धुळे(प्रतिनिधी):- आरोग्य हे औषधावर निर्भर नसते. ते पैसे देऊन विकत घेता येत नाही. महागडी औषधे घेऊन क्षयरोगावर निदान करण्यापेक्षा ग्रामीण रुग्णालय ,जिल्हा रुग्णालय आपणास मोफत औषधी व उपचार करून वरूण रोख रक्कम ही देतात. आरोग्याचे रक्षण हे आहार-विहार आणि परिश्रमाच्या समन्वयावरच आधारित असते. जो स्वतःच्या आहार-विहार व परिश्रमाचा समन्वय साधतो तोच या रोगापासून मुक्त होऊन निरोगी आरोग्याचा खरा आनंद घेऊ शकतो असे मौलिक प्रतिपादन कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर तर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त बोफखेल येथे साक्री तालुका आरोग्य समन्वयक राजू पाटील यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम अधिकारी प्रा. सी.एन.घरटे प्रा. पी.एम.सावळे ,से.नि.प्राचार्य एस. डी.पाटील, प्रा.डॉ.ए.जी.खरात, आरोग्य सेविका प्रांजल जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज खिल्लारी यांनी व प्रास्ताविक दीपक सूर्यवंशी यांनी केले. ग्रामिण रुग्णालय पिंपळनेर येथील वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक राजीव पाटील पुढे म्हणाले ,जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्याचे कारण ही क्षयरोग रुग्ण वाढ देशातील दर दोन सेकंदाला एक रुग्ण याप्रमाणे रुग्णांची संख्या वाढत जाते.
क्षयरोग कोणाला होतो? त्याची लक्षणे काय? सतत पंधरा दिवस खोकला येणे, बेडख्यातून रक्त जाणे ,मानेला व शरीरावर गाठी येणे ,वजन कमी होणे ,संध्याकाळी तापाची लक्षणे जाणवणे , थकवा येणे यासारखी लक्षणे जाणवतात. अनेक महापुरुष, नेते,अभिनेते यासारख्या व्यक्तींनीही या रोगावर मात केली. मोफत उपचार, शिवाय आर्थिक मदत ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यास निक्षय पोषक आहार योजने अंतर्गत तीन हजार रुपये हे आर्थिक सहाय्य देखील दिले जाते. हा आजार बरा होतो. दोन महिन्याच्या बाळालाही याची लक्षणे जाणवतात. लक्षणे दिसताच तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जावे असे मौल्यवान मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य एस. डी.पाटील यांनीही विद्यार्थी समुपदेशन ,ताणतणाव, व्यक्तिमत्व विकास, यावर अनेक महापुरुषांची यशोगाथा, अपयशातून त्यांनी गाठलेले यशोशिखर यावर मौल्यवान मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन स्वयंसेवक नेहा पवार यांनी केले .राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

