श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षण सुरु केल्यामुळेच आम्ही महिला आज विविध पदावर कार्यरत आहोत, त्यांच्या योगदामुळेच स्त्री सक्षम झाली आहे,असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन आफ्टर केअर बॉईज हॉस्टेल महाराष्ट्र स्टेट असोसिएशन संघटनेच्या नलिनीताई पाटील यांनी व्यक्त केले.
भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्थेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त दुरदर्शी पद्धतीने प्रबोधन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते.
श्रीमती नलिनीताई पाटील यांनी 'किशोरवयीन मुलांसाठी काळजी आणि संरक्षण 'याविषयावर विस्तृत व्याख्यान दिले,अनेक अनुभव व्यक्त करीत महात्मा फुले यांचे क्रांतिकारक सामाजिक, शैक्षणिक कार्य विशद केले.
प्रारंभी भूमी फौंडेशनचे संस्थापक,अध्यक्ष प्रा.कैलास पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.भूमी फाऊंडेशनतर्फे झालेल्या सेवाभावी उपक्रमांची माहिती देऊन अशा कार्याला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे कार्य सर्वश्रेष्ठ आणि खरे क्रांतिदर्शी होते,ते सच्चे भारतरत्नशील होते.
त्यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षण सुरु केले.धर्म, जात, वर्ग,पंथ, वर्ण अशा कोणत्याही गटबाजी आणि गुलामीपणाला थारा दिला नाही,त्यांनी मानवता हाच खरा धर्म मानला, सर्वसामान्य माणसाला त्यांनी धर्माच्या, जातीच्या कुबड्यातून बाजूला करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला, त्यामुळे मानवतेचे खरे पुरस्कर्ते असलेले महात्मा फुले महामानव होते, त्यांचे कार्य पुढे नेणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे.प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, प्रा. कैलास पवार यांनी महांकाळ वाडगावसारख्या आपल्या खेड्यात माती, पाणी,शिक्षण, कृषी, पर्यावरण रक्षण आणि सामाजिक कार्य सुरु केले, आता त्यांचे कार्य सर्वत्र वाढले आहे, महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श जपत ते कार्यरत आहेत, त्यांच्या या कार्यात योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. आरोग्यमित्र भीमराव बागुल यांनी आभार मानले.

