shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबई इंडियन्सवर नियती कोणता सूड उगवतेय ?



           एखादं वाईट स्वप्न आणखीच गडद होत जावं अगदी तसंच मुंबई इंडियन्सचं आयपीएलच्या पंधराव्या सत्रात होत आहे. आयपीएलचे विक्रमी पाच विजेते मिळविणाऱ्या मुंबईला या पर्वात सात सामने खेळूनही अजून आपले विजयाचे खाते उघडता येऊ नये अशी आश्चर्यजनक घटना घडली आहे. नेहमी गुणतालिकेत आघाडीवर राहणाऱ्या मुंबई इंडियन्सला अगदी शेवटच्या स्थानावर शुन्य गुण व उणे धावगतीसह बघणे मनाला दुःख देऊन जाते. मुंबईने या वर्षी मेगा ऑक्शनमध्ये चांगला संघ निवडला नाही या गोष्टीवर बराच काथ्याकूट झाला. 


आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माकडेच मुंबईचे नेतृत्व असूनही मुंबईची इतकी बिकट अवस्था झालेली बघून टिकाकार आता थेट रोहीतच्याच नेतृत्व क्षमतेवर टिका करू लागले आहे. पण एक गोष्ट येथे नमूद करावी वाटते की, या सत्रात रोहीत एक कर्णधार म्हणून अपयशी ठरला असला तरी यामध्ये त्याच्या नेतृत्वगुणांपेक्षा त्याचे फलंदाज म्हणून साफ फेल होणे मुंबईच्या अपयशाच्या मुख्य कारणांपैकी एक नक्कीच आहे.
            गुरूवारी रात्री मुंबईच्या डि वाय पाटील स्टेडीयमवर झालेल्या मुंबई व चेन्नई या पारंपारीक प्रतिस्पर्ध्यातील सामना इतका चित्तथरारक झाला की, या दोन संघातील सामना जसा व्हायची अपेक्षा असते अगदी तसाच झाला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात शेवटच्या चार चेंडूपर्यंत मुंबईचेच सामन्यावर वर्चस्व होते. परंतु अंतिम टप्प्यात बुजूर्ग खेळाडू एमएस धोनीच्या झंझावातापुढे जयदेव उनाडकट अक्षरशः बावरला होता. जयदेवच्या शेवटच्या षटकात १७ धावा निघाल्यामुळे तो खलनायक जरी ठरला असला तरी १९ व्या षटकात सोळा धावा देणारा अनुभवी जसप्रित बुमराहाही तितकाच जबाबदार आहे. परंतु या सामन्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, मुंबईने या सामन्यात जिंकण्याठी अतोनात प्रयत्न केले परंतु शेवटी नियती मुंबई इंडियन्सवर रुसली असल्याचे बघून मुंबईचे समर्थक कमालीचे निराश झाले आहेत आणि त्यांचे निराश होणेही वाजवी आहे.  कारण त्यांच्या लाडक्या मुंबई इंडियन्सचे या सत्रातील आव्हान आता पूर्णतः संपले आहे.
           नाणेफेकीचा कौल विरोधात गेलेल्या मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस मैदानात आल्यानंतर आणखी खतरनाक प्रसंगाला तोंड द्यावे लागले. सीएसकेकडून खेळणारा महाराष्ट्राच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात रोहित शर्मा व ईशान किशनला शुन्याावरच माघारी धाडून मुंबईला संकटात टाकलेच शिवाय डेव्हाल्ड ब्रेेवीसचा झेल घेऊन मुंबईच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. मुकेशने या सामन्यात तीन बळी घेऊन निर्णायक कामगिरी केली.
 मुंबईच्या डावात सुर्यकुमार यादव ३२ व तिलक वर्माने नाबाद ५१, पदार्पणवीर ऋतिक शौकीन याने २५ धावा काढून प्रतिकार केला तर शेवटी जयदेव उनाडकटने वेगवान १९ धावा केल्याने १५५ अशी लढायला बऱ्यापैकी धावसंख्या फलकावर लागली. 
            या सामन्यात मुंबईची गोलंदाजी मागच्या सहा सामन्यांच्या तुलनेत अतिशय सुंदर झाली. मागच्या दोन सामन्यात संघातून वगळलेल्या डॅनियल सॅम्सने चार बळी घेतले. सामना अतिशय रंगतदार झाला. मात्र धोनीची ती खेळी मुबंईला पुन्हा एकदा पराभवाच्या खाईत ढकलून गेली. या सामन्याचा नीट विचार केला तर चेन्नईपेक्षा मुंबईचे क्षेत्ररक्षण चांगले झाले. चेन्नईने चार झेल व एक स्टंपींगची संधी सोडून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. मात्र ऐनवेळी धोनी चमकला व नियती रुसल्याने मुंबईच्या पदरी पराभव पडला.
             धोनीने शेवटच्या षटकात केलेल्या सतरा धावा व किरॉन पोलॉर्डसाठी धोनीने रचलेला सापळा व पंधरा वर्षानंतरही तीच चुक करण्याची पोलॉर्डची चुक म्हणा किंवा मुर्खपणा मुंबईला महागात पडली. कारण पडझड झालेल्या मुंबईला शेवटच्या टप्प्यात पोलॉर्डकडून तडफदार खेळाची अपेक्षा होती. या बाबी सामन्याला निर्नायक वळण देणाऱ्या ठरल्या.
            रोहित शर्मा, ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस या प्रमुख फलंदाजांचे अपयश व बुमराहाला बळी न मिळणे व उनाडकटचा अनियंत्रीत मारा मुंबईसाठी नुकसानदायक ठरल्या तर सीएसके साठी, मुकेश चौधरी, मिचेल सँटनर, ब्राव्हो, जडेजाची गोलंदाजी चांगली झाली. तर फलंदाजीत उथप्पा, प्रिटोरीयस व धोनीचा खेळ चांगला झाला.
           नेतृत्वात रोहीतने यावेळी मागच्या तुलनेत चांगली कामगिरी केली, परंतु त्याला नशिबाची साथ  नव्हती. तर रविंद्र जडेजा सीएसकेचा नावा पुरताच कर्णधार असल्याचे दिसले. कारण मैदानात क्षेत्ररक्षण लावणे, गोलंदाजीत बदल करणे याचे निर्णय घेताना धोनीच दिसत होता. त्यामुळे जडेजाला कर्णधार म्हणून या विजयाचे श्रेय देता येणार नाही. सीएसकेसाठी ऋतूराज गायकवाड कोडे बनत चालला असल्याचे दिसत आहे.
           आता मुंबईचे सात पराभवानंतरही सात सामने बाकी आहेत. त्यांनी ते सर्व जिंकले तरी प्ले ऑफ फारसा फरक पडणार नसला तरी त्यांनी जर काही विजय मिळविले तर त्यांची गेलेली पत त्यांना सुधारण्यास मदत होईल व राहिलेल्या सामन्यात बाकावर बसलेल्यांना संधी देणे सुलभ जाईल, जेणे करून भविष्यात त्याचा त्यांना लाभ नक्कीच होईल.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close