* २४ तास उलटल्या नंतर तरी प्रेतावर माळेगावच्या गायरणात केला अंतीम संस्कार
* तीन महिन्यातील तिसरी घटना : लालफितीच्या कारभारामुळे घटनेची पुनरावृत्ती
---------------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) या गावात मागासवर्गीय समाजाचे अंत्यविधी रोखण्याचा प्रकार वारंवार घडत आहेत. या बाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने दलित समाजात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. २४ तास उलटल्या नंतर रिपाइं व इतर कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांनी चर्चा करून कायमस्वरूपी अंत्यविधीसाठी माळेगाव शिवारातील गायरान जमिनीत जागा देण्याचे आश्वासन दिल्या नंतर एक दिवसा पासून घरात असलेल्या प्रेतावर २४ तासा नंतर अंतीम संस्कार करण्यात आले.
या बाबतची माहिती अशी की केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) येथे दि. २६ मंगळवार एप्रिल रोजी अंबुबाई काशिनाथ साखरे वय ७५ वर्षे या महिलेचा वृद्धापकाळाने दुपारी २:०० वा. मृत्यू झाला. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावालगतच्या खळेवाडीच्या रिकाम्या जागेत अंत्यविधीचे साहित्य घेऊन गेले असता त्या ठिकाणी राहणाऱ्या शेजारील शेतकऱ्यांनी त्याला प्रचंड विरोध केला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच नसल्यामुळे अंत्यविधी २४ तासा पासून रखडला होता.
घटनास्थळावर तहसीलदार दुलाजी मेंडके, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संदीप दहीफळे, नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड, रिपाइंचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे व त्यांचे सहकारी गौतम बचुटे, बाळासाहेब ओव्हाळ, भास्कर मस्के, दिलीप बनसोडे आणि बबलू साखरे, भगवंत वायबसे, ज्ञानेश्वर गिरी, दादा सिरसट आणि कार्यकर्ते उपस्थित झाले.

