आयपीएल सन २०२२ चे सत्र गतविजेत्या चेन्नई पाठोपाठ सर्वाधिक विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठीही दुःखद स्वप्नासारखे ठरत आहे. प्रथम चेन्नईची पराभवाची हॅट्रीक झाली तर स्पर्धेच्या बाराव्या दिवशी चौदाव्या सामन्यात मुंबईच्या वाट्यालाही हा वाईट क्षण आला. मुंबईत घरच्या मैदानांवर दोन सलग पराभव पदरी पडल्या नंतर पुण्याच्या एमसीए मैदानावर नशीब बदलेल या आशेने मुंबईचा संघ केकेआर विरुद्ध मैदानावर उतरला खरा परंतु मागच्या दोन्ही सामन्यांपेक्षा अति वाईट पराभव मुंबईला येथे बघावा लागला.
नाणेफेक गमावल्या नंतर मुंबईला प्रथम फलंदाजीस मैदानावर यावे लागले. पहिल्या दोन सामन्यांना दुखापतीमुळे मुकलेला सुर्यकुमार यादव संघात परतला तर मोठया आशेने टिममध्ये निवडलेला टिम डेव्हीड दोन प्लॉप शोमुळे बाहेर गेला. त्याच्या ऐवजी बेबी डिव्हीलर्सला संधी मिळाली. अपयशी ठरणारे गोलंदाज मात्र कायम राहीले.
कर्णधार रोहीतची अपयशाची गाडी येथेही सुरूच राहिली. तर मागच्या दोन सामन्यांचा तारणहार ईशान किशन यावेळी फेल गेला. पदार्पणाचा सामना खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा ब्रेवीस डेव्हीस उर्फ बेबी डिव्हीलर्सने छोटेखानी खेळी करून त्याच्या खेळात एबीडीची झलक असल्याचे दाखवून दिले. नवोदित तिलक वर्माने सलग तिसऱ्या सामन्यात शानदार खेळाचा टेंपो कायम राखत नाबाद ३८ धावा केल्या. तर मुख्य आधारस्तंभ असलेल्या सुर्यकुमार यादवने ५२ धावांची खेळी करुन आपले कर्तव्य योग्य रित्या बजावले. शेवटी किरॉन पोलॉर्डने तीन चांगले फटके मारून उपयुक्त २३ धावा जमविल्या. हे वाचायला चांगलं वाटत असलं तरी मुंबईची फलंदाजी दोन भागात वाटली गेल्याचं दृश्य प्रत्यक्ष सामना बघताना दिसलं.
सुरुवातीला केकेआरच्या गोलंदाजांनी अतिशय पकडून गोलंदाजी केल्याने मुंबईच्या फलंदाजांना धावा बनविणे कठिण जात होते. मुंबईच्या धावांचे शतक सतराव्या षटकात लागले यावरून केकेआरच्या भेदक गोलंदाजीची कल्पना आपोआप येते. शेवटच्या साडेतीन षटकात ६१ धावा निघाल्या नसत्या तर मुंबईची हालात आणखी बिकट झाली असती. सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा व किरण पोलॉर्डने शेवटी केलेल्या आतिषबाजीने हे शक्य झाले.
विजयासाठी १६२ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना केकेआरची ४ बाद ८७ अशी अवस्था होती. त्यानंतर आंद्रे रसेलही लवकर परतल्यामुळे मुंबईला विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु पॅट कमिन्स नावाचं वादळ आलं आणि अवघ्या चौदा चेंडूत मुंबईच्या स्वप्नांचा पालापाचोळा करून गेलं. दृष्टीक्षेपात दिसणाऱ्या विजयाचे पराभवात रूपांतर झाल्याने संपूर्ण संघ व कर्णधार रोहीत शर्माच्या वर्तनातून लगेच जाणवले. पुरस्कार वितरण प्रसंगी रोहीत शर्मा टेक्निशियनवर स्पिकरचा आवाज मोठा करण्यासाठी उंच आवाजात बोलला. वास्तविक बघता हा अनपेक्षित पराभव पचवणं मुंबईसाठी जरा अवघडच होतं. कदाचित या पराभवानंतर मुंबईचे प्लेऑफचे दरवाजेही बंद होऊ शकतात.
मुंबईला स्लो स्टार्टर म्हणून ओळखले जाते. स्पर्धेत सुरूवातीचे तीन सामने गमावण्याची त्यांची हि काही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी अनेकदा चमत्कारीक कामगिरी करून विजेतेपदे मिळविले आहे. परंतु यंदा तशी परिस्थिती दिसत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या जवळ उपलब्ध असलेला संघ. पूर्वी त्यांचा संघ मजबूत असायचा त्यामुळे ते अंतिम टप्प्यात जोरदार खेळ करून मुंसडी मारायचे. परंतु यंदा तसे दिसत नाही व होण्याची सुतराम शक्यताही नाही. कारण ऑक्शन टेबलवरच त्यांनी मार खाल्लेला आहे. संघात चार खेळाडू त्यांनी रिटेन केले. त्यापैकी पोलॉर्ड हा कुठल्याही कामाचा दिसत नाही. त्याच्या ऐवजी ट्रेंट बोल्टला रिटेन करायला पाहिजे होते.
मागील तीनही सामन्यात पराभवाचे कारण बनलेला डॅनियल सॅम्स हा ऑस्ट्रेलियाने फ्लॉफ कामगिरीमुळे संघातून हाकलून दिलेला खेळाडू आहे. त्याला खेळवून मुंबई स्वतःचंच नुकसान करून घेत आहे. सॅम्स हा क्लब लेवलचा देखील गोलंदाज नाही. तर बेसिल थंपी देखील एवढया मोठ्या स्तरावर खेळण्याच्या लायकीचा नाही. जयदेव उनाडकट हा डावखुरा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सपेक्षा कितीतरी पट उजवा असूनही बाहेर बसवला आहे. तर पूर्ण फिट नसलेल्या जोफ्रा आर्चरवर साडेआठ कोटी रूपये फालतू गुंतवून मुंबईने सध्या तरी घाट्याचा सौदा केला आहे. भविष्यात तो फायद्याचा सिद्ध होईलही परंतु आज मात्र त्यामुळे मुंबई इंडियन्स गोत्यात आली आहे. टायमल मिल्सही फालतू दर्जाचा गोलंदाज सिध्द झाला आहे.
मुंबई जवळ फलंदाजी चांगली आहे. परंतु जसप्रित बुमराहाला साथ देणारा तोलामोलाचा गोलंदाज नसल्याने त्याच्यावर अतिरिक्त दबाव येत असल्याने त्याचीही गोलंदाजी स्वैर होत आहे. मुरुगन आश्वीन हा फिरकीपटू त्याच्या परिने मोठे प्रयत्न करत आहे. परंतु इतर गोलंदाज फेल होत असल्याने त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
एकंदर बघता रोहित शर्मा सारखा मातब्बर कर्णधार असूनही ऑक्शन टेबलवरच चुकीची संघ निवड केल्याने मुंबईच्या अपयशाला त्यांचे निवडकर्ते व थिंक टँकच जबाबदार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी निराश न होता आहे त्या संघाला विजयी होण्याचे बळ प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करणे एवढे काम करावे.
मुंबईचे अजूनही अकरा साखळी सामने बाकी असून त्यातील किमान आठ जिंकावेच लागतील शिवाय इतर संघांच्या कामगिरीवरही बरेच काही अवलंबून असणार आहे, कारण आता आठ नाही तर दहा संघ स्पर्धेत सहभागी आहेत. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंना खडतर प्रयत्न व दैवाची सर्वोत्तम साथ यांचीच नितांत गरज आहे. शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळे भविष्याच्या गर्भात काय दडलं आहे हे त्या परम पित्यालाच ठाऊक. मात्र मुंबई इंडियन्सला नेहमीप्रमाणे उशीराने का होईना दैवाची साथ मिळो हिच सदिच्छा !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

