शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शुक्रवार दिनांक १५ एप्रिल २०२२
उष्णतेच्या लाटेचा शेतीकामांवर परिणाम
ऊस तोडणी कामगारांचे हाल..!!
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात अतिउन्हामुळे शेतातील कामावर व कामगारांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. परिसरात सध्या एप्रिलमध्येच कधी नव्हे एवढे 40 ते 41 अंश सेल्सिअस तापमान या भागात दिसून येत आहे.
परिसरात सध्या ऊस तोडणी व कांदा काढणीला वेग आला आहे, पण अति उन्हाच्या तडाख्यात कामाचा वेग मंद झाला आहे. कार्यक्षेत्रात अजून ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात बाकी आहे. शेतकर्यांना आपला ऊस कारखान्यात गाळपासाठी लवकर जावा यासाठी शेतकरी ऊस कारखान्याच्या कर्मचार्यांकडे चकारा मारीत आहे. जवळपास चौदा ते सोहळा महिन्याचा ऊस झाला आहे. ऊसाचे वजन देखील मोठ्या प्रमाणात घटले आहे पण पुढील पिकाकरिता रान मोकळे व्हावे म्हणून तरी आता ऊस जावा अशी भूमिका येथील शेतकर्यांनी घेतली आहे. ऊस तोडणी कामगारांना देखील उन्हाचा फटका बसत आहे. दिवसभर गाळूनही उन्हामुळे अपेक्षित उसाची तोडणी करणे कामगारांसाठी अशक्य ठरत आहे. ऊस वजन देत नाही. त्यामुळे कामाचा मोबदला देखील परवडेल असा मिळत नाही अशी ऊस तोडणी कामगार आपली व्यथा सांगता आहेत.
अति उष्णतेमुळे आगास व मागास कांदा एकाचवेळी काढणीला आला आहे. त्यामुळे कांदा काढणीला देखील मजूर मिळेनासे झाले आहे.त्यात अतिउन्हामुळे कामगार देखील परेशान झाले आहे. सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत जेवढे काम उरकेल तेवढेच काम कामगार करताना दिसत आहेत. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे कामगारांना काम उरकेनासे झाले आहे.
अति उष्णतेचा शेतीच्या कामावर मोठा परिणाम दिसून येत आहे. या भागात दुपारच्या वेळेस शुकशुकाट दिसून येत आहे. रानात जेथे झाडाची सावली दिसेल अशा ठिकाणी कामगार झाडांचा आश्रय घेत आहे. घरातील नागरिक देखील आपले घर अतिउष्णतेमुळे सोडायला तयार नाही.
पुढील महिन्यात अजून उष्णतेचा तडाखा जाणवणार आहे. त्यामुळे अजून शेतीला मोठा फटका बसणार आहे. ऊस व कांदा शेतकर्यांची डोकेदुखी ठरत आहे. शेतातील ऊस जाईना व कांदा काढणी मजूर मिळेना त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. या भागात लाईटची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रासायनिक खते , वाढलेली मजुरी, लाईट समस्या, शेतीमध्ये वाढलेले खर्च याच्यावर मात करीत शेतकर्यांनी आपली पिके आणली पण आता ती जर वेळेवर जात नसेल तर काय उपयोग असे येथील शेतकरी बोलताना दिसत आहे.
ज्यांची जमिनीतील पिके काढून झाली असे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची नांगरट करत आहेत पण अति उष्णतेमुळे ट्रॅक्टर देखील दुपारच्या वेळेस बंद आहे. जवळपास शेतीची कामे दुपारच्या वेळेस बंदच दिसत आहे,
करोनाच्या काळात लग्न अंत्यविधी व विविध कार्यक्रमात सहभागावर मर्यादा होती. पण आता सर्व खुले होऊनदेखील कार्यक्रमाला नागरिक अति उन्हामुळे हजेरी लावेना, त्यामुळे कार्यक्रमांना देखील गर्दी कमी दिसून येत आहे.
अति उन्हाचा तडाखा सगळ्याच गोष्टींना बसत आहे. गावातील थंडपेय सोडून सगळेच व्यावसायिक दुपारच्या वेळेस बसून आहे. तरी या उन्हात आपली काळजी घ्या, जास्त पाणी प्या, अतिउन्हात विनाकारण हिंडू नका, प्रवासात टोपीचा वापर करा, लहान मुलांना उन्हात फिरून देऊ नका असे स्थानिक डॉक्टर सल्ला देत आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

