राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख, दि. 29 एप्रिल, 2022
भारतामध्ये जैवविविधता खुप आहे. हरितक्रांतीनंतर पाण्याचा तसेच रासायनिक खते व किटकनाशकांचा अमर्याद वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला. भातासारख्या पिकातील जवळजवळ 5 हजार पारंपारीक वाण नष्ट झाले. या वाणांमध्ये रोग व किडींना प्रतिकारक असे अनेक चांगले गुणधर्म होते. त्यांचा वापर करुन अनेक नविन वाण विकसीत करता येवू शकतात. त्यामुळे अशा वाणांचे जतन होणे गरजेचे आहे.
हे सर्व काम जैव तंत्रज्ञान, रोप पैदास व अनुवंशंकीय शास्त्रज्ञांनी एकत्र येवून तयार केलेल्या नविन संशोधनाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली तरच भारतीय शेती टिकविता येईल असे प्रतिपादन छत्तीसगड, रायपूर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. पी.के. घोष यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जागतिक बॅक अर्थसहाय्यीत, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र व कृषि विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय शेती टिकविण्याच्या दृष्टीने मुख्य शास्त्रीय नव कल्पनांची मागणी या विषयावर प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ. पी.के. घोष बोलत होते.
यावेळी कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, सहनिमंत्रक व कास्ट प्रकल्पाचे सह प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, आयोजन सचिव व कृषि विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.
यावेळी डॉ. घोष पुढे म्हणाले की वातावरणातील बदलाचा सर्वात मोठा परिणाम विविध पिकांच्या उत्पादन क्षतमेवर होत असून अन्नधान्याचे उत्पादन व पुरवठा ही साखळी मोठ्या प्रमाणात बाधित झालेली दिसून येत आहे. वातावरणातील हवेत असलेल्या मिथेन, कार्बनडॉय ऑक्साईड व नायट्रस ऑक्साईड यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामधील नायट्रस ऑक्साईड हा वायु मानवी जीवनासाठी अत्यंत धोकादायक असून खतांमधील युरीयाच्या अतिवापरामुळे हवेतील नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. यामुळे वातावरणातील तापमान वाढुन वेगवेगळ्या पिकातील वाणांचा प्रतिसाद कमी होत असून यावर जैव तंत्रज्ञानातील नविन संशोधनाने अन्नधान्यातील पौष्टीक सुरक्षा तसेच उत्पन्न सुरक्षा टिकविता येईल. शेतीचे निटनेटके संवर्धन, वैविध्यपूर्ण फेरबदल व काटेकोरपणे केली जाणारी शेती या तंत्रज्ञानाचा वापर करुन आपण भविष्यात शेतीतील उत्पन्न वाढ तसेच माती, पाणी व पर्यावरण या नैसर्गीक संसाधनांचे रक्षण करु शकु असे यावेळी ते म्हणाले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर आभार डॉ. उल्हास सुर्वे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

