पाचही विजय प्रथम फलंदाजी करून व नाणेफेक गमावल्यानंतर जिंकले आहेत हे विशेष. कारण प्रत्येक कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणे पसंत करत असताना राजस्थानची कामगिरी नक्कीच कौतुकास्पदच म्हणावी लागेल.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close