आयपीएलच्या पंधराव्या पर्वाच्या तेराव्या दिवशी झालेल्या एकूण पंधराव्या सामन्यात लखनौ सुपर जायंटसने दिल्ली कॅपिटल्सला हरवून सातव्या स्थानावर ढकलले तर स्वतः दुसरे स्थान मिळविले. नाणेफेक गमावल्याने प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या दिल्लीची सुरुवात दणकेबाज झाली. मात्र पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर दिल्लीच्या डावाला जी घरघर लागली ती पराभव झाल्यानंतरच थांबली. मागच्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थानी राहून प्ले ऑफ फेरी गाठलेल्या दिल्लीला यंदा मुंबई विरूध्द पहिल्या सामन्यात मिळालेल्या विजयानंतर सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
वीस षटकात केवळ १४९ धावा बनवू शकलेल्या दिल्लीला मजबूती गोलंदाजी असूनही नामुष्की पत्करावी लागली. डेव्हीड वॉर्नर व एनरीच नॉर्खीया यांच्या संघात परतल्यानंतरही दिल्लीच्या पराभवाला कारण ठरलेल्या घटनांवर प्रस्तुत लेखात आपण प्रकाशझोत टाकूया.
दिल्लीला हवाई सुरुवात करून देणाऱ्या पृथ्वी शॉचा आठव्या षटकात यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकने झेल पकडला आणि दिल्लीची गाडी रुळावरून घसरली ती परत लाईनवर आलीच नाही. पृथ्वी ६१ धावांवर बाद झाला तेंव्हा दिल्लीच्या धावा होत्या ६७ यावरून शॉचा शो किती खतरनाक होता याचा अंदाज येतो तसाच पृथ्वीच्या विकेटचाही !
आक्रमक फलंदाजीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या रिषभ पंतने अतिशय कुर्मगतीने फलंदाजी केली. ३९ धावा बनायला ३६ चेंडू घेणाऱ्या रिषभने कृष्णप्पा गौतम या दुय्यम दर्जाच्या गोलंदाजाचे बारावे षटक निर्धाव खेळले आणि तेथूनच दिल्लीच्या डावाची अधोगती सुरू झाली.
पावर प्लेमध्ये पृथ्वशॉच्या झंझावातामुळे बिनबाद ५२ धावा बनविणाऱ्या दिल्लीने ७ ते १५ या आठ षटकात फक्त ४७ धावा जमविल्या. त्यानंतर शेवटच्या चार षटकात पन्नास धावा त्यांनी बनविल्या. परंतु सामना जिंकण्यासाठी १४९ या धावा पुरेशा नव्हत्या.
दिल्लीचे प्रमुख फलंदाज सर्फराज खान व रिषभ पंतची रटाळ फलंदाजी खास करून दिल्लीची धावगती न वाढण्याचे प्रमुख कारण होती.
लखनौच्या राहुल व डिकॉक या सलामीवीरांनी ७३ धावांची सलामी देऊन भक्कम सलामी दिली. डिकॉकने ८० तर राहुलने २४ धावा केल्या. या दोघांच्या बाद होण्याने दिल्लीच्या आशा पल्लवीत झाल्या खऱ्या परंतु गोलंदाज ती पुर्ण करू शकले नाहीत.
एर्विन लुईस झटपट बाद झाला खरा पण कृणाल पांड्याने मुस्तफिजुर रहमानच्या १९ व्या षटकात १४ धावा ठोकून लखनौचा विजय पक्का केला तर नवोदित आयुष बदोनीने आपला गोल्डन टच सुरू ठेवत शार्दूल ठाकूरला चौकार व षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केला.
रिषभ पंत व केएल राहुल भारताचे भविष्यातले कर्णधार गणले जातात. मात्र मागच्या सत्राच्या उलट यंदा दोघांची कामगिरी होत आहे. सर्वच स्तरावर अपयशी ठरलेला राहुल या सत्रात सलग तीन विजय मिळवून रिषभ पेक्षा काकणभर सरस असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. शिवाय रिषभ सध्या नेतृत्वात काहीसा ढिसाळ दिसत असल्याने दिल्लीच्या अडचणीत वाढ होताना दिसते. तसेच शार्दूल आठव्या क्रमांकावर खेळत असल्याने दिल्लीची फलंदाजी सखोल नसणे हे देखील त्यांच्या पिछेहाटीचे कारण ठरत आहे.
अद्याप अकरा सामने दिल्लीला खेळायचे आहेत. तेंव्हा आता जागे होण्याची वेळ आली असून थोडाही गलथानपण त्यांना स्पर्धेतून बाहेर होण्याचे कारण ठरू शकतो.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

