shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा अवसानघातकी खेळच पराभवाचे कारण ठरतोय..!



         मुंबई इंडियन्सच्या पहिल्या पाच पराभवानंतर बराच काथ्याकुट झाला. पराभवाच्या कारणांचीही युध्दपातळीवर मिमांसा झाली. संघ व्यवस्थापन, कर्णधार व इतर वरिष्ठ धुरंधरांकडून मोठमोठ्या वल्गना करण्यात आल्या. त्यानंतर वाटले होते की, आता सहाव्या सामन्यात तरी पराभवाचे शुक्लकाष्ट हटेल. पण कसले काय हे दारिद्री विचारांचे खेळाडू पराभवाला आपल्यापासून दूर जाऊच देईना.

          सर्वाधिक पाच वेळा आयपीएल करंडक जिंकलेल्या मुंबई इंडियन्सची इतकी गचाळ कामगिरी होईल याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. भले मेगा ऑक्शनमध्ये मोठमोठे नावाचे खेळाडू घेतले नसतील. परंतु जे घेतले ते क्रिकेटचे सर्व पायाभूत कौशल्ये आत्मसात केलेलेच आहेत ना ? ठिक आहे पहिले पाच सामने हरले. राहिलेले सर्व सामने जिंकून प्ले ऑफ गाठता येऊ शकते. हे मुंबई इंडियन्सशी निगडीत खेळाडूच नव्हे तर प्रत्येक घटकाला ठाऊक असताना खास करून अंतिम अकरा जणांच्या संघातील खेळाडूंना पूर्वी झालेल्या चुकांमधून शिकता तर येऊ शकते ना ? मग सोळा कोटीला रिटेन केलेला रोहित शर्मा, साडे पंधरा कोटीला खरेदी केलेल्या ईशान किशन, सर्वात अनुभवी किरॉन पोलॉर्डला समजू नये म्हणजे जरा अतिच होतंय.

            रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचाच नव्हे तर भारताच्या तीनही प्रारूपातील संघाचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये यशस्वी नेतृत्व केल्यामुळेच तो भारताचा कर्णधार बनला. परंतु या चालू स्पर्धेत तो कर्णधार म्हणून बिलकुल फिका पडल्याचे दिसत असून मैदानातील त्याची देहबोली बरेच काही सांगून जाते की सध्या त्याची मानसिकता किती द्विधा आहे. इतकेच नाही रोहित क्रिकेट विश्वातील एक नामांकित फलंदाज असून त्याच्याकडून संघाला नेहमीच ठोस कामगिरीची आवश्यकता असते. परंतु या स्पर्धेत तो फलंदाजीतही निस्तेज ठरत असल्याने मुंबई इंडियन्सला सुरुवातच खराब मिळत आहे. रोहित भारताचा प्रमुख फलंदाज आहे. मागील पंधरा वर्ष सातत्याने तो आयपीएल खेळत असून नऊ वर्षांपासून तो स्वतः कर्णधार आहे. त्याच्या मनाप्रमाणे कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. मात्र आयपीएलच्या एकाही सत्रात त्याच्या वैयक्तीक पाचशे धावा कधीच झाल्या नाहीत. त्याच्यापेक्षा कमी दर्जाच्या अनेक खेळाडूंनीही पाचशे धावांचा टप्पा  बऱ्याचदा ओलांडला आहे. हि एक विचार करायला लावणारी बाब आहे.

             खास करून रोहितला राहिलेल्या सामन्यात आपल्या मानसिकतेत सकारात्मकता आणून स्वतःची फलंदाजी, नेतृत्व यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याच्या व संघाच्या कामगिरीत फरक पडेलच. परंतु आयपीएलनंतर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला व टिम इंडियाला आनंदी मनाने जाता येईल.


            मुंबईला सलग सहाव्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. प्रत्येक सामन्याप्रमाणे लखनौ विरूध्दच्या सामन्यात मुंबईचे क्षेत्ररक्षण गचाळ झाले. सोपे सोपे झेल सोडणे, ओव्हर थ्रो करणे त्यांचे नित्याचेच झाले आहे. गोलंदाज थोडा जरी मार पडला तर आपली लय हरवून बसतात. एकटा बुमराहा सोडला तर इतर गोलंदाज स्वतःच्या डोक्याचा व अनुभवाचा उपयोगच करताना दिसत नाही. त्यामुळे विरोधी फलंदाज मोठमोठ्या धावा ठोकत आहे. कधी काळी मुंबईच्या गोलंदाजांविरूद्ध पन्नास धावा करणं मुश्किल असायचे, परंतु या स्पर्धेत त्यांच्या विरूद्ध दोन शतकं निघाली आहेत. यावरून सध्याच्या गोलंदाजांचे हाल लक्षात येतात. राहाता राहिले फलंदाजांचेे, ते तर पहिली फलंदाजी आली तर समाधानाकारक धावसंख्या उभारत नाहीत व धावांचा पाठलाग करताना तर त्यांचं गणितच जुळत नाही. रोहित शर्मा व ईशान किशन गचाळ सुरूवात करून देतात व नंतर येणाऱ्या फलंदाजांवर दबाव वाढवितात. डेवाल्ड ब्रेवीस व तिलक वर्मा हे प्रत्येकी १९ वर्षाचे पोरं जोमात असले तरी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडत आहेत. त्यातच किरॉन पोलॉर्डची बॅटरी डिस्चार्ज झाल्याचे दिसत असून त्याला रिटेन करण्यात मोठी चूक झाल्याचे सिद्ध होत आहे.

           फलंदाजीत एकटा सुर्यकुमार यादव जीव तोडून खेळत असून त्याच्यावर अतिरिक्त दबाव येत असल्याने त्याचाही दम घोटत असल्याचे सामन्याच्या निर्णायक क्षणी वाटते. हीच गत गोलंदाजीत जसप्रित बुमराहाची ठरत असून दुसऱ्या बाजूने तोलामोलाचा गोलंदाज नसल्याने तोही दबावात येऊन मार खात आहे. लखनौ विरूध्द त्याची गोलंदाजी चांगली झाली. मात्र इतर गोलंदाज फिके पडल्याने लखनौने मुंबईच्या आवाक्या बाहेरचे लक्ष ठेवले. मुंबईच्या फलंदाजांची मुख्य चुक म्हणजे सेट झाल्यानंतर विकेट फेकून देणे ही ठरत आहे. त्यासाठी प्रत्येक फलंदाजांना स्वतः आपल्या चुका दुरूस्त करण्याची वेळ आली आहे.

              मुंबई इंडियन्सच्या पराभवाच्या षटकाराने त्यांच्यावर गुणतालिकेत अगदी तळाला जाण्याची नामुष्की आली असून त्यांचे पारंपारीक चाहते अजून काहीतरी चमत्कार घडेल या आशेवर आहेत. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंनी आपला फॅन बेस कमी होऊ द्यायचा नसेल तर किमान राहिलेल्या सामन्यात तरी आळस झटकावा व अवसानघातकी खेळ करणं बंद करावं.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close