जव्हार.:- जव्हार नगर परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीने आयोजित केलेली 131 वी भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.सतिष उखर्डे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं.!असे प्रतिपादन करून, बाबासाहेबांचे बहुजनांसाठी असलेल्या योगदानाचे महत्व विशद केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचे मूर्तिमंत भांडार होते, सामाजिक,राजकीय क्षेत्रात प्रभावशाली नेतृत्व करत सत्याग्रहाच्या, समाजसुधारणेच्या मार्गाने इथल्या तळागाळातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला.त्यांची जीवन यात्रा निस्वार्थ त्यागाची आणि सार्थक समर्पणाची होती. त्यांनी संविधानाच्या रूपाने एक चंदनाची बाग प्रत्येक माणसाला भेट दिली,त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रहित जोपासणारे कार्य त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विक्रमगड मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनिल भुसारा उपस्थित होते.पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष निलेश सांबरे,नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल,उपनगराध्यक्षा पद्मा राजपूत,सभापती विशाखा साळवे,रश्मी मणियार,सुनिता चव्हाण,जयश्री चव्हाण, जयेश मुकणे,अविन सावंत,प्रा.वसंतराव धांडे, वैभव अभ्यंकर, नितांत कांबळे,जयेश लोखंडे,कुणाल उदावंत आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू जगताप यांनी केले आणि रवींद्र बुधर यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

