shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हार्दिक पांडया स्वतःला नेमका समजतो तरी काय ?



            आयपीएलच्या पंधराव्या सत्रात दोन नवीन संघाना समाविष्ठ करण्यात आले. त्यामध्ये लखनौ सुपर जायंटस व गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे. सदर स्पर्धेत या दोन्ही संघानी सरस सुरुवात केली असल्याने त्या संघांविषयी क्रिकेट शौकीनांत कमालीचा आदर व्यक्त केला जात असताना पहिले तीनही सामने जिंकून अपराजित असलेल्या गुजरात टायटन्सला व त्यात खास करून त्यांचा कर्णधार हार्दिक पांङ्याला आभाळ ठेंगणे झाले होते. चालू स्पर्धेचं विजेतेपद आपल्यालाच मिळणार या अविर्भावात त्याचं वागणं सुरू झालं असताना सोमवारी मुंबईच्या डि वाय पाटील स्टेडीयमवर गुजरात टायटन्सची गाठ सनरायझर्स हैद्राबादशी पडली. हैद्राबादने या स्पर्धेत सुरुवातीच्या तीन पैकी दोन लढती गमावल्याने गुजरातचे पारडे जड समजले जात होते.

 
             प्रथम फलंदाजी करताना फॉर्मात असलेला गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल झटपट परतल्याने गुजरातचा डाव अडखळला. त्यावेळी नवोदित अभिनव मनोहर व कर्णधार हार्दिक पांड्याने डाव सावरला खरा परंतु हार्दिक पांड्या ज्या वेगवान खेळासाठी प्रसिध्द आहे तो लौकीक त्याला जपता आला नाही. अर्धशतक करायला त्याने ४२ चेंडू घेतले. त्याच्या एवढ्या धिम्या खेळीमुळे गुजरातला जेमतेम १६२ धावांपर्यंंत पोहोचता आले. त्यानंतर सनरायझर्स हैद्राबादने कर्णधार केन विल्यमसन व अभिषेक शर्माच्या तडाखेबाज फलंदाजीच्या बळावर अवघे दोन गडी गमावून विजयी लक्ष साध्य केले आणि चालू स्पर्धेत अपराजित असलेल्या गुजरातला पराभवाचा झटका दिला.
             हैद्राबादची फलंदाजी सुरू असताना गुजरातचा कर्णधार हार्दिक पांङ्याचे मैदानावरील वर्तन अतिशय नालायक व थर्ड क्लास वृत्तीचे होते. जणू एका कर्णधाराने मैदानावर कसे वागू नये याचे ते एक उदाहरणच होते. 
           हैद्राबादची विजयाकडे वाटचाल सुरू असताना डावाचं तेरावं षटक स्वतः हार्दिक पांड्या टाकत होता. त्या षटकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर विल्यमसनने दोन षटकार ठोकले. त्यामुळे हार्दिक बिथरला होता. अशातच त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हैराबादच्या राहुल त्रिपाठीने मारलेल अप्पर कट चुकला व त्याचा झेल डिप थर्ड मॅन कडे गेला. तेथे उभे असलेल्या मोहम्मद शमीला चेंडूचा व्यवस्थीत अंदाज न आल्याने तो झेल व्यवस्थीत पकडू न शकल्याने फलंदाज बाद करण्याची संधी हुकली. यावर हार्दिक पांड्या शमीवर जाम भडकला व त्याला भर मैदानात गलिच्छ भाषेत शिव्या हासडल्या. शमीकडून झेल सुटला तरी त्याने चेंडू व्यवस्थित अडविला व चार धावा वाचविल्या. त्यावेळी हार्दिकने शमीचे टाळया वाजवून कौतुक करणे गरजेचे होते. परंतु त्याने तसे न करता शमीवर शिव्यांचा भडीमारच सुरू केला. या घटनेचा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.
                वास्तविक झेल घेणे - सुटणे हा खेळाचाच एक भाग असतो. शिवाय शमी हा हार्दिक पेक्षा वयाने मोठा आहे. कमीत कमी या गोष्टीचं भान त्याने ठेवायला हवे ना ?  इतकेच नाही तर शमी हा भारताच्या तिन्ही प्रारूपातील नियमीत व महत्वाचा स्थानापन्न खेळाडू असून भारताच्या अनेक विजयात महत्वाची भूमिका सातत्याने बजावत आहे. त्याचबरोबर याच स्पर्धेतील गुजरातच्या तिनही विजयात शमीच्याच गोलंदाजीचा मोठा वाटा आहे. हार्दिक पांङ्या भारतीय संघातून हाकलून दिलेला बेशिस्त खेळाडू आहे. त्याने या बाबी ध्यानात ठेवायला पाहिजे. तेंव्हा हार्दिकने शमीच्या वयाचा व श्रेष्ठत्वाचा विचार करणे गरजेचे होते.
                याच सामन्यात छोटया मोठया चुकांवरून इतर खेळाडूंवरही तो चिडताना प्रेक्षकांनी प्रत्यक्ष मैदानावर व टिव्ही संचावर प्रक्षेपणा दरम्यान बघितले आहे. हा हार्दिक सहकारी खेळाडूंच्या छोट्या छोट्या चुकांवर चिडतो, तर त्यानेही या सामन्यात भयंकर गंभीर चुका केल्या आहेत. त्या बद्दल त्याला कोणती शिक्षा द्यायला हवी ? गुजरातच्या डावात त्याने स्वतः ५० धावा करायला ४२ चेंडू घेतले. वास्तविक त्याच्या सारख्या आकमक फलंदाजाकडून एवढया चेंडूत ८० ते ९० धावा व्हायला पाहिजे होत्या. त्याच्या या धिम्या खेळीने गुजरातचे नुकसान झाले नाही का ? शिवाय केन विल्यमसन सरळ बाद दिसत असताना त्याने कर्णधार या नात्याने डिआरएस घेणे गरजेचे होते. पुढे जात विल्यमसनने हैद्राबादला सामना जिंकून दिला. येथे त्याची चुक नाही का ?  या बद्दल त्याला कोणी शिव्या द्यायच्या ?                    हार्दिक पांड्या हा २९ वर्षीय गुजरात राज्यातील खेळणारा  अष्टपैलू खेळाडू.  काहीसी आक्रमक फलंदाजी व बऱ्यापैकी मध्यमगती गोलंदाजी हे त्याचे क्रिकेटमधील भांडवल.  दि ग्रेट कपिलदेव नंतर भारताला फलंदाजी करू शकणारा वेगवान गोलंदाज न मिळाल्यामुळे पांड्याचा रूपात तो अष्टपैलू खेळाडू शोधला जात होता. त्याच आशेपोटी मागील पाच वर्षात त्याला त्याच्या लायकीपेक्षाही भरमसाठ संधी दिली गेली. मात्र त्याच्या कडून सातत्यपूर्ण कामगिरी कधीच झाली नाही. उलट त्याच्या तंदुरूस्तीने वेगळाच प्रश्न बीसीसीआय समोर उभा राहीला. तो संघात हवाच परंतु गोलंदाजी करणार नाही. अशी इमोशनल ब्लॅक मेलिंग तो करायचा. सन २०२१ च्या टि २० विश्वचषक स्पर्धेतील खराब  कामगिरीनंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतर बीसीसीआयने त्याला बंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकाडमीत पुनर्वसन प्रक्रियेसाठी जाण्यास सांगितले.  तेंव्हा तेथे जाण्यास त्याने साफ नकार दिला. उलट त्याने निवड समितीवरच प्रतिहल्ला करताना त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून नव्हे तर निव्वळ फलंदाज म्हणून निवडल्याचा आरोप केला होता.  त्यानंतर बीसीसीआयने त्याला रणजी स्पर्धेत खेळायचे सांगीतले, त्यालाही त्याने नकार देत स्वतःचीच मनमानी केली.
                  हार्दिकने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर ती फार प्रभावीही दिसत नाही.  हार्दिक पांड्या मागील पाच वर्षात केवळ ११ कसोट्या खेळला. त्यामध्ये ५३२ धावा व १७ बळी अशी माफक कामगिरी त्याने केली आहे. तर ६३ वनडेत १२८६ धावा व ५७ बळी ही निराशजनक आकडेवारी त्याने नोंदविली आहे. शिवाय ४९ टि २० सामन्यात केवळ ४८४ धावा व ४२ बळी हि आकडेवारी त्याच्या अष्टपैलूत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते.
                       खरं तर हार्दिक पांड्या क्रिकेटपेक्षा इतर गोष्टीतही वादग्रस्त राहिल्याने त्या क्रिकेटमधील कामगिरीवरही बराच परिणाम झाला आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या रियॅलिटी शोमध्ये महिलांविषयी अभद्र टिपण्णी त्याने व केएल राहुलने केली होती. तेंव्हा बीसीसीआयने कठोर कारवाई करत त्या दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून हाकलून देत मायदेशी धाडले होते. तसेल  भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी बेताल वक्तव्य करणं त्याच्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडविणारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तर त्याने भारताला आरक्षणाचा आजार लावणारी व्यक्ती असे संबोधल होते. त्याचबरोबर त्याचे इतरही वागणे त्याचा लौकीक वाढविणारे नक्कीच नाही. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या टिम मॅनेजमेंटने व बीसीसीआयने त्याच्या अशा आचरट वागण्यावर लगाम घालून त्याला कठोर शासन करायला हवे. त्या शिवाय त्याच्या डोक्यातली गरम हवा थंड होणार नाही.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close