आयपीएल २०२२ च्या अकराव्या दिवशी, तेराव्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना विजेतेपदाचा भुकेला रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यात झाला. शेवटचे पाच षटकं वगळता सामन्यावर राजस्थानचे पूर्ण नियंत्रण होते. परंतु अंतिम टप्प्यात राजस्थानचे गोलंदाज वयस्कर खेळाडू दिनेश कार्तिक व नवोदित शाहबाज अहमदला लगाम घालू न शकल्याने एका अनपेक्षित पराभवाचा राजस्थानला स्विकार करावा लागला. तरीही तीन सामन्यात दोन विजय व एक पराभव असे दोन्ही संघाचे प्रत्येकी चार असे समान गुण असले तरी सरस धावगतीच्या आधारे राजस्थान गुणतालिकेत अव्वलस्थानी आहेत तर आरसीबी सहाव्या स्थानावर आहे.
राजस्थानने विजयासाठी दिलेल्या १७० धावांचा पाठलाग करताना आरसीबीची एकवेळ १२.३ षटकात पाच बाद ८७ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. सर्व प्रमुख फलंदाज डग आऊटमध्ये परतल्याने बुजूर्ग खेळाडू दिनेश कार्तिक व नवख्या शाहबाद अहमदवर विजयाची जबाबदारी येऊन पडली असता त्यांनी राजस्थानच्या एकवेळ भेदक ठरलेल्या गोलंदाजीला साफ निष्प्रभ करत पाच चेंडू व ४ गडी राखून आरामात विजय विजय मिळविला. या दोघांनी ३३ चेंडूत धडाकेबाज ६७ धावा जोडल्या. शाहबाजने बाद होण्यापूर्वी अवघ्या २६ चेंडूत ४५ धावा ठोकून आरसीबीला विजयाच्या उंबरठयावर आणून ठेवले. तर दिनेश कार्तिकने २३ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह झंझावाती ४४ धावा फटकावून आरसीबील यशस्वीरित्या पैलतीरावर नेऊन ठेवले.
राजस्थानच्या हातात असलेला सामन्याला कलाटणी देणाऱ्या काही ठळक मुद्द्यांचा उहापोह येथे आपण घेऊया.
 तेराव्या षटकाअखेर आरसीबीची पाच बाद ८८ अशी अवस्था झाली असताना उरलेल्या ४२ चेंडूत ८२ धावांचे अवघड काम त्यांच्या तळाच्या फलंदाजांना होते. त्यावेळी पराभव आरसीबीच्या भोवती फास आवळून उभा होता. नेमकं त्याच वेळी चौदावे षटक अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन आश्वीन टाकत होता. पहिले दोन चेंडू निर्धाव गेले. कार्तिकने तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. नेमका तो चेंडू नोबॉल ठरल्याने पुढचा चेंडू फ्री हिट होता. त्याचा अचूक लाभ उठवत कार्तिकने षटकार ठोकला. त्यानंतर चौथ्या व सहाव्या चेंडूवर कार्तिकने दोन चौकार ठोकून त्या षटकात २१ धावा वसूल केल्या व सामना आरसीबीच्या दिशेने झुकविला.
तीस लाख रुपये बेस प्राईज असलेल्या व लिलावात २.४० कोटी रूपये मिळालेल्या शाहबाज अहमदने निर्णायक क्षणी दिनेश कार्तिकसह भागीदारी केली व आक्रमक ४५ धावा करून सामन्यात रंग भरले. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल सातत्याने अपयशी ठरत आहे. तर कर्णधार संजू सॅमसनच्या खेळात बिलकुल सातत्यात नाही. तो एका सामन्यात चांगला खेळतो तर पुढच्या काही सामन्यात फेल जातो. ही परंपरा तो येथे जोपासताना दिसला. राजस्थानची गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वात भेदक मानली जाते. मात्र या सामन्यात यजुवेंद्र चहल वगळता सर्वच जण निष्प्रभ दिसले. ट्रेंट बोल्ट, आश्विन, कृष्णा व नवदिप सैनी दिशाहीन ठरले.
शिवाय राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन पहिल्या दोन सामन्यात नेतृत्वात सरस वाटला होता मात्र या वेळी त्याचे गोलंदाजील बदल अनाकलनीयच होते. त्यामुळे पराभवाच्या तोंडात उभा असतानाही आरसीबीने सामना आरामात ओढून नेला.
राजस्थानच्या क्षेत्ररक्षणातही ढिलाई जाणवली असून म्हत्वाच्या क्षणी झेल सोडणे त्यांना महागात पडले. या सामन्यात झालेल्या सर्व चुकांवर काम करून त्यावर कायमचा तोडगा त्यांना काढावा लागेल. तरच त्यांना त्यांचा एकमेव आयपीएल विजेता दिवंगत कर्णधार शेन वॉर्नला विजेतेपद मिळवून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करता येईल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

