शिर्डी । प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्याची कला अवगत केली तरच भविष्य सुखकर होईल, असे प्रतिपादन शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी केले. नांदुर्खी येथील राहुल रामभाऊ पिंगळे याने अभियांत्रिकी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व कोते परिवाराच्या वतीने लॅपटॉप भेट देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. कोते म्हणाले, जिद्द चिकाटी व भविष्याचा वेध घेऊन कोणत्याही क्षेत्रात स्पर्धात्मक दृष्टिकोन ठेवून आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्पर्धेत उतरलं, तर विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतो. प्रत्येक मुलाने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची, शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाची शिदोरीबरोबर घेऊन शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या घडामोडीसह स्पर्धत्मक परीक्षेत सहभाग नोंदविला, तर तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. नवनाथ दिघे, शफिक शेख, रामभाऊ पिंगळे आदींची उपस्थिती होती. कोते व परिवाराने शैक्षणिक कार्यात जी मदत केली, त्याबद्दल राहुलने यावेळी आभार व्यक्त केले.

